तलवारीप्रमाणे धारदार व्यक्तिमत्वाचे सेनापती बापट…
सेनापती बापट म्हणजे समाजसुधारणेचे, क्रांतीचे, जहाल विचारांचे आणि सोबतच अहिंसेचे दुसरे नाव. हे इतके विविध गुण एकाच माणसामध्ये असल्याचे आश्चर्य वाटते.
खडतर आयुष्य जगून सेनापती बापट एक खरे स्वातंत्र्यसैनिक ठरले. त्यांच्या आयुष्यात इंग्रजांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या ह्याच त्यागाला व कार्याला वंदन करत आजच्या लेखामध्ये त्यांच्या आयुष्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात.
पांडुरंग महादेव बापट असे सेनापती बापट ह्यांचे खरे नाव होते. ह्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात १२ नोव्हेंबर १८८० रोजी झाला. वडील महादेव व आई गंगाबाई ह्यांनी मुलाला चांगले शिकवले. उत्तम संस्कार दिले.
सेनापतींचे पूर्वज मूळचे रत्नागिरीचे पण नंतर त्यांचे घराणे पारनेरलाच राहू लागले. इतर मुलांप्रमाणेच सेनापतींचे लहानपण गेले पण शिक्षणाकडे कल असल्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेजला पूर्ण झाले.
नंतर ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती त्यांना मिळाली व ब्रिटनला जाऊन शिक्षण घेण्याची त्यांना संधी मिळाली. इंग्लंडला जाऊन शिक्षण घेऊन परत भारतात येऊन भारत भुमीसाठी काम करण्याचे स्वप्न त्या काळचे सगळेच बुद्धिमान तरूण पाहायचे. सेनापतीही ह्याला अपवाद नव्हते.
सेनापती बापट इंग्लंडला गेले आणि शिक्षणासोबत त्यांना आता राष्ट्रभक्तीचा गंध लागला होता. इंग्रजांचे राज्य मोडून काढायचे आणि स्वातंत्र्य मिळवायचे हाच उद्देश घेऊन श्यामजी वर्मा ह्यांनी बांधलेल्या इंडिया हाऊसमध्ये सेनापती बापट राहू लागले.
तिथेच त्यांची भेट स्वातंत्र्यवीर सावरकरांशी झाली. सेनापती बापट ह्यांनी इंग्लडमध्ये राहून इंग्रजांविरोधात भाषणे केलीत. इंग्रज मुलांनी त्यांना विचारले की, इथून पुढे इंग्लड व भारतीयांचे संबंध कसे राहतील? त्यावर बापटांनी खिश्यातली बंदूक टेबलवर आपटली आणि म्हणाले,
‘हे असे संबंध राहतील.’ इतका क्रांतिकारी व तिखट विचार इंग्रजांना सहन झाला नाही. पुढे बापट पॅरिसला गेले तिथे जाऊन त्यांनी बॉम्ब बनवण्याचे शिक्षण घेतले, त्याचे पुस्तक तयार केले आणि काही वर्षांनी बंदूक व बॉम्ब बनवण्याच्या तंत्रासोबत ते भारतात परतले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याआधी देशातील लोकांना पारतंत्र्यांची जाणीव करून देणे आवश्यक होते. ते केवळ लोकांना शिक्षित करूनच शक्य होणार होते. इतका विचार करून बापटांनी समाजाची सेवा करण्याचा निर्धार केला.
त्यांनी पारनेरला जाऊन शिक्षकाची नोकरी केली. सक्काळसकाळी सेनापती बापट गावातील सर्व रस्ते झाडून काढायचे. स्वदेशी, स्वच्छता, स्वातंत्र्य हे मंत्र खऱ्या अर्थी बापटांनी जनतेला दिले.
मुळशी धरणाच्या बांधकामात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात हा लढा त्यांनी उभा केला होता.
पण ह्यामुळे त्यांना सात वर्षांचा तुरुंगवास झाला. ह्याच त्यांच्या कार्यामुळे व धाडसीपणामुळे लोकांनी त्यांना ‘सेनापती’ ही पदवी बहाल केली.
सेनापती बापटांचे विचार खूप प्रगत होते. त्यांना मुलगा झाला तेव्हा पहिले स्नेहभोजन त्यांनी हरिजनांना दिले. मुंबईत देखील स्वच्छता रहावी म्हणून गळ्यात पेटी अडकवून ते रस्त्याने भजन करायचे. समाजकारण व राजकारण अशा अनेक विषयांवर ते लिहायचे.
त्यांनी अंदमानमध्ये होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी प्रयत्न केले. ‘राजबंदी मुक्ती मंडळ’ निर्माण करून अनेक राजकैद्यांची त्यांनी सुटका केली.
इंग्लड वरून आल्यानंतर ते टिळकांसोबत होते. नंतर त्यांनी सावरकरांचा मार्ग निवडला. पण जनतेची अवस्था समजताच त्यांना गांधीजींचे विचार पटले. सेनापती बापट कधीच एका विचाराला किंवा व्यक्तिला चिकटून राहिले नाही.
गांधी विचार त्यांनी स्वीकारला पण पुन्हा गरज भासली तेव्हा सुभाषचंद्र बोस ह्यांच्या सोबत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. जनतेला कसली गरज आहे हे बघून त्यांनी आपले मार्ग निवडले.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा देखील त्यांनी उभा केला. गोवा मुक्ती संग्रामात देखील त्यांनी भाग घेतला. एकंदरीत आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजाच्या नावावर केले होते.
अशा महान व्यक्तीचे २८ नोव्हेंबर १९६७ रोजी मुंबई इथे निधन झाले. त्यांनी साहित्यात पण मोठे काम करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा गौरव करताना तर ते म्हणतात,
“महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले। मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले।खरा वीर वैरि पराधीनतेचा। महाराष्ट्र आधार ह्या भारताचा।।”