ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

लहान मुलांना एखादी गंभीर बातमी कशी सांगावी? एकदा नक्की वाचा…

तुझ्या भावाचा अपघात झाला आहे किंवा बहिणीला साप चावलाय, तुझ्या बाबांना कॅन्सर आहे अशा धक्कादायक घटना तरुण किंवा समजुतदार व्यक्तीला अचानक सांगितल्या तर ते सुद्धा घाबरून जातात.

मग लहान मुलांना जर घटना सांगताना दक्षता घेतली नाही तर त्यांची काय अवस्था होईल, त्या बालमनावर काय परिणाम होईल याचा विचारही मनात करवत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत लहान अशा गंभीर गोष्टी सांगताना काय सावधगिरी बाळगता येईल या विषयी.

खोटे बोलून निभावून न्यावे का?

आमच्या शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या शांभवीच्या आईचे वडील कोरोना काळात गेले. नातीचे आजोबांवर खूप प्रेम होते.

ते गेल्यावर, शांभवीला “तिचे आजोबा उपचारासाठी गावी गेले आहेत आणि ते लवकरच परत येतील” असे सांगण्यात आले. अशा प्रकारे काळजी आणि कुतूहलाने भरलेल्या शांभवीचे समाधान करण्यात आले.

खरं तर लहान मुलांना मृत्यू काय असतो हे तितकेसे माहीत नसते त्यांना प्रेम, काळजी, सुरक्षितता या गोष्टी समजलेल्या असतात.

एखाद्याचा मृत्यू होणे, अपघात होणे, घरातील पाळीव प्राणी सोडून जाणे अशा गोष्टी लहान मुलांसाठी विचलित करणाऱ्या असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्याशी खोटं बोलून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला जातो.

परंतु मुलं मोठे झाल्यावर त्यांना समजेल अशा पद्धतीने परिस्थिती सांगावीच लागते. त्यामुळे मुलं अगदीच लहान असेल तर वेळ निभावून नेलेली बरी पण मुलं जर नऊ दहा वर्षांचे असेल तर त्याला तुम्ही सांगा की माणूस मरू शकतो. त्यांना सोडून पण आनंदाने जगायचं असते.

सकारात्मक वातावरण निर्माण करा:

घरातील एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल अनेक जण तो कसा मेला, मरताना त्याला किती त्रास झाला अशा नकारात्मक गोष्टी बद्दल जास्त बोलतात. तसे न करता त्या व्यक्तींच्या आयुष्यातील चांगल्या आठवणींबद्दल बोलल्यास लहान मुलांपुढे सकारात्मक वातावरण तयार होते.

घरातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर लहान मुलांच्या विश्वात एक पोकळी तयार होते. आता आजोबा गेले मला सायकलवर कोण फिरवणार, माझ्यासोबत कोण खेळणार असे विविध प्रश्न मुलांना पडतात तेव्हा वडिलांनी,

घरातल्या वयाने मोठ्या व्यक्तीने मी तुझ्या सोबत खेळतो, मी तुला बागेत घेऊन जाईल असा दिलासा देणे खूप महत्त्वाचे असते. घरातील इतर सदस्य सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत ही जाणीव करून दिली की मुलांचे मन आपसूक हलके होते.

लहान मुलांशी गंभीर गोष्टीविषयी बोलताना ही दक्षता घ्या:

लहान मुलांना पाळीव प्राणी खूप प्रिय असतात. त्यामुळे घरातील पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास ते रडून रडून घर डोक्यावर घेतात. अशावेळी त्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधा. आपण दुसरा असाच एक पाळीव प्राणी आणुया असा दिलासा द्या.

तुम्ही दुःखी झालात तर एकट्यात जाऊन रडू नका. दुःख होणे, रडू येणे हे खूप साहजिक आहे हे मुलांना कळू द्या. यामुळे मुलेसुद्धा भावना व्यक्त करायला शिकतील.

एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपण तिच्या आठवणी सांगू शकतो, त्या व्यक्तीबद्दल मनमुराद बोलू शकतो या गोष्टीची जाणीव मुलांना होऊ द्या. व्यक्ती गेली तरी आनंदी राहण्यात काहीच वाईट नाही हे त्यांना सांगा.

घरातील व्यक्तीला मोठा आजार जडला असेल अथवा अपघात झाला असेल तेव्हा काय करावे?

लहान मुलांचे मने खूप संवेदनशील असतात. प्रत्येक गोष्टीबद्दल ते बारीक विचार करत असतात. इतरांबद्दल त्यांना नेहमी चिंता आणि काळजी असते.

आजोबा आजारी म्हंटल्यावर ते निरागस मुल त्यांच्याकडे जाणारच तेव्हा त्यांना हे समजावून सांगणे खूप आवश्यक आहे की आजोबांना आजार झाला आहे, तू त्यांच्या जवळ गेलीस तर तू सुद्धा आजारी पडशील.

घरातील अन्य कोणी व्यक्ती आजारी असेल तर मुलांना त्याविषयीची माहिती द्या. मुले याबाबतीत खूप संवेदनशील असतात.

एखाद्याचा अपघात झाल्यास किंवा अन्य गंभीर घटना घडल्यास काहीच घडलेले नाही असे वागू नका. अशा वागण्याने मुले आणखी जास्त विचार करतात.

मृत्यूला धार्मिक वा काल्पनिक गोष्टींशी जोडा:

आपल्या इथे व्यक्ती वारला की देवा घरी गेला अस आपण म्हणतो किंवा आकाशात बघ, ते तारा बनलेले तुझे आजोबा आहेत अस म्हणणे मुलांच्या भाबड्या मनाला सुरक्षितपणा मानसिक दिलासा देण्याची भावना असते आणि त्याने मुले सुखावतात.

मृत्यूला दैवी गोष्टीशी जोडल्यास मनाला आधार आणि शांती लाभते. चांगली माणसे देवाला प्रिय असतात त्यामुळे तुझ्या बाबांना देवाने बोलवले असे म्हणल्यास मुलांना आत्मिक समाधान मिळते.

तेव्हा मुलांना अशा गंभीर गोष्टी सांगताना थोडी खबरदारी नक्की घ्या. फुलांना कुरवाळल्यास ते सुद्धा सुंदर दिसतात तसे मुलांना प्रेमाने सर्व सांगून शंका निरसन केल्यास ते सुद्धा सर्व समजून घेतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button