ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

सतत लॅपटॉपवर काम करताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

बापरे! डोळे किती लाल झालेत… डोळ्यांची भयंकर आग होतेय!.. कुठे बघवतही नाही, एवढे डोळे चुरचुरतायत!.. ही अशी वाक्य रोज तुमच्या तोंडी असतात का? डोळ्यांना एवढा त्रास होत असताना काम करण्यासाठी रोज लॅपटॉप समोर बसावचं लागतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर डोळ्यांच्या बाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

सतत लॅपटॉपवर काम करत असताना डोळ्याची आपण विशेष काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काय करायचं, हे जाणून घेऊया आजच्या लेखात.

१. प्रकाशाची व्यवस्था कशी असावी?

आपण ज्या ठिकाणी लॅपटॉपवर काम करायला बसतो त्या ठिकाणी योग्य प्रकाश असणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या आजूबाजूला अधीक तीव्र प्रकाश असेल किंवा अगदीच काळोख असेल तर त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना आपल्या डोळ्यावर जास्त ताण येऊ शकतो.

त्यामुळे आपण जिथे बसत आहोत तिथे योग्य प्रमाणात प्रकाश असणं महत्त्वाचं आहे. आपल्या लॅपटॉपचा ब्राइटनेस अगदीच जास्त किंवा अगदीच कमी असता कामा नये नाहीतर त्यानेही डोळ्यावर ताण येऊ शकतो.

२. डोळ्यांचा मसाज –

सतत लॅपटॉपवर काम करत असू तर दिवसातून साधारण दोन वेळातरी आपण डोळ्यांचा मसाज करायला हवा.

मसाज करण्यासाठी हातावर ॲलोव्हेरा जेल घेऊन अनामिकेने (करंगळीच्या बाजूचं बोट) डोळे बंद करून डोळ्यांच्या बुबुळांच्या ठिकाणी उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असा घड्याळाकृती पद्धतीत मसाज करा.

त्याने सतत लॅपटॉपकडे बघून आपले ताठरलेले डोळे जड वाटणार नाहीत. डोळ्यांना सूज येणार नाही. रोज दहा मिनिटे हा मसाज करावा.

३. स्क्रीनची वॉलपेपर सेटिंग अशी करा –

स्क्रीनवर आपण आपल्या आवडीनुसार वॉलपेपर लावतो पण तज्ञ सांगतात की, स्क्रीनवर कधीही हिरवा, नीला, पिवळा असे डोळ्याला टोचणाऱ्या रंगाचे वॉलपेपर लावू नये.

वॉलपेपर फिकट रंगाचा असावा. सोबतच स्क्रीनवरची अक्षरं ही सामान्य फॉन्टमध्ये असावीत. अक्षरांचा आकार ही अधीक मोठा किंवा अधीक छोटा नसावा.

४. २० – २० – २० चा फॉर्म्युला –

हा फॉर्म्युला अगदी सोप्पा आहे. आपण २० मिनिटे लॅपटॉपवर काम केल्यानंतर आपल्यापासून २० फुट दूर असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे २० सेकंदासाठी पहायचं याने डोळ्यांना स्क्रीनचा त्रास होत नाही.

५. अंतर किती असावं –

लॅपटॉपवर सतत काम करत असताना आपल्यात आणि लॅपटॉपमध्ये तीन फुटाचं अंतर ठेवा. जर ते शक्य नसेल तर दूसरा किबोर्ड घ्या आणि तो लॅपटॉपला जोडा म्हणजे लॅपटॉप योग्य अंतरावर ठेवून आपल्याला काम करता येईल आणि डोळ्यांना त्रासही होणार नाही.

६. चांगल्या डोळ्यांसाठी हे करायला हवं –

लॅपटॉपवर काम करता करता अनेकांना काही खाण्याची सवय असते. आपण एका हाताने खातो आणि तोच हात कसा तरी पुसुन पुन्हा किबोर्डला लावतो. त्यामुळे किबोर्डवर जंतु निर्माण होतात. किबोर्डला लावलेला तोच हात आपण डोळ्याला लावला त्यामुळे डोळ्याला खाज येणं, डोळ्यातून पाणी येणं.

डोळ्यांच्या कडांना फोड येणं सुरू होतं त्यामुळे लॅपटॉप वापरताना डोळ्याला हात लावणं टाळा. डोळ्यांना हात लावण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा. लॅपटॉप वेळोवेळी मऊसूत कापडाने स्वच्छ करा.

७. डोळ्यांचा ओलावा कायम ठेवण्यासाठी –

सतत लॅपटॉपवर काम केल्यामुळे आपल्या डोळ्यांना कोरडेपणा येतो आणि डोळ्यांची आग होते त्यासाठीच लॅपटॉपवर काम करताना दर एक दोन तासाने आपल्या डोळ्यांवर पाणी मारणं हे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं शिवाय डोळ्यांचा ओलावा टिकून राहतो डोळे चुरचुरत नाहीत किंवा डोळा येणं किंवा रांजनवाडी येत नाही.

८. लॅपटॉपची सेटिंग –

लॅपटॉपच्या स्क्रीनपासून आपल्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर ॲटी रिफ्लेक्शन काच लावून घेऊ शकतो. विशेष करून ज्या लोकांना चष्मा असतो त्या लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे कारण स्क्रीनचा प्रकाश चष्म्यावर परावर्तित होत नाही.

९. व्यायाम महत्त्वाचा –

जेव्हा आपलं लॅपटॉपवरचं काम होईल तेव्हा एक अर्धातास शांत बसा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. दोन्ही तळहात एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवा. डोळे वर–खाली, डावीकडे-उजवीकडे फिरवा. गोलाकार फिरवा. आपल्या नाकाच्या टोकाला तीनचार सेकंद पाहणं असे रोज डोळेचे व्यायाम करा.

१०. चष्मा असेल तर लावा –

अनेक लोक लॅपटॉपवर काम करताना चष्मा असूनही तो लावत नाही पण त्याने आपल्या डोळ्याचा नंबर वाढण्याची शक्यता जास्त असते.

चष्म्यामुळे आपल्या डोळ्यांच्या बुबुळांना सुरक्षित ठेवता येतं आणि डोळ्यावर ताण येऊन डोळे आणि डोकं दुखत नाही.

तर या आहेत काही गोष्टी ज्या काटेकोरपणे पाळून आपण डोळ्याची चांगली निगा राखू शकतो आणि लॅपटॉपवर उत्तमरीत्या कामही करू शकतो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि रोज लॅपटॉपवर काम करणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला हा लेख पाठवायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button