मराठा-इंग्रज पहिल्या युध्दातले हे होते महत्वाचे तह…
मराठा व इंग्रज ह्यांच्यात तीन महत्वाची युद्धे झाली. त्यातल्या पहिल्या युद्धतात काही तह झाले. अर्थात मराठ्यातील आंतरिक राजकारणाचा इंग्रजांना फायदा झाला. हे प्रथम युद्ध संपले ते सालबाईच्या तहामुळे. आजच्याच दिवशी म्हणजे १७ मे १७८२ ला हा तह करण्यात आला होता.
आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे आपल्याला नुकसान होत असते आणि ह्याचेच उदाहरण आहेत हे मराठा इंग्रज ह्यांच्यातील काही तह. आजच्या लेखात मराठा इंग्रज ह्यांच्यातील पहिल्या युध्दातल्या तहांबद्दल जाणून घेऊ.
पार्श्वभूमी : मराठे पानिपतावर जाऊन लढले तेव्हा भावी पेशवा विश्वासराव धारातीर्थी पडले. नानासाहेब देखील नंतर निधन पावले. आता पेशवेपद मधवरावांकडे आले होते. त्या दरम्यानच राघोबा दादांनी पेशवेपदावर आपला हक्क सांगितला होता.
त्यांच्या ह्याच राजकारणामुळे माधवरावांनी त्यांना नजरकैदेत ठेवले होते. पण पुढे माधवराव देखील निधन पावले आणि तेव्हा त्यांच्या लहान भावाकडे अर्थात नारायणरावांकडे पेशवाईची वस्त्रे आली.
नारायणरावांनी राघोबांना नजरकैदेतून मुक्त केले पण ते त्यांच्याच जीवावर बेतले. राघोबांनी काही लोकांना हाती धरून कट केला होता. स्वतःच्याच पुतण्याला त्यांना मारायचे होते.
नारायणरावांचा खून करण्यात आला. लगोलग राघोबांनी पेशवाईची गादी बळकावली. पण दरबारी मंत्र्यांना हे पटलेले नव्हते. काहीच महिन्यामध्ये नारायणराव ह्यांच्या विधवा पत्नीस पुत्र झाला. ह्यांचेच नाव सवाई माधवराव.
ह्यांनाच नंतर पेशवा करण्यात आले. एकूण काय तर कितीही खटाटोप करून न मिळणारे पेशवेपद राघोबांना आता हवेच होते. त्यासाठी त्यांनी इंग्रजांशी हात मिळवणी केली आणि जन्म झाला सुरत तहाचा.
सुरतेचा तह : राघोबांनी पेशवाईची वस्त्रं न मिळाल्यामुळे थेट इंग्रजांशी हात मिळवणी केली. इंग्रज काय हे काम निस्वार्थ मनाने करणार नव्हते त्यांना हवे होते मराठ्यांचे काही भूभाग, काही बंदरे. साष्टी हे ठिकाण व सुरतेचा महसूल इंग्रजांच्या नावे करून राघोबांनी हा तह अथवा करार केला होता.
इंग्रजांनी देखील स्वतःची २५०० इतकी फौज राघोबांना दिली. ती फौज घेऊन राघोबांनी पुण्यावर हल्ला केला पण मराठ्यांनी इंग्रजांचा व राघोबांचा संपूर्ण पराभाव केला. आता हा तह झाला तेव्हा तहाची कागदपत्रं व माहिती बंगाल मधील इंग्रजांच्या उच्च अधिकाऱ्यांना कळवण्यात आली.
त्यांना हा तह पटला नाही. राघोबाला त्यांचे समर्थन नव्हतेच. तेव्हा बंगाल मधील इंग्रजांनी हा तह रद्द करण्याचे फर्मान सुरतला धाडले व पुण्यात पेशव्यांना नवीन तह करण्यासाठीचे पत्र पाठवले. इंग्रजांनी आपला अधिकारी पुण्यात पाठवला व तिथे निर्माण झाला पुरंदरचा तह.
पुरंदरचा तह : ह्या तहानुसार इंग्रजांची मान्यता नारायणरावांच्या मुलाला सवाई माधवरावाला असेल असे दिसत होते. तसेच इंग्रजांना मराठ्यांचे मिळालेले प्रदेश पुन्हा द्यावे लागणार होते.
राघोबांना पेन्शन चालू करू असे पेशव्यांनी कबूल केले. पण इथून पुढे इंग्रजांनी मराठ्यांच्या कुठल्याच शत्रूशी संबंध ठेवायचे नाही असे ठरवण्यात आले. इंग्रजांना ह्या तहानिमित्त काही प्रदेश पेशव्यांनी दिले.
मात्र हे इंग्रजी वादळ पुन्हा पुण्यावर येण्याआधी आपणच सक्षम व्हायला हवे म्हणून पेशव्यांनी फ्रेंच लोकांना जवळ केले. अर्थात तेव्हा सवाई माधवराव लहान होते पण महादजी शिंदे, नाना फडणवीस हे लोक कारभार पाहत होते.
त्यांनी फ्रेंच लोकांना एक बंदर दिले व फ्रेंच तंत्रज्ञान ठाऊक असलेले शिपाई मागवले. हे इंग्रजांना कळताच त्यांना ह्या गोष्टीचा राग आला व इंग्रज मराठ्यांवर चालून आले. त्यांना महादजी शिंदे ह्यांना हरवले व तिथे वडगावचा तह झाला.
तहानुसार राघोबांना झाशीला पाठवण्यात आले व इंग्रजांनी मराठ्यांचे घेतलेले सर्व भूभाग पुन्हा द्यावे असे संगण्यात आले. इंग्रजांना हा तह मान्य नव्हता. त्यांनी मराठ्यांचे इतर प्रांत जिंकायला सुरुवात केली. त्यात अहमदाबाद, ग्वालियरची काही ठिकाणं इंग्रजांनी जिंकली.
त्यांनी महादजी शिंदेंच्या अखत्यारीत असणारे भाग देखील जिंकले आणि तेव्हा महादजी शिंदे ह्यांना बोलावले. मराठा व इंग्रज ह्यांच्यात समझोता होण्याकरिता महादजी ह्यांना पुढाकार घेण्यास सांगितले. तेव्हाच हा सालबाईचा तह झाला.
सालबाईचा तह:सालबाईच्या तहानुसार राघोबांना पेन्शन चालू राहणार होती. पण इथून पुढे मराठ्यांनी इंग्रज सोडून कोणत्याच युरोपीय लोकांशी संबंध ठेऊ नये असे ठरले. महादजी शिंदे ह्यांच्या मध्यस्थीने हा तह झाला होता.
मराठ्यांना त्यांचे प्रदेश इंग्रजांनी पुन्हा द्यावे व ठाणे आणि साष्टी ही ठिकाणं इंग्रजांकडे ठेवावीत असा हा तह पक्का झाला. मराठा व इंग्रज ह्यांच्यातील पहिल्या युद्धाला इथेच पूर्णविराम मिळाला.
पण आपल्याच लोकांमुळे आणि आपल्याच हव्यासापोटी इंग्रजांना ह्या गोष्टीचा फायदा झाला हे नक्की. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.