औरंगजेबाची साथ देऊनही प्राणाला मुकलेला जसवंतसिंग…
एकवेळ सापाला दूध पाजून तो फणा उगरणार नाही पण औरंगजेबावर विश्वास ठेवणे म्हणजे दगा होणारच. त्याच्यावर कसा विश्वास बसेल कोणाचा. आणि ज्यांनी तो विश्वास टाकला त्यांना ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्याचंच एक उदाहरण म्हणजे महाराजा जसवंतसिंग.
इमाने इतबारे नोकरी करूनही औरंगजेबाच्या हातून हा महाराजा मेला, असे इतिहास सांगतो. पण नेमका हा जसवंतसिंग कोण होता, त्याचे मुगल सलतनतीत काय योगदान होते, शिवरायांची आणि ह्याची कधी भेट झाली होती, तसेच ह्याच्या मृत्यूचे खरे कारण काय, हे पाहुयात आजच्या लेखात.
मुसलमानी राजवटींमध्ये बापाला मारून राज्य बळकवण्याची परंपरा होती. औरंगजेब आपला भाऊ मुराद बक्षा सोबत आपल्या बापाविरुद्ध लढायला येत होता. दारा शिकोह हा शहाजहानचा आवडता पुत्र. त्यानेच राज्य करावे असे शहाजहानला वाटायचे.
आणि म्हणूनच दारा शिकोह सोबत ह्या जसवंतसिंगला शहाजहानने पाठवले होते. औरंगजेब दक्षिणेतून येणार होता. त्याच्याकडे मोठमोठाल्या तोफा होत्या. पण रात्रीचा अचानक हल्ला केला तर औरंगजेब व त्याचे सैन्य नष्ट होऊन गेले असते. अशी संधी असूनही जसवंतसिंगला चुकीच्या वेळी आपले राजपुती तत्व आठवले.
‘आम्ही राठोड रात्रीच्या अंधारात वार करत नाही’, असे म्हणत त्याने दुसऱ्या दिवशी औरंगजेबावर हल्ला केला. ज्यात त्याच्या पदरी अपयश आले. पुढे औरंगजेबाने आपल्या बापाला कैदेत टाकले व भावांना मारून टाकले.
असे असले तरी औरंगजेबाने ह्या जस्वंतसिंगला मारले नाही. त्याला पूर्वीच्याच हुद्द्यावर कायम केले आणि औरंगजेबाच्या ह्याच कथाकथीत उदारपणावर भाळून जसवंतसिंग त्याचा नोकर झाला. अगदी आंधळी श्रद्धा ठेवून तो औरंगजेबाचे काम करू लागला.
अनेक मोहीमा त्याने मोगलांसाठी केल्या. त्याची स्वतःची दोन मुलं लढाईत शहीद झाली पण मोगलांची चाकरी त्याने सोडली नाही.
महाराष्ट्रात हा जसवंतसिंग आला तो शाहिस्तेखानसोबत. शिवरायांनी खानाची बोटे छाटली आणि सिंहगडाची वाट धरली. जसवंतसिंगचा वेढा असूनही महाराज सिंहगडावर पोहोचले. तसेच मराठी मावळ्यांनी ह्या जसवंतसिंगला चांगलेच पराजित केले.
आपल्या मावळ्यांना पाठ दाखवत पळणारा जसवंतसिंग महाराष्ट्राच्या इतिहासात मात्र भित्रा आणि पळपुटा ठरला. त्याचे पराक्रम केवळ उत्तर भारतात गाजले. अनेकदा पाठ दाखवून पळणारा हा जसवंतसिंग आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांसमोर उभा होता.
त्यामुळे शिवरायांना अधिकच राग आला. “ज्याने आम्हाला पाठ दाखवली तो आमच्या पुढे कसा?”, असा सवाल करत शिवरायांनी दरबाराचा त्याग केला होता. ही सारी जास्वंतसिंगाची कारकिर्द असली तरी त्याचा शेवट अतिशय वाईट झाला.
औरंगजेबाने केलेल्या अनेक मोहिमांमुळे मोगली खजिना रिकामा होत चालला होता. पण ह्या जोधपूरच्या राजपूत लोकांचा खजिना साठतो आहे, हे बघून औरंगजेबाला हे जोधपूर आणि समस्त मारवाड जिंकण्याची इच्छा झाली.
अर्थात ते इतकं सोप्पं नव्हतं. राजपूत लोक एकत्र आले तर आपले मोठे नुकसान होईल, हे औरंगजेब जाणून होता. आणि म्हणूनच त्याने जसवंतसिंगला अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठवले. तिथल्या लुटारू टोळ्यांचा बंदोबस्त करायला गेलेला जसवंतसिंग माघारी आलाच नाही.
औरंगजेबाने त्याला विष घालून मारले, असे इतिहासकार सांगतात. तर काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, ह्याच जसवंतसिंगाच्या एका मुलाला औरंगजेबाने विष घालून आग्र्यात मारले. त्याच धक्क्याने तो अफगाणिस्तानमध्ये मरण पावला. तो मेल्यानंतर औरंजेबाने लगोलग मारवाड जिंकले. सारा खजिना लुटला. मंदिरे फोडली.
जसवंतसिंग एक उत्तम कवीदेखील होता. ‘आनंद विलास’ आणि ‘भाषाबोध’ नावाचे त्याने ग्रंथ लिहिले होते. तरी मोगलाईत ह्या गोष्टीला किंमत नव्हती. स्वत: चा मेहुणा असूनही औरंगजेबाने त्याला मारले, त्याचे राज्य लुटले. अशी इमाने इतबारे सेवा करूनही जसवंतसिंगला कष्टाचे फळ मिळाले ते मृत्यूच.