इतिहासताज्या बातम्या

गनिमी काव्याने मोरे आणि शिर्केंनी दिली शत्रूस मात!

शिवरायांचा गनिमी कावा सर्वच शिवप्रेमींना माहित आहे. कमीत कमी सैन्यानिशी, कमीत कमी वेळेत, जास्तीत जास्त शत्रूचा संपूर्ण पराभव म्हणजे गनिमी कावा. हे एक शस्त्रच आहे जे मराठ्यांनी शोधून काढले होते.

महाराष्ट्रात ह्या तंत्राचा उपयोग शिवपूर्व काळापासून होता. पण नंतर हे तंत्र लोप पावत गेले नि महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. मोरे शिर्के ही आडनावे आपण अनेकदा ऐकली असतील. पण ह्याच शिर्के आणि मोऱ्यांनी गनिमी काव्याचा वापरत करत कसे शत्रूला यमसदनी धाडले होते हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

शिवकाळाच्या किमान तीनशे वर्षे आधी घडलेली ही घटना खरोखरच रोमहर्षक ठरली. शिवरायांनी देखील त्यातून आदर्श घेतला असेल. नेमके काय झाले होते पाहुयात.

यादवांचे साम्राज्य म्हणजे महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ होता. पण अल्लाउद्दीन खिलजी सारख्या क्रूर शासकाने कपट करत यादवांचे साम्राज्य नष्ट केले. तेव्हाच महाराष्ट्रात इस्लामी राजवट सुरू झाली. असे असले तरी संपूर्ण महाराष्ट्र खिलजीच्या हाती गेलेला नव्हता.

दक्षिणेत शिर्के आणि मोरे आपला तग धरून बसले होते. खिलजी नंतर बहमनी राजवट सुरू झाली तरीही ह्या मोरे आणि शिर्के घराण्याकडे कोणी वाकडी नजर टाकत नव्हते. कारण होते त्यांचे राज्य. मोरे जावळीचे राजे तर शिर्के कोल्हापूरचे.

विशाळगडाला राजधानी बनवून शंकरराव मोरे ह्यांनी राज्य केले तर शिर्के ह्यांनी कोल्हापुरात राज्य करत समुद्री आरमार उभे केले. जावळी सारखे भीषण जंगल आणि कोल्हापुरातून चालणारा व्यापार ह्या दोन्ही घराण्यांना सशक्त बनवत होता.

एकदा शंकरराव मोरे ह्यांचे बहमनी सुलतानाबरोबर युद्ध झाले. मोऱ्यांकडे खूप ताकद असल्याने बहमनीला माघार घ्यावी लागली. पण बहमनीच्या अल्लाउद्दीन नामक सुलतानाने आपल्या वजीराला मलिक तुज्जार ह्यास ही दोन्ही राज्य नष्ट करण्यासाठी पाठवले.

मलिक तुज्जारने सर्वप्रथम शिर्क्यांवर हल्ला केला. हे शिर्के पन्हाळगडावर होते. पन्हाळ्याला वेढा देऊन अनेक महिने झाले होते. पण शिर्क्यांनी शर्थीने तो किल्ला लढवला होता. किल्ल्याची रसद संपली म्हणून शिर्क्यांनी शरणागती स्वीकारली.

राजे शिर्के ह्यांना कैद करत मलिक तुज्जारने त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. पण आपणच का मुसलमान व्हायचे असा विचार करत राजे शिर्के तुज्जारला म्हणाले “आम्ही मुसलमान होण्यास तयार आहोत, पण आमचे सोयरे असणारे मोरे तिथे विशाळगडी आहेत.

त्यांना कैद करा त्यांच्या सोबतच आम्ही देखील धर्म स्वीकारू आणि बादशहाची नोकरी स्वीकारू.” मलिक तुज्जारला ही गोष्ट फायद्याची होती. एका दगडात दोन पक्षी मारता येत आहेत म्हटल्यावर त्याने होकार भरला.

मलिक तुज्जारच्या फौजेची पन्हाळ्याच्या युध्दातच दमछाक झाली होती. आता विशाळगड म्हणजे मोठे संकटच होते. हा तुज्जार ७००० ची फौज घेऊन निघाला होता. पण त्याच्या सोबत असणाऱ्या हबशी लोकांनी विशाळगडाकडे जाण्यास नकार दिला होता. मोठी फौज मागे राहिली होती. दोन दिवस चांगला प्रवास झाला.

ण तिसऱ्या दिवशी राजे शिर्के ह्यांनी अत्यंत बिकट वाट निवडली. काय वर्णन करावे जावळीचे नि कोल्हापुरतील जंगलाचे! ती वाट धरली आणि चौथ्या दिवशी मलिकाची फौज आजारी पडली. ते अरण्य इतकं भयाण होतं की वाघाला देखील भय वाटावे.

तिथल्या पाण्याचा आणि वनस्पतींचा विषारी वास, गवताचे झालेले टोकदार भाले आणि झाडे असून सुद्धा न खेळणारा वारा. सूर्याचे किरण देखील भूमीवर पडत नाही. गुहा पाहिली तर भूत पण दचकेल अशी भयानक.

एक मोठी दरी लागल्यानंतर राजे शिर्के ह्यांनी मुक्काम करण्याचा सल्ला दिला. सारी फौज तिथे थांबली. इतके घनदाट जंगल पार केल्यानंतर सारी मंडळी थकली होती. फौज निवांत झोपी गेल्यानंतर राजे शिर्के रात्रीच्या वेळी विशाळगडावर पोहोचले.
तिथे घडलेला प्रसंग सांगितला. पहाटेच्या सुमारास मोऱ्यांची फौज मलिकावर तुटून पडली. कोण कुठून येतंय हे कळेपर्यंत मलिकाची अर्धी फौज कापली गेली होती. मोरे आणि शिर्के विजयी झाले होते. जावळी आणि कोल्हापूरचे राज्य वाचले होते केवळ ह्या गनिमी काव्यामुळेच.
ही परंपरा महाराष्ट्रातल्या लोकांनी विकसित केली होती. कदाचित म्हणूनच शिवरायांनी अफझलखानाला जावळीत आणि सिद्दी जोहरला पन्हाळगडी आणले होते. हे गनिमी काव्याचे तंत्र खरोखर महत्वपूर्ण होते.
या घटनेनंतर देखील मोरे आणि शिर्के एकत्र राहिले आणि आपले राज्य ह्याच गनिमी काव्याच्या आधारे वृद्धिंगत करत राहिले. कसा वाटला हा गनिमी काव्याचा लेख? तुम्हाला आणखी अशी काही गनिमी काव्याची उदाहरणे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button