ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

आजच्या काळात स्मार्ट राहण्यासाठी नक्की करायचं काय?

आजच्या बदलत्या आणि धावत्या काळात स्वतःचा टिकाव लागण्यासाठी स्मार्ट असणं आवश्यक आहे असं आपण अनेकदा ऐकतो. पण नेमकं स्मार्ट असणं म्हणजे काय यातच अनेकांचा गोंधळ होतो. म्हणूनच या लेखात आपण स्मार्टनेसबद्दल आणि स्मार्ट असणाऱ्यामध्ये नेमकं काय वेगळेपण असतं याबद्दल जाणून घेणार आहोत.

१. परिस्थितीविषयक जागरूकता

दिवसागणिक आपण वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जात असतो. या परिस्थितीचा सामना कसा करायचा याची समज ज्या व्यक्तीला असते त्याला आपण स्मार्ट म्हणतो. मानसिक, भावनिक आव्हान निर्माण करणारी परिस्थिती, मनाविरुद्ध काही घडलं तर अशा प्रत्येकवेळी वागण्या – बोलण्याचं ज्ञान असायला हवं.

आव्हानात्मक परिस्थितीत जर आपणच घाबरुन जात असू तर परिस्थितीचा सामना करणं शक्य होणार नाही. त्याचे आणखीन विचित्र काही परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे स्मार्ट व्हायचं असेल तर परिस्थितीविषयी जागरुकता असणं अत्यंत गरजेचं आहे.

२. गरज असल्यास माहितीमध्ये बदल करणे

अनेकदा आयुष्यात काहीतरी न आवडणारं घडतं. एखादा आपल्याकडे काहीतरी बोललेला असतो ते दुसऱ्याला समजलं तर वाद निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याकडे असलेल्या माहितीत गरजेनुसार बदल करणं अतिशय गरजेचं आहे.

आपल्याकडील माहितीमध्ये बदल करुन जर वाद निर्माण होणं टळणार असेल तर तो बदल करणं आपल्याला जमलं पाहिजे. समजा, आपला तीन जणांचा ग्रुप आहे. आपण एक आहोत, दुसऱ्याने आपल्याला तिसऱ्याबद्दल काही वाईट सांगितलं तर ते त्या व्यक्तीपर्यंत जाऊ न देणं आणि भांडण टाळणं गरजेचं असतं. अशावेळी माहितीमध्ये बदल करुन वागणं महत्त्वाचं.

३. समस्या निवारण

समस्येचं निवारण करता येणं हे एक कौशल्य आहे. काही लोकं शिताफीने आयुष्यातल्या समस्या दूर करतात. तर काही लोकं एक समस्या सोडवता सोडवता दुसऱ्या समस्येत अडकून जातात. पण समस्या आली की समस्येतून काय मार्ग काढता येतील, समस्या कशी सोडवता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

समस्या आली म्हणून त्यावर रडत न बसता लवकरात लवकर त्यावर उपाय शोधण्यास आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ही सवय आपल्याला आयुष्यभरासाठी अतिशय मदतीची ठरेल. समस्यांपासून पळण्यापेक्षा त्या सोडवण्यावर, मार्गी लावण्यावर भर देणं आपल्या व्यक्तिमत्वात स्मार्टनेस आणेल.

४. ध्येयाबाबत स्पष्टता

आयुष्यात आपल्या प्रत्येकाचं काही ना काही ध्येय असतं. या ध्येयाबाबत स्पष्टता असली तरच ते पूर्ण करता येऊ शकतं. स्पष्टता नसेल तर वाट चुकलेल्या वाटसरुसारखं आपल्याला फिरत रहावं लागेल. त्यामुळे करीअर सेट करण्यापूर्वीच आयुष्यात ध्येय निश्चित करुन ते पूर्ण करण्याच्या मागे आपण लागलो पाहिजे.

आपली आवड नक्की कशात आहे, जे ध्येय आपण ठरवलं आहे ते पूर्ण करण्याची क्षमता, मेहनत घेण्याची तयारी आपली आहे का या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे.

जेणे करुन आपल्यावर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. शिवाय, योग्य नियोजनाने ध्येय ठरवून पूर्ण करणं यातून आपला स्मार्टनेस दिसतो.

५. इतरांबद्दल सहानुभूती आणि दया

आपण खूप स्मार्ट आहोत, आपल्या सगळ्या कामांमध्ये चोख आहोत म्हणून इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न कधीही करु नये. अशी माणसं इतरांना स्मार्ट नाही तर अहंकारी वाटत असतात. अहंकारी माणसाने आयुष्यात कितीही चांगलं यश मिळवलं तरी कोणीही त्याकडे सन्मानाने पाहणार नाही.

याउलट, सगळ्या कामात उत्तम करत असलेला, लोकांबाबत सहानुभूती असलेला, दया दाखवणारा माणूस सगळ्यांनाच आकर्षित करेल. लोकांना जिंकण्याचा त्याचा स्मार्टनेस सगळ्यांनाच आपलंसं करेल.

६. निर्णयक्षमता

निर्णयक्षमता हादेखील अतिशय महत्त्वाचा गुण स्मार्ट माणसांमध्ये दिसून येतो. परिस्थितीचं योग्य मूल्यमापन करुन वेळ न घालवता योग्य निर्णय अशी माणसं घेत असतात. स्वतःसाठी काय चांगलं आहे, हे अशा माणसांना व्यवस्थित समजतं.

त्यामुळे योग्य वेळेत योग्य गोष्टी ते घडवून आणत असतात. यामध्ये प्रत्येकवेळी निर्णय बरोबरच येतील असं नाही पण निर्णय चुकीचे ठरले तर ते स्वीकारण्याची जबाबदारीदेखील ते घेत असतात. हाच स्मार्टनेस प्रत्येक माणसात असणं गरजेचं आहे.

स्मार्ट माणसांमध्ये हे सगळे गुण आपल्याला बघायला मिळतात. आपणही हे सगळे गुण आत्मसात केले तर स्मार्ट व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाऊ शकू. लेखात दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button