इतिहासताज्या बातम्या

कशी होती शिवरायांच्या मावळ्यांची जीवनशैली?

स्वराज्यासाठी लढणाऱ्या सैनिकांना ‘मावळे’ म्हणण्यात यायचे आणि आज प्रत्येकजण स्वतःला मावळा म्हणवून घेतो. पण शिवरायांच्या काळातील मावळे कसे होते, ते कसे रहायचे? काय खायचे? कोणते वस्त्र परिधान करायचे?

त्यांचा पगार कसा होता? मोहिमेवर जाण्याची तयारी आणि महिमेवर असताना ते काय करायचे, या सर्व गोष्टी आणि शिवरायांच्या मावळ्यांच्या जीवनशैलीविषयी या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

मावळा कसा होता?

शिवरायांचे मावळे मऱ्हाटी मातीतले शेतकरी होते. मावळ भागतील लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केल्यामुळे सर्वांनाच मावळे म्हणत असावे असा तर्क इतिहासकार लावतात. रंगाने सावळे आणि देहयष्टी भक्कम असणारे काटक मावळे शिवरायांकडे होते.

अंगात बाराबंदी अर्थात मावळी पोशाख व डोक्यावर लाल रंगाची मावळी पगडी असायची. तेच पायात कोल्हापुरी चपला अन् कंबर बांधलेली, असा काही वेष मावळ्यांच्या होता.

ओठांवर मोठाल्या मिशा, हातात कडं आणि पायात तोडा. कमरेला तलवार, पाठीवर ढाल आणि हातात भाला असा शिवरायांचा मावळा होता.

मावळ्यांची उपजीविका कशावर होती?

शिवरायांचे मावळे दोन गोष्टींवर आपली उपजीविका भागवायचे. सर्वात पहिले प्राधान्य लढाईला व मोहिमेला असायचे. तसेच दुसरे साधन होते शेतीचे. शिवरायांनी मावळ्यांना वर्षाचा पगार द्यायला सुरुवात केली होती.

अर्थात पगार महिन्याला मिळायचा पण वर्षातील बाराही महिने हा पगार चालू असायचा. इतर बादशाह मंडळी त्यांच्या सैनिकांना आठ महिन्यांचा पगार द्यायचे. पण शिवराय आपल्या मावळ्यांना पावसाळ्यात देखील मोहीम नसताना पगार द्यायचे.

ज्या मावळ्याकडे स्वतःची जमीन असेल त्याने ती कसावी आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला सरकारी जमीन कसायला मिळायची. म्हणजेच मावळे आठ महिने मोहिमेवर असायचे तर चार महिने शेतीकाम करायचे.

मावळ्यांचा आहार :

त्याकाळातील जाती=व्यवस्थेनुसार मांसाहारी जेवण ब्राह्मण सोडून इतर जातींमध्ये निषिद्ध नव्हते. त्यामुळे आहार प्रत्येक मावळ्यांचा वेगळा असायचा. पण शेतकरी बहुसंख्य असल्याने भाकरी पिठलं, कालवण, कांदा असे पदार्थ जेवणात सहज असायचे.

पचायला जड असले तरी मावळ्यांच्या कसरतीमुळे आणि व्यायामामुळे हे जेवण अंगी पडायचे. सकाळी व्यायामानंतर दुधाचा मोठा प्याला रिजवायचा आणि सकाळी न्याहारी करून थेट संध्याकाळी जेवायचं असा आहार मावळे घ्यायचे. मध्ये भूक लागलीच तर डाळ, गूळ असे पदार्थ सोबतीला असायचे.

मावळ्यांची संपत्ती आणि वाहन व्यवस्था :

मावळ्यांकडे संपत्ती नसेल असे अनेकांना वाटते. अर्थात गरीब घरातून आलेल्या मुलांकडे संपत्ती नसली तरी महाराजांच्या मोठमोठ्या सरदारांची संपत्ती होती. वाडे, शेती, घर, विहिरी, गुर ढोरं, गायी म्हशी हीच मावळ्यांची संपत्ती होती.

त्या काळात गरजा कमी असल्याने अधिक संपत्ती लोक बाळगत नव्हते. वाहन व्यवस्था पहिली तर मावळ्यांकडे घोडा असायचा. काही मावळ्यांकडे स्वतःचा वैयक्तिक घोडा असायचा तर काहींना मात्र सरकारकडून घोडा मिळत होता.

ह्या घोड्याचा खर्च सरकारी खजिन्यातून मिळायचा. शेतकरी असल्यामुळे कुटुंब कबिल्यासाठी मावळ्यांकडे बैलगाडी असायची. काही पदार्थ किंवा जिन्नस पोहोचवायचे असेल तर गाढवाचा उपयोग मावळे करायचे.

मावळ्यांचे सण व सांस्कृती :

मावळ्यांना वेगळी अशी संस्कृती नव्हती. पण महाराष्ट्रात साजरे होणारे सामान्य लोकांचे सण हे मावळे साजरा करायचे. होळी, बैल पोळा, दिवाळी, जत्रा यात्रा हेच मावळ्यांचे सण असायचे. आपल्या ग्रामदैवतेची जत्रा तसेच पंढरीची वारी ही त्यावेळेसची संस्कृती होती.

मोहिमेवर असणारा मावळा :

मोहिमेवर जाणारे मावळे ठराविक असायचे. गडकिल्ल्यांच्या तटबंदीवरचे मावळे देखील ठरलेले असायचे. अनेकांची बदली व्हायची. एका किल्लेदाराला महाराज खूप वर्ष एका ठिकाणी ठेवत नसायचे. मोहिमेवर निघणार मावळा आपल्या घोड्यावर घोंगडी टाकायचा.

त्यावर दोन्ही बाजूने शस्त्र लावली जायची. त्या घोड्यावर मावळा बसून मोहिमेवर निघत असायचा. शक्यतो अनेकांच्या डोईवर फेटे बांधलेले असायचे. ह्याचा व घोंगडीचा फायदा रात्री झोपण्यासाठी अंथरून-पांघरून म्हणून व्हायचा.

मावळे स्वतःसोबत जास्त काहीही घेऊन जात नव्हते. मोहिमेवर शस्त्रांचे काम म्हणून शस्त्र तेवढी जपून नेली-आणली जायची.

शिवरायांना ह्याच मावळ्यांच्या साथीमुळे स्वराज्य निर्माण करता आले. अर्थात महाराजांनी केवळ पैसे देऊन त्यांना कामावर न ठेवता ह्या प्रत्येक मावळ्याला चारित्र्यसंपन्न बनवले होते. महाराजांचा नियम होता की, कोणीही दासी, बटीक, कलावंतीण बाळगायची नाही, कसलेच व्यसन करायचे नाही.

इतक्या परीक्षा देत एखादा व्यक्ती मावळा व्हायचा. मावळा धारातीर्थी पडला तर शिवराय त्याच्या घरातील लोकांना वर्षाला पैसे पुरवायचे अर्थात आजच्या पेन्शनप्रमाणे ते घर चालायचे. म्हणूनच शिवरायांचे मावळे इतर सैनिकांच्या तुलनेत वेगळे ठरले. जय शिवराय!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button