ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

सायकल चालवण्याचे हे आहेत अप्रतिम फायदे…

आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी लोक मॉर्निंग वॉक, जॉगिंग त्याचबरोबर योग किंवा जिमला जाऊन घाम गाळताना दिसतात. पण याच्या जोडीला ज्यांची संख्या तुरळक दिसते, ते सायकल चालवणारे लोक असतात.

सायकलिंग करण्याचे खूप फायदे आहेत. आपणही या लेखातून सायकल चालवण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात,

सायकलिंग हा एरोबिक्स या व्यायाम प्रकाराचा एक भाग आहे. यामुळे आपल्याला या प्रकारचे फायदे होतात.

सायकल चालविल्यामुळे स्नायूंना बळकटी मिळते.

सायकल चालवण्यामुळे मांड्या, पोटऱ्या यांचे स्नायू कार्यान्वित होऊन त्यांचा चांगला व्यायाम होतो. सायकल सतत चालवत ठेवण्यासाठी शरीरात जास्त लांबीच्या असलेल्या स्नायूंवर ताण येतो. म्हणून हे स्नायू मजबूत आणि बळकट होतात.

जिममध्ये लोअर बॉडी अर्थात कंबरेखालील स्नायू सुदृढ करण्यासाठी वजन घेऊन उठा बशा काढणे, लेग प्रेस यासारखे मांड्या, पोटऱ्या इ.चे व्यायाम करायला सांगितलं जातं. त्यामुळे जे फायदे होतात तेच सायकलिंग केल्याने अधिक चांगल्या प्रकारे होतात.

सायकलिंग केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते

जे लोक नियमितपणे सायकलिंग करतात त्यांचे वजन कायम नियंत्रणात असते. कारण नियमितपणे आणि कायम वेगवानपणे सायकलिंग केल्यामुळे पोट आणि मांड्या यांना चांगला व्यायाम मिळतो. शरीरातील कॅलरिज जाळण्यास मदत होते. या भागात चरबी साठत नाही म्हणून आपले वजन वाढत नाही.

सायकलिंग केल्यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो –

नियमित सायकलमुळे तुमच्या शरीरातील तग धरण्याची क्षमता वाढते. ज्यांना व्यायामाची सवय त्यांना काही आजारपण आल्यास खंड पडतो आणि बरे झाल्यावर सुरूवातीला अवघड व्यायामप्रकार करणं जमत नाही.

तेव्हा शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी सायकलिंग करण गरजेचं आहे. खेळाडूंना आजारपणातून किंवा दुखापतीतून सावरल्यानंतर सायकल चालवण्याचा सल्ला दिला जातो.

हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते –

सतत वेगाने सायकल चालवताना हृदयाची क्रिया नियमित होते. यामुळे हृदय रक्त संचालनासाठी अधिक कार्यक्षम होते. जर हृदयाचे काम नीट चालू असेल तर संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा नीटपणे होतो.

हृदयाचे योग्यप्रकारे पंपिंग होत असल्यामुळे शरीरातील कॅलरिजही खूप जळतात. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल अर्थात अपायकारक चरबीचा थर रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला जमा होत नाही, म्हणूनच हृदयाविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होतो.

मिळते कर्करोगापासून संरक्षण –

सायकल चालवण्यामुळे आपल्या आरोग्यावर होणारा महत्वाचा परिणाम म्हणजे कर्करोगासारख्या भयंकर दुखण्यापासून होणारं आपलं संरक्षण. कॅन्सरच्या विळख्यात न अडकण्यासाठी आपल्याला सायकल चालवणं आवश्यक आहे.

ज्या व्यक्तींना सायकलिंग करण्याची सवय आहे, ते लोक कॅन्सरपासून दूर राहतात. कॅन्सर झालेल्या व्यक्तींना बरे होण्यासाठीही चांगली मदत होऊ शकते, असं अनेक संशोधनात आढळलेलं आहे.

मधुमेहाचा त्रास होत नाही –

विशिष्ट शिष्ठ जीवनशैलीमुळे मधुमेह अनेकांना होतो. मधुमेहामध्ये टाईप २ मधुमेह झालेल्यांची संख्या जास्त असल्याचं आढळून येतं. व्यायाम किंवा शारीरिक हालचाल जास्त नसल्यामुळे मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे.

जे लोक दिवसभरात अर्धा तास तरी सायकलिंगचा व्यायाम करतात त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो. शिवाय नियमित सायकलिंगमुळे मधुमेह नियंत्रणातदेखील येऊ शकतो.

हाडांच्या वाढीसाठी उपयोगी –

सायकलमुळे स्नायूंचा चांगला व्यायाम होतो तसाच तो हाडांचाही होतो. सायकलिंग हा सोपा व्यायाम आहे. यासाठी लहान मुलांना सायकल चालवण्यास शिकवले जाते.

सांधे लवचिक राहतात –

सायकल चालवण्यामुळे ज्याप्रमाणे हाडांवर परिणाम होतो तसाच तो सांध्यांवरही होतो. सायकलिंगमुळे सांध्यांवर जास्त ताण येत नाही.

बाकी व्यायामप्रकारांमध्ये त्याचा जास्त ताण सांध्यांना येऊ शकतो. मांड्या, गुडघे आणि पावलांच्या सांध्यांना यामुळे योग्य व्यायाम मिळतो. सांध्यांमधील वंगण कमी होत नाही त्यामुळे सांधेदुखीचा जास्त त्रास होत नाही.

मानसिक आरोग्य सुधारते

सायकलिंगमुळे केवळ शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते. सायकलिंग आणि कोणतेही खेळ सोडले तर सर्व व्यायाम आपण बंद खोलीत करतो. सायकलिंग मात्र मोकळ्या जागेवर करतो. त्यामुळे मन प्रसन्न राहते.

याचा निश्चितच परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. मुळात व्यायाम केल्यामुळे आपण ताजेतवाने होतो. कारण शरीरातील सर्व संप्रेरके म्हणजेच हॉर्मोन्स योग्य प्रमाणात स्त्रवली जातात. जर शरीरातील रासायनिक चक्र नीट आहे तर बाकी सर्व गोष्टी आपसूकच सुरळीत होतात.

तर असे हे सायकलिंग करण्याचे फायदे. इतके फायदे वाचून लगेच सायकल घ्यायला जाण्याआधी काही काळजी घेणे आवश्यक आहे…

– आपल्या उंचीला साजेशी सायकल घ्यावी.

– सायकलची सीट कडक नसावी व आरामशीर चालवता यावं, अशी असावी.

– सायकल रहदारीच्या ठिकाणी चालवताना वाहतुकीचे नियम जरूर पाळावेत व आपल्या सुरक्षेसाठी गुडघ्यांना तसेच कोपरांना सुरक्षेसाठी पॅड घालावेत.

– बाहेर जाऊन सायकलिंग करणे शक्य नसल्यास घरी जिममध्ये असते तशी सायकल खरेदी करून घरी व्यायाम करावा.

– पाठीच्या मणक्यांचा त्रास असणाऱ्यांनी ही सायकलिंग करणं फायदेशीर आहे.

ही अशी काळजी घेऊन सायकल चालवत रहा व आपलं आरोग्य स्वस्थ ठेवा. तुम्हाला सायकलिंगचा काय अनुभव आहे हे आमच्याशी नक्की शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button