ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

पहिल्या पावसाचे पाणी अंगावर घ्यावे की नाही?

उन्हाळ्यात गरमीमुळे आपण सगळेच हैराण झालेले असतो. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस येतोय आणि आपण पावसात चिंब चिंब भिजतोय असं प्रत्येकाच्या मनात असतं. आपल्याकडे पहिल्या पावसाचं पाणी अंगावर घ्यावं, असंही म्हटलं जातं पण पहिल्या पावसात अजिबातच भिजू नये, असं डॉक्टर सांगतात.
मग नक्की काय करावं? पहिल्या पावसात भिजावं की नाही, असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना! म्हणूनच पहिल्या पावसाचं पाणी अंगावर घ्यावं की नाही जाणून घेऊया आजच्या लेखात.
काय आहे मान्यता –
फार पूर्वीपासून आपल्याकडे पहिला पाऊस अंगावर घेण्याची मान्यता आहे. आपले आजी-आजोबाही आपल्याला पहिल्या पावसात भिजण्यासाठी पाठवत असत. यामागे त्यांचं काय लॉजिक असायचं तर, आपण उन्हाळ्यात खूप उष्ण फळे खालेली असतात जसं की आंबे, फणस, करवंद इ. त्यामुळे आपल्या शरीरातही अधिक उष्णता वाढलेली असते.
त्या उष्णतेचा परिणाम आपल्या त्वचेवर पाहायला मिळतो. आपल्या शरीरावर उष्णतेने घामोळी आलेली असतात. त्वचेला खाज, लालसरपणा आलेला असतो म्हणून जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा पावसाच्या पाण्यात असे काही गुणधर्म असतात ज्याने आपल्या शरीरावरील सर्व घामोळी नाहीशी होतात. शरीराला थंडावा मिळतो म्हणून पहिला पाऊस पडू लागला की त्या पावसाचं पाणी अंगावर घेण्याची मान्यता आहे.
पहिल्या पावसाचं पाणी अंगावर का घेऊ नये –
काळानुसार गोष्टी बदलत गेल्या आणि आपण त्या स्वीकारल्या. तसंच काळानुसार आपल्या निसर्गातही अनेक बदल झाले आहेत. प्रचंड प्रदूषण इ. मुळे कुठे ना कुठे आपल्या निसर्गावर, वातावरणावरही त्याचा परिणाम झालेला आहे त्यामुळे पहिल्या पावसाचं पाणी अंगावर का घेऊ नये हे डॉक्टर का सांगतात ते पाहूया.
वातावरणातील उष्णतेमुळे आपल्या शरीराचं उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असतं. पावसामुळे हवामानात गारवा येतो. आपल्या शरीरातील उष्णता आणि पावसाचा गारवा याचं तापमान जुळून न आल्यामुळे आपल्याला लगेचच सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. आपली रोग प्रतिकार शक्तीही त्या दरम्यान कमी असते.
पावसाची प्रक्रिया सुरू असताना हवेतली माती, धुळ हे पाण्याच्या संपर्कात येतात. शिवाय उन्हाळ्यात समुद्राचं पाणीही मातीमुळे खराब झालेलं असतं. त्याच पाण्याचं बाष्पीभवन होतं. त्यामुळे पहिल्या पावसाचं पाणी खराब असतं.
या पाण्यामुळे आपल्याला खरुज होऊ शकते, खाज आणि फोड असे त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात. शिवाय आपल्या केसातही प्रचंड कोंडा होऊ शकतो.
काही अभ्यासक असं ही सांगतात की, बहुतेकदा पहिला पाऊस हा हवामान अभ्यासकांचा अभ्यासाचा विषय असल्यामुळे ते पावसावर काही रासायनिक प्रक्रिया करून पाऊस पाडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अनेकदा पावसाच्या पाण्यात रासायनिक घटक असतात जे काही प्रमाणात आपल्यासाठी घातकही ठरू शकतात.
पावसाची नैसर्गिक प्रक्रिया घडत असताना अनेकदा पाण्यात ॲसिडसारखे घटक तयार होतात. पहिल्या पावसात काही प्रमाणात अशा ॲसिडचं प्रमाण असू शकतं ज्याने आपल्या शरीरावर मोठाले फोड किंवा एलर्जी होऊ शकते.
कोणत्या पावसात भिजावं –
पहिल्या पावसात भिजायचं नाही, असं सांगितल्यावर अनेक जण म्हणतात मग आम्ही पावसाची मजा कधी लूटायची? तर यावर डॉक्टर सांगतात की, शक्यतो तीन वेळा पाऊस पडून गेला की आपण पावसात मनसोक्त भिजू शकतो, पावसाचा भरभरून आनंद लुटू शकतो कारण त्यावेळेस पावसाचं पाणी हे खराब नसतं. शिवाय आपल्या शरीराचं तापमानही बाहेरच्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेणारं झालेलं असतं त्यामुळे तीन वेळा पाऊस पडून गेल्यानंतर पावसात भिजा.
अशी काळजी घ्या –
पावसात भिजण्याच्या आंनदात आपण चिखलात, साठलेल्या पाण्यात उड्या मारतो पण त्यामुळे आपल्या शरीरावर असंख्य किटाणू पसरतात ज्याने आपण आजारी पडू शकतो. यासाठी पावसात भिजताना साठलेल्या पाण्यापासून दूर रहा.
घरी गेल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ करा. पाणी उकळून प्या. रोज भिजू नका. भिजल्यास रोज न चुकता गरम पाण्याने वाफ घ्या. विनाकारण घराबाहेर जाणं टाळा. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवारातही हा लेख नक्की पाठवा. स्वत:ची आणि त्यांची काळजी घ्या!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button