इतिहासताज्या बातम्या

स्वातंत्र्यानंतर बटुकेश्वर दत्त यांचे काय झाले?

भारत देशात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. काहींना त्या काळात विरोध झाला काहींना तर आजही होतो. भारतात एक गोष्ट मात्र चुकीची झाली. स्वातंत्र्य मिळवल्या नंतर ह्याच स्वतंत्र भारतात सावरकरांना जेलमध्ये जावे लागले होते.

अशीच काही परिस्थिती इतर क्रांतिकारकांची देखील झाली. भगत सिंग ह्यांच्या सोबत ज्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला त्या बटुकेश्वर दत्त ह्यांना भारत केव्हाच विसरला आहे. स्वतंत्र भारतात उपजीविकेसाठी त्यांना सिगारेटच्या कंपनीमध्ये काम करावे लागले असे म्हणतात.

आजही बटुकेश्वर दत्त ह्यांना क्रांतिकारक म्हणून मान मिळत नाही. आजच्या लेखामधून त्यांच्या कार्याचा आपण मागोवा घेणार आहोत. देशासाठी जीव धोक्यात घालणारे बटुकेश्वर नेमके कसे होते, चला पाहुयात.

बटुकेश्वर ह्यांचा जन्म बंगालमध्ये १८ नोव्हेंबर १९१० ला झाला. मॅट्रिकच्या वर्षाला असताना ह्यांचे आईवडील वारले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते कानपूरला गेले होते. तिथे पी.पी.एन. महाविद्यालयात त्यांची ओळख भगत सिंग ह्यांच्या सोबत झाली.

भगत सिंग ह्यांचे क्रांतीचे व देशभक्तीचे विचार पाहून बटुकेश्वर त्यांच्यासोबत राहू लागले. नंतर ते “हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन” मध्ये सहभागी झाले. बटुकेश्वर दत्त आता देशभक्तीचे नि स्वातंत्र्याचे कार्य करू लागले होते.

काही वर्षातच त्यांनी बॉम्ब बनवण्याचे शिक्षण घेतले. बॉम्ब कसे बनतात, कसे हाताळले जातात, किती खर्च असतो हे सारे काही शिकून घेतल्यानंतर त्यांनी आग्र्यात स्वतःचा एक गुप्त कारखाना चालू केला. ह्यात बॉम्ब बनवून ते क्रांतीकारकांना पुरवत असायचे.

सायमन कमिशनला विरोध करत असताना लाला लजपतराय ह्यांच्यावर इंग्रजांनी काठ्यांचा मारा केला, त्यात ते मरण पावले. ह्याच गोष्टीचा सूड म्हणून भगत सिंग ह्यांनी एका इंग्रज अधिकाऱ्याला मारले होते. भगत सिंग पुढे कलकत्त्यात आले आणि त्याच दरम्यान “जन संरक्षण बिल” व “ट्रेड डिस्प्युट बिल” निर्माण होणार होते.

ह्यातील ‘जन सुरक्षा बिला’चा वापर ज्या व्यक्तीवर संशय असेल त्याच्यावर खटला दाखल न करता अटकेत ठेवण्यासाठी केला जाणार होता. तसे अधिकार इंग्रज पोलिसांना मिळणार होते. तर ‘ट्रेड डिस्प्युट बिल’ हे कोणत्याही कामगाराचा संप पुकारण्याचा अधिकार हिरावून घेणार घेणार होते. ह्यात सामान्य लोकांना त्रास होणार होता. शिवाय कष्टकरी लोकांच्या विरोधातला हा कायदा होता.

म्हणूनच भगतसिंग ह्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडायचे ठरवले. ह्यात स्वतःहून पोलिसांच्या हवाली जायचे आणि आपला विचार प्रसार माध्यमातून जगामध्ये पोहोचवायचा हा उद्देश होता. तेव्हा भगतसिंग ह्यांच्यासोबत बटुकेश्वर दत्त होते.

दोघेजण ८ एप्रिल १९२९ ला असेंब्ली मध्ये शिरले व बाल्कनीतून रिकाम्या जागी बॉम्ब फेकला. तेव्हा ह्या दोघांनी इन्कलाब जिंदाबाद व साम्राज्यवाद मुर्दाबाद असे नारे दिले. ठरल्याप्रमाणे दोघांनीही स्वतःला पोलिसांच्या हवाली केले. त्यांच्यावर खटला भरला व दोघांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

भगत सिंग ह्यांना सँडर्स हत्येप्रकरणी फाशी सुनावण्यात आली. तेव्हा बटुकेश्वर दत्त म्हणाले, “माझे भाग्य कमी म्हणून मला फाशी नाही मिळाली.” त्यावर भगतसिंग ह्यांनी बटुकेश्वर ह्यांना समजावले की जेलमध्ये राहून देखील समाजसेवा करावी.

“तुला संधी मिळाली आहे, देशासाठी जग.” भगतसिंग ह्यांचे हे शब्द ऐकून बटुकेश्वर दत्त ह्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांना १९३८ मध्ये सोडण्यात आले. नंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. ‘भारत छोडो’ ह्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना पुन्हा चार वर्षांसाठी अटक करण्यात आली. १९४५ ला त्यांना सोडण्यात आले.

पण ह्याच दरम्यान त्यांना क्षयरोगाचा त्रास सुरू झाला होता. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले पण बटुकेश्वर प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांनी नंतर लग्न केले.

असं म्हणतात की, त्यांनी सिगारेटच्या कंपनीमध्ये उदरनिर्वाहासाठी काम केले. बिस्कीटच्या कंपनीमध्ये देखील त्यांनी काम केले. इतकेच नाही तर टुरिस्ट गाईड म्हणून त्यांना काम करावे लागले.

असे होत असताना ते नंतर आजारी पडले. ज्या लोकांना त्यांचे कर्तृत्व माहिती होते त्यांनी ही बातमी पसरवली तेव्हा कुठे त्यांना थोडी मदत करण्यात आली. पण नंतर आजारपणामुळे दिल्ली मधील एम्स दवाखान्यात त्यांना ठेवण्यात आले.

पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले की, “मी स्वप्नात देखील हा विचार केला नव्हता की ज्या दिल्लीमध्ये मी बॉम्ब फोडला तिथे मला असे आजारपणात पडून राहावे लागेल. आता माझी शेवटची इच्छा हिच आहे की, माझे मित्र भगतसिंग ह्यांच्या समाधी जवळ माझे अंतिम संस्कर करण्यात यावे.”

अखेर २० जुलै १९६५ ला त्यांचे निधन झाले व त्यांच्या इच्छेनुसार हुसैनवालीमध्ये त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. आज देखील असे अनेक क्रांतिकारक आहेत ज्यांची नावे आपल्याला माहिती नसतात. पण त्यांच्या त्यागामुळे आपल्याला हे सोन्याचे दिवस लाभले. आता तरी त्यांच्या स्मृती आपण जागवत ठेऊया!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button