इतिहासताज्या बातम्या

वास्को-द-गामा भारतात का आणि कोणत्या मार्गाने आला?

वास्को-द-गामा इतिहासातले असे एक नाव आहे ज्यामुळे युरोपीय देशांना प्राचीन खजिन्याचा शोध लागला होता. आयुष्यात एकदा तरी भारताचे दर्शन व्हावे अशी आस घेऊन बसणाऱ्या युरोपीय लोकांचे स्वप्न ह्याच वास्को-द-गामाने पूर्ण केले. ह्याने भारताचा शोध लावला असे आपण म्हणतो. अर्थात युरोप ते भारत जलमार्गाने प्रवास करणारा हा पहिलाच व्यक्ती होता.

आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला विळखा घालून त्याने अखेर १४९८ मध्ये भारतात पोहोचला होता. कोण होता हा वास्को-द-गामा? का शोधायचा होता ह्याला भारत देश? कसा झाला ह्याचा प्रवास? भारतात आल्यानंतर त्याने काय केले अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या लेखात.

वास्को-द-गामा ह्याचा जन्म पोर्तुगाल मध्ये सुमारे १४६० च्या दरम्यान झाला आणि त्याचे शिक्षणही तिथेच पूर्ण झाले. ह्याचे वडील काही वतनदारांकडून कर वसूल करायचे. वास्कोची वैयक्तिक माहिती आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये. पण त्याने पोर्तुगाल मध्येच नौसेनेचे प्रशिक्षण घेतले होते असे म्हटले जाते.

अनेकांना गैरसमज असतो की हा वास्को-द-गामा इंग्रज होता. पण हा धर्माने ख्रिस्ती असला तरी तो होता पोर्तुगाली. दुसरा एक गैरसमज असा आहे की वास्कोने भारत देशाचा शोध लावला. खरं तर यामध्ये एक घोळ होतो,

त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एखादी आधीच अस्तित्वात असलेली जागा, वस्तू, वास्तू ह्या जर नव्याने उजेडात आल्या तर त्याला इंग्रजीत Discovery असं म्हटलं जातं. फोन ग्रामोफोन, इंजिन यांचा शोध लावला याला इंग्रजीत Invention असं म्हटलं जातं. Discovery आणि Invention या दोन्हीसाठी मराठीत ‘शोध लावणे’ हा एकच वाक्प्रचार वापरला जात असल्याने वास्को-द-गामाने भारताचा शोध लावला असं म्हटलं जातं.

इंग्रजीत लिहिलेल्या या इतिहासाचं भाषांतर करताना आपण ह्या Discovery चा अर्थ ‘शोध लावला’ असा घेतला आणि तोच अर्थ कायम झाला. तसं शोध लावणे आणि शोधून काढणे असा फरक आपण करू शकतो. वास्कोने भारतात पोहोचण्याचा जलमार्ग शोधून काढला,

भारत देशाचा शोध नाही लावला. कारण भारत देश आणि इथली समाजव्यवस्था युरोपपेक्षा जुनी आहे. वास्को हा नौसेनानी असल्यामुळे त्याने युरोपीय लोकांसाठी भारताकडे येण्याचा मार्ग शोधून काढला होता.

भारत अति प्राचीन देश आहे. इथे मसाले, रत्न, सोने, खाद्य पदार्थ, कापड सारे काही उपलब्ध होते. म्हणूनच युरोपीय लोकांची नजर ह्या देशावर होती. वास्कोला भारताकडे पाठवण्या आधी पोर्तुगाली लोकांनी भारताविषयीचा खूप गहन अभ्यास केला होता.

कधी निघायचे, कसे निघायचे, बरोबरीला काय घ्यायचे. इतकेच नाही तर नकाशे, खाद्य पदार्थ, कपडेलत्ते सारे काही ह्या लोकांनी सोबतीला घेतले होते. अखेर वास्को-द-गामा भारताकडे निघणार होता. तटावर सारे लोक जमले होते.

राजा प्रजा सारे लोक एका मोठ्या आशेने ह्या मोहिमेकडे पाहत होते. काही विशिष्ट पाद्री लोक तिथे उभे होते. किनाऱ्यावर चार जहाजं सज्ज होती. जोरजोरात लाटांचा मारा त्या जहाजांवर होत होता. त्यातल्या एका जहाजावर नेतृत्व करणारा वास्को हातात नकाशा घेऊन उभा होता.

त्याच्या नजरेसमोर केवळ भारत देश उभा राहत होता. कोलंबसचे काय झाले हे सर्वांना माहिती होते. आता मात्र भारताचा शोध लागणे गरजेचे होते. काही विशेष धाटणीच्या तोफा ह्या जहाजांवर चढवल्या होत्या आणि सोबत १७० लोक घेऊन वास्को-द-गामा निघाला होता. मागून प्रार्थना म्हणणाऱ्या पाद्री लोकांचा आवाज येत होता.

वास्को-द-गामाला माहिती होते की ह्या मोहिमेत काहीही होऊ शकते. कदाचित साऱ्यांचाच मृत्यू ओढावेल किंवा आपण भारतात पोहोचू सुद्धा. भारत शोधून काढणे हे ऐतिहासिक ठरणार होता आणि म्हणूनच वास्कोने हे पाऊल उचलले होते.

वास्को आफ्रिकेत आल्यानंतर त्याला तिथून भारतात जाणारा मार्ग शोधून काढायचा होता. रात्रीच्या अंधारात सुई सापडण्यासारखी ही अति कठीण गोष्ट होती. पण व्यापाराकरिता आलेला एक गुजराती-मुसलमान माणूस वास्कोला भेटला.

त्यानेच रस्ता दाखवला आणि आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून अखेर वास्को १० महिने आणि १२ दिवसांनंतर वास्को आपल्या काफिल्यासह भारतात पोहोचला.

वास्को-द-गामा भारतातील कालिकतला आल्यानंतर तिथल्या राजाने त्याचे जंगी स्वागत केले. भारतीयांच्या परंपरेचे पालन राजाने केले होते. वास्को कालिकतला आला तेव्हा तिथल्या राजाला त्याने लाल टोपी, पितळी भांडे आणि साखर व मध आणले होते.

त्याच्या ह्या हलक्या भेटवस्तू पाहून लोकांना तो राजा नव्हे तर लुटारू वाटू लागला. भारतीयांनी पोर्तुगाली लोकांवर हल्ला केला. आपले लोक मारले जात आहे हे पाहून वास्कोने जहाजातल्या तोफा डागायला सुरुवात केली. अनेक इमारती तोफगोळा लागून खाली पडल्या. राजाला पळून जावे लागले.

वास्कोने हाती लागेल ती लूट व मसाला इत्यादी पदार्थ जहाजात भरले. आता परतीचा प्रवास चालू झाला होता. परतीच्या काळात वास्कोचे खूप मोठे नुकसान झाले होते. एक जहाज समुद्रात बुडले होते. १७० पैकी आता केवळ ५४ लोक पोर्तुगालला पोहोचले होते.

नंतर अनेकदा वास्कोने भारतावर मोहिमा केल्या. अखेर कोची इथे २४ डिसेंबर १५२४ ला त्याचा मृत्यू झाला. ह्यांच्याचमुळे भारतात पोर्तुगाली लोकांचे येणे सुरु झाले होते. बटाटा, टोमॅटोची ओळख भारतीयांना ह्याच लोकांमुळे झाली असली तरी त्यापेक्षा हजारो पटीने भारतीयांचे नुकसान झाले होते हेही तितकेच खरे. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button