इतिहासताज्या बातम्या

कोण होते क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल?

रामप्रसाद बिस्मिल म्हणजे शस्त्रातला तिखटपणा आणि लेखणीतला प्रेमळगंध. अर्थात हे प्रेम भारतमातेसाठी. हा तिखटपणा देखील भारताच्या संरक्षणासाठी नि स्वातंत्र्यासाठी. इंग्रजांनी अनेक क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा दिली त्यातलेच एक रामप्रसाद बिस्मिल होते. सशस्त्र मार्ग निवडत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. आज ११ जून त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यकाळाबद्दल, कर्तृत्वाबद्दल आपण जाणून घेऊयात.

रामप्रसाद बिस्मिल ह्यांचा जन्म उत्तर भारतातील शाहजहानपूरमध्ये ११ जून १८९७ रोजी झाला. मूलमती आणि मुरलीधर तोमर हे रामप्रसाद ह्यांचे आईवडील होते. तोमर हे राजपुतांमधील खानदानी घराणे होते. रामप्रसाद ह्यांचे लहानपण खेळण्याच्या बाबतीत इतर मुलांसारखे गेले असले तरी शिक्षणाबाबतीत त्यांचे आयुष्य थोडे वेगळे होते.

त्यांच्या वडिलांना हिंदी येत असल्यामुळे रामप्रसाद हिंदी भाषा चटकन शिकले. तसेच त्यांच्या वडिलांनी त्यांना एका मौलवीकडे उर्दू शिकण्यास पाठवले. लहानपणी त्यांना ह्या दोन भाषा अवगत होतायत तोच त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी माध्यमातील शाळेत घातले.

अर्थात वडिलांच्या कृपेने रामप्रसाद ह्यांची ओळख अनेक भाषांसोबत झाली. ज्याचे फळ असे की रामप्रसाद उत्तम कविता लिहू लागले. रामप्रसाद ह्यांना लहानपणी आणखी एक गोडी लागली ती म्हणजे आर्य समाजाची. आर्य समाजातील विचार, त्यांचे आचरण आणि मंदिर इत्यादी गोष्टी रामप्रसादांना आवडू लागल्या होत्या.

त्यांच्या आयुष्याला मोठे वळण लाभले ते सोमदेव ह्यांच्या भेटीनंतरच. एकदा रामप्रसाद आर्य समाजातील मंदिरात गेले असता तिथे स्वामी सोमदेव बोलत होते. त्यांच्या मुखातून देशभक्ती विषयी वाक्य बाहेर पडत होते. इंग्रजांनी केलेले अत्याचार ते सांगत होते.

त्यांनी सद्य:स्थिती बद्दल बोलायला सुरुवात केली आणि रामप्रसाद ह्यांची देशभक्ती वाढू लागली. आपल्याकडील लिखाणाचा आपल्या देशाला फायदा व्हावा असे रामप्रसाद ह्यांना वाटू लागले. तसेच कधी काळी वेळ पडली तर हाती शस्त्र देखील घेता आले पाहिजे म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतिकारकांच्या भेटी घेतल्या.

त्यांच्या आयुष्यात ‘मणिपुरी चा कट’ हा अत्यंत महत्वाचा प्रसंग ठरला होता. त्यांनी अनेक क्रांतिकरांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हा त्यांची भेट झाली गेंदालाल दीक्षित ह्यांच्याशी. गेंदालाल दीक्षित हे देखील मोठे क्रांतिकारक असल्याने त्यांच्या विचारांचा प्रभाव रामप्रसाद ह्यांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो. गेंदालाल दीक्षित ह्यांनी निर्माण केलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या ‘शिवाजी समिती’ मध्ये रामप्रसाद सामील झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन गेंदालाल ह्यांनी ही समिती निर्माण केली होती. त्याच दरम्यान रामप्रसाद ह्यांनी काही पत्रिकांचे वाटप सम्पूर्ण मणिपुरी गावात केले. ‘देशवासीयो के नाम संदेश’ असे शीर्षक त्या पत्रिकेवर होते. त्यात रामप्रसाद ह्यांनी लिहिलेली ‘मणिपुरी प्रतिज्ञा’ नावाची कविता देखील होती. इंग्रजांनी आता भारत सोडून निघून जावे अन्यथा आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही. शिवाय शास्त्राच्या बळावर आमचा देश पुन्हा मिळवू अशी कविता आता जनसामान्यांपर्यंत पोहोचली होती. तेव्हाच रामप्रसाद ह्यांनी मणिपूर इथे मोठी लूट मिळवली होती.

त्यावेळेस क्रांतिकारक मंडळी अशी लूट मिळवायचे आणि तोच पैसा देशहितासाठी वापरायचे. ज्यांनी इतरांचा देश चोरला होता ते इंग्रज ह्या कामाला चोरी म्हणायचे. रामप्रसाद ह्यांना पुन्हा एक लूट करायची होती, पण इंग्रजांना ह्या गोष्टीची खबर लागली होती. एक दिवस अचानक छापा मारून इंग्रजांनी क्रांतीकारकांना पकडायचे ठरवले. रामप्रसाद, गेंदालाल दीक्षित ही मंडळी वेष बदलून गावामध्ये पुस्तके विकत होती. पण इंग्रजांना हे समजले होते.

त्यांनी गोळीबार सुरू केला. आणि म्हणता म्हणता अनेक लोक मारले गेले. काही जण पळू लागले. रामप्रसाद ह्यांचा पाठलाग करत इंग्रज यमुना नदीपर्यंत पोहोचले होते. रामप्रसाद ह्यांनी नदीत उडी मारली आणि तिथून ते निसटले. रामप्रसाद ह्यांचा मृत्यू झाला असे समजत इंग्रज माघारी फिरले. गेंदालाल ह्यांना आग्र्याच्या किल्ल्यात ठेवण्यात आले जिथून ते निसटले. म्हणूनच ह्याला मणिपुरी कट म्हणण्यात येते.

यानंतर रामप्रसाद हे उत्तर प्रदेश मधील काही गावात अज्ञातपणे आपल्याच कवितेची पुस्तके विकू लागले. देशातील लोकांपर्यंत त्यांचे विचार कवितेच्या मार्फत पोहोचू लागले होते. काही वर्षांनंतर मणिपुरी कटात सामील असलेल्या क्रांतीकारकांना सोडून देण्यात आले. तेव्हा पुढे येऊन रामप्रसाद ह्यांनी इंग्रजांसमोर कबुली दिली.

शिवाय इथून पुढे कोणत्याच चळवळीत भाग न घेण्याचे वचन दिले. त्यांना मुक्त करण्यात आले. नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. तिथे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाषणे दिली. काँग्रेसमध्ये गेले तरी विचार बदलले नव्हते. अहिंसेच्या मार्गाने काहीही होणार नाही असे त्यांचे म्हणणे असल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होऊ लागली.

नंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सहभाग घेतला. त्यांनी पुन्हा सशस्त्र मार्ग निवडल्यामुळे तसेच कार्य देखील सुरू झाले होते. एकदा ट्रेन लुटल्यामुळे त्यांना इंग्रजांनी शिक्षा दिली आणि ही शिक्षा त्यांच्या आयुष्यातली शेवटची शिक्षा ठरली.

फाशीची शिक्षा देत इंग्रजांनी रामप्रसाद बिस्मिल नावाचा क्रांतिकारी अध्याय संपवला होता. १९ डिसेंबर १९२७ रोजी गोरखपूरमध्ये रामप्रसाद बिस्मिल ह्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याची आठवण करणे आपली जवाबदारी आहे. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना शतशः नमन!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button