इतिहासताज्या बातम्या

स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगणारे ५ चित्रपट…

भारतमातेच्या रक्षणार्थ आणि भारतीयांच्या स्वातंत्र्याखातर क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे रान केले. भारतीय स्वातंत्र्यलढा हा इतिहासात अगदी विशेष ठरतो. ह्यात अनेक क्रांतिकारकांच्या आयुष्यात विविध घटना घडल्या होत्या. स्वातंत्र्य चळवळीचा हा इतिहास मोठा असला तरी अनेक चित्रपटांमधून ह्या काळावर प्रकाश टाकण्यात आला.

त्यामुळेच या क्रांतीकारकांची आणि त्यांनी जिद्दीने दिलेल्या लढ्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आणि पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती देऊ शकली. आजच्या लेखात आपण स्वातंत्र्यलढ्यातील पाच प्रेरणादायी क्रांतीकारकांची माहिती देणाऱ्या चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत.

१) लोकमान्य – एक युगपुरुष :

लोकमान्य बाळगंगाधर टिळक ह्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. ओम राऊत दिग्दर्शित ह्या चित्रपटात आजच्या काळातला एक व्यक्ती लोकमान्य टिळकांवर आधारीत पुस्तक वाचतो आणि तिथुन सुरू होते टिळकांची कथा. टिळकांनी केलेले कार्य, त्यांचा त्याग, त्यांची विचारसरणी ह्या चित्रपटात दाखवली गेली आहे.

आज आपण त्यांच्या विचारांवर चालत नाही मग त्यांच्या विचारांचे वारस म्हणवून घेण्यास आपण पात्र आहोत का, असा प्रश्न चित्रपट पाहिल्यावर आपल्याला पडतो. सुबोध भावे ह्यांनी लोकमान्यांची भूमिका खरोखर छान साकारली आहे.

हा चित्रपट सध्या कोणत्याच माध्यमांवर उपलब्ध नाहीये. पण झी टॉकीज सारख्या मराठी चित्रपट वाहिन्यांवर कधी कधी दाखवण्यात येतो.

२) मंगल पांडे – द रायसिंग :

देशभक्त मंगल पांडे ह्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. अमीर खान ह्यांनी मंगल पांडे ह्यांची भूमिका साकारलेली असून केतन मेहता ह्यांनी चित्रपटाचे दिगदर्शन केलेले आहे. मंगल पांडे ह्यांची स्वामिनिष्ठा, तसेच देशाप्रती प्रेम ह्यातून स्पष्ट दिसते.

शेवटी मंगल पांडे ह्यांना फाशी देण्यात येते. इंग्रजांची क्रूरता ह्यात दिसतेच पण झाशीची राणी, तात्या टोपे इत्यादी लोकांनी नंतर एकत्र येत इंग्रजांना दिलेले तडाखे आपल्याला प्रेरणा देतात. ह्या चित्रपटातुन १८५७ चा काळ जिवंत होतो.

चित्रपट पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://youtu.be/mfIbHz1UYNo

३) केसरी :

हा चित्रपट २०१९ मध्ये आला होता. अफगाणिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या सारागढी किल्ल्यावर तेव्हा केवळ एकवीस शीख लोक होते आणि अफगाण मधून येणारे आफ्रिदी लोक ह्या किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी आले होते.

तेव्हा मृत्यू समोर असताना ह्या एकवीस शीखांनी जवळपास १०,००० संख्येच्या सैन्याला तोंड दिले. अर्थात ह्यामुळे ते २१ शीख धारातीर्थी पडले पण अफगाणच्या आफ्रिदी लोकांना भारताकडे येता आले नाही. इंग्रजांच्या ३१ व्या रेजिमेंटमध्ये ही २१ मंडळी होती.

अक्षय कुमारने ह्या २१ जणांच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे. संपूर्ण वाळवंटातील युद्ध अतिशय भीषण वाटतं. प्रत्येक देशभक्ताने शेवटच्या श्वासापर्यंत लढून गणिमांना हरवले होते. हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम वर बघता येतो.

४) नेताजी सुभाष चंद्र बोस – द फरगॉटन हिरो :

हा चित्रपट श्याम बेनेगल ह्यांनी दिग्दर्शित केला आहे. क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट एक नवीन ऊर्जा देऊन जातो. नेताजींची हुबेहूब भूमिका सचिन खेडेकर ह्यांनी साकारली आहे.

आझाद हिंद सेनेची स्थापना, हिटलरची भेट इत्यादी गोष्टी ह्यात दाखवल्या आहेत. महानायक असणाऱ्या नेताजींची प्रतिमा जनमानसात ह्या चित्रपटामुळे पोहोचते. कोणत्याही प्रसंगाला धक्का न लागता इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न याशस्वी ठरला आहे.

नेताजींनी विचारधारा, कॉंग्रेस मधील वाद इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकल्यामुळे नेताजींविषयी असणारे गैरसमज दूर होतात. चित्रपट बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://youtu.be/WczVepo7fKw

५) द लेजेंड ऑफ भगत सिंग :

हा चित्रपट २००२ साली राजकुमार संतोषी ह्यांनी दिग्दर्शित केला होता. अजय देवगण भगत सिंग ह्यांच्या भूमिकेत होते. चित्रपटात भगत सिंग ह्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग दाखवले आहेत. जालियनवाला बाग तसेच संसदेत फोडलेला बॉम्ब ह्या साऱ्या घटना चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात.

भगत सिंग ह्यांच्या आयुष्यात नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे योग्य आहे. चित्रपटात भगतसिंग ह्यांचा त्याग दिसतोच पण फाशीवर चढताना स्वातंत्र्याची किंमत व गरज कळते. चित्रपटात काही काल्पनिक गोष्टी वापराव्या लागतात मात्र भगतसिंग ह्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे उचित ठरते.

हा चित्रपट पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.https://youtu.be/CbqzZz1DQSs
 
हे ५ चित्रपट भारतीय इतिहासातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळाला पुन्हा जिवंत करतात. आपल्यातील देशभक्तीला असे चित्रपट पाहून चालना मिळते. इतिहास वाचायला कंटाळा येत असेल तर हे चित्रपट आपले काम नक्की सोप्पं करतील. लेख आवडला असेल तर कमेंट करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button