…अन् सात वर्षाच्या मुलीने दिलेली ऑर्डर घेऊन ४२ फूड डिलेव्हरी बॉइज घरासमोर झाले हजर
फिलिपाइन्समध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथील एका सात वर्षीय मुलीने ऑनलाइन फूड डिलेव्हरी अॅपवरुन जेवण ऑर्डर केलं.
मात्र ही ऑर्डर घेऊन एक दोन नाही तर तब्बल ४२ वेगवेगळे फूड डिलेव्हरी बॉइज या मुलीच्या घरी पोहचले आणि एकच गोंधळ उडाला. पहिल्यांदा या मुलीने चुकून अनेकदा ऑर्डर दिल्याने हा गोंधळ उडाला नाही ना, अशी शंका अनेकांना वाटली. मात्र या गोंधळामागील कारण वेगळचं निघालं.
मॅशेएबलने दिलेल्या वृत्तानुसार, फिलिपाइन्समधील सेबू सिटीमधील एका शालेय विद्यार्थिनीने फूडपांडा या अॅपवरुन दुपारच्या जेवणासाठी चिकन कटलेटची ऑर्डर दिली. आई-वडील घरी नसल्याने या मुलीने तिच्यासाठी आणि तिच्या मोठ्या बहिणीसाठी ही ऑर्डर दिली होती. ऑर्डर दिल्यानंतर ही मुलगी आपल्या बहिणीला जेवणाची तयारी करण्यात मदत करु लागली.
त्यानंतर काही वेळात या मुलीच्या घरासमोर एक डिलेव्हरी बॉय खाण्याची ऑर्डर घेऊन दाखल झाला. मात्र चिकन कटलेटचीच ऑर्डर घेऊन हळूहळू या मुलीच्या घरासमोर डिलेव्हरी बॉइजची गर्दीच जमली. पाहता पाहता काही मिनिटांमध्ये या ठिकाणी तब्बल ४२ डिलेव्हरी बॉइज गोळा झाले. एवढ्या मोठ्या संख्येने डिलेव्हरी बॉइज बघून सर्वचजण गोंधळात पडले.
एकाच वेळी छोट्याश्या गल्लीमध्ये दुकाची घेऊन गोळा झालेल्या ४२ डिलेव्हरी बॉइजला पाहण्यासाठी गल्लीत स्थानिकांची मोठी गर्दी झाली. कोणालाच काही कळत नव्हते आणि अगदीच गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण झाली. याच गल्लीत राहणाऱ्या एका स्थानिक मुलाने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
खरं तर हा गोंधळ फूड डिलेव्हरी अॅपमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने घडला होता. त्यामुळेच एक ऑर्डर घेऊन तब्बल ४२ डिलेव्हरी बॉइज दाखल झाले. फूड डिलेव्हरी अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मुलीने दिलेली एक ऑर्डर एकाच वेळी ४२ डिलेव्हरी बॉइजला गेली
आणि ते दिलेली ऑर्डर घेऊन या मुलीच्या घरासमोर हजर झाले. मुलीच्या घरात इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने फूड डिलेव्हरी अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अचानक एकाच वेळी ४२ जणांना ऑर्डर गेली असं कंपनीने म्हटलं आहे.