ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

अन् अश्या प्रकारे ‘एव्हरेस्ट मसाले’ पोहचले घराघरात…

जगात भारताला मसाल्यांची राजधानी म्हणतात. पण या मसाल्याच्या राजधानीत मसाल्यांचा व्यवसाय सुरु करणं आणि मसाल्याच्या एवढ्या मोठ्या बाजारपेठेत स्वतःचं नाव इतकं मोठं करणं ही सोपी गोष्ट नाही. पण हे ज्यांनी साध्य केलं त्या एव्हरेस्ट मसाल्याच्या यशाची कहाणी आपण जाणून घेऊयात.

आधीच्या काळात तोंडी प्रसिद्धीच्या बळावर व्यापार केला जात असे, पण आताच्या काळात ब्रँडला महत्व आहे. जागतिक स्तरावर यशस्वी होणाऱ्या प्रत्येक ब्रँडची यशोगाथा ऐकावी अशीच आहे. आजची ही गाथा आहे वाडीलाल शहा यांची.

वाडीलाल यांच्या वडिलांचा मुंबईत मसाले आणि सुकामेवा विक्रीचा व्यवसाय होता. वाडीलाल यांनी दुकानात येणाऱ्या गृहिणी काय स्वरूपाची मागणी करतात, याकडे त्यांनी बारकाईने पाहिलं. त्यांना असं आढळलं, की या गृहिणी मसाल्याच्या पदार्थांची विविध प्रकारची मिश्रणे मागत आहेत.

म्हणून अशा ग्राहक भगिनींना त्यांनी याबद्दल विचारणा केली असता त्यांना अशी माहिती मिळाली, की कुणाला दाल मख्खनी, कुणाला सांबार, तर कुणाला छोले, कुणाला चिकन असा प्रत्येक महिलेला वेगवेगळा पदार्थ बनवायचा होता, म्हणून वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळं मसाल्यांचं मिश्रण त्यांना हवं होतं.

तर त्या मागणीनुसार वाडीलाल यांनी रिकाम्या वेळेत मसाल्याचं वेगवेगळं मिश्रण करणं चालू केलं. यामुळे व्यापाराला अजून चालना मिळाली. कारभार वाढला म्हणून त्यांनी १९६६ मध्ये २०० चौ. फुटाचं अजून एक दुकान खरेदी केलं.

त्या दुकानात त्यांनी या मसाल्यांच्या विविध मिश्रणांतून एक मिश्रण शोधलं होतं, त्याचं नाव होतं दूध मसाला. हेच पाहिलं उत्पादन घेऊन एवरेस्ट कंपनीचा ‘श्री गणेशा’ झाला.

त्याचबरोबर त्यांनी गरम मसाला आणि चाय मसाला अशी अन्य दोन उत्पादनंही सुरू केली.ही तिन्ही उत्पादनं खूपच लोकप्रिय झाली. ते साल होतं १९६८.

आता आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर वाडीलाल यांनी अजून प्रयोग करण्यासाठी अभ्यास करण्याचं ठरवलं. यासाठी ते भारतभर फिरू लागले. तेव्हा त्यांना जाणवलं की मसाल्यांशिवाय काहीच चालत नाही व मसाल्याच्या विविध मिश्रणांची गरज आहे.

९८० मध्ये वाडीलाल यांनी एक फॅक्टरी सुरू केली व फॅक्टरीमध्ये वाडीलाल व त्यांचे सहकारी प्रयोग व संशोधन करू लागले. मसाल्यांचा कारभार अजूनच मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. बाहेरून तयार गोष्टी आणण्याचा तो काळ नव्हता.

परंतु त्या काळातही वाडीलाल यांनी गृहिणी दुकानातून खडेमसाले नेऊन ते कुटून वापरतात म्हणून गृहिणींची ही गरज ओळखून त्यांना मुळातच कुटलेले मसाले उपलब्ध करून दिले. वाडीलाल यांनी महत्वाच्या गोष्टीचं पालन केलं की ज्या प्रांतातला खास पदार्थ असेल; त्याला लागणारा मसाला बनवताना त्याच प्रांतातून आणलेले त्या मसाल्याचे घटक वापरायचे.

यामुळे त्या प्रांताची अस्सल चव त्या पदार्थाला येऊ लागली. त्याचबरोबर साधारणपणे लाल मिरची पुडीची तीन प्रकारात विभागणी करून ती ही बाजारात काश्मिरी लाल, तिखालाल आणि कुटीलाल या नावांनी आणली, भारतीयांना जशी पाहिजे तशी ही विभागणी होती.

मसाल्यांची विक्री ही छोटय़ा पाकिटात करणे, हा पायंडा एव्हरेस्टनेच पाडला. त्यांचा मसाला सर्व स्तरातल्या लोकांसाठी उपलब्ध झाल्यामुळे एव्हरेस्टची लोकप्रियता अजूनच वाढली. तसेच दक्षिणेतील घरांमध्ये सांबार-रसम्, तर पंजाबात शाही पनीर, बटर चिकन सहजतेनं तयार होऊ लागलं.

या गोष्टी फारशा मोठ्या नसल्या तरी त्यामुळे भारतीय घरांमधील स्वयंपाकघर पूर्णतः बदलून गेलं. दुसऱ्या प्रांतातील पदार्थाचा प्रयोग करून पाहण्यासाठी लागणारे मसाले छोटय़ा पाकिटात उपलब्ध झाल्याने प्रांतांच्या सीमारेषा ओलांडत हे पदार्थ नियमितपणे स्वयंपाकघरात तयार होऊ लागले.

आज एव्हरेस्टचं नाव हे मसाल्याच्या ब्रँड्समध्ये अग्रक्रमाने घेतलं जातं. विविध स्वाद असणारे ४५ मसाले देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. केवळ भारतातच नाही तर मध्य पूर्व आशियाई देश, सिंगापूर, आफ्रिकेतील पूर्व भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा व अमेरिकेतही हे मसाले पोहोचले आहेत.

देशातल्या हरएक घरात एव्हरेस्टच्या कोणत्याही उत्पादनाची छोटीशी पुडी असणं, हे एव्हरेस्टचं ग्राहकांच्या मनात असलेलं अढळ पद दर्शवतं. इतकं अफाट प्रमाणात एव्हरेस्टला यश मिळालं आहे. त्याबळावरच एव्हरेस्ट सुपर ब्रॅंड झाला आहे.

एव्हरेस्टची खासियत ही की उत्पादन करताना जितकी त्यातील मसाल्यांची प्रमाणबद्धता आहे ती जाहीर केली जाते. त्यांनी केलेली जाहिरातबाजीही तितकीच अनोखी आहे. एव्हरेस्टने सुरुवातीपासून प्रत्येक जाहिरातीत आईचा उल्लेख आवर्जून केला.

एव्हरेस्टची पहिली टॅगलाईन पाहूनच लक्षात येतं. “एव्हरेस्ट मसाला, ‘जो खाने को बनाए माँ के हात का खाना’”. प्रत्येकाचं आईशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित केल्यामुळे एव्हरेस्ट ब्रँडशी ग्राहकांची खूपच जवळीक निर्माण झाली आहे.

खाणाऱ्या प्रत्येकाला समाधान लाभावं यासाठी काय आवश्यक असतं तर आईच्या हातची चव आणि ती चव येण्यासाठी हवे असतात प्रमाणबद्ध मसाले. म्हणून सध्याची एव्हरेस्टची टॅगलाईन अगदीच समर्पक आहे, ” टेस्ट में बेस्ट, मम्मी और एव्हरेस्ट”

तुमच्या घरांत कोणते एव्हरेस्ट मसाले वापरले जातात हे आम्हांला कॉमेंटमध्ये जरूर कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button