मराठी पत्रकारीतेचे अध्वर्यू बाळशास्त्री जांभेकर…
दर्पण म्हणजेच आरसा जो आपल्याला कधीही खोटे दाखवत नाही. जे आहे ते आणि जसेच्या तसे हा आरसा आपल्याला दाखवतो. पण भारतात जेव्हा एकीकडून इंग्रजांच्या अन्यायामुळे तर दुसरीकडून चुकीच्या रुढींमुळे सामान्य माणूस पिळवटून निघत होता तेव्हा त्यांच्या समोर हा आरसा धरणारे कोणी नव्हते.
तेव्हा ‘दर्पण’ नामक वर्तमानपत्र घेऊन आले बाळशास्त्री जांभेकर. हे ‘दर्पण’ वर्तमानपत्र जांभेकरांनी आरश्याप्रमाणेच भारतीयांपुढे धरले होते. आपल्या वाईट अवस्थेचे सत्य व जगातल्या व्यवहाराचे,
राजकारणाचे वास्तव ह्या दर्पणातून भारतीयांना दिसले होते. आज १८ मे रोजी बाळशास्त्री जांभेकर ह्यांचा स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने जाणून घेऊ त्यांच्या कार्याविषयी.
पूर्वायुष्य :
बाळशास्त्री जांभेकर ह्यांना आपण ‘दर्पण’ ह्या वर्तमानपत्रामुळे ओळखतो. बाळशास्त्री जांभेकर ह्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ ला रत्नागिरी मधील पोंभुर्ले इथे झाला. सामान्य मुलांप्रमाणे बालपण गेले असले तरी त्यांच्या वडिलांकडून त्यांनी संस्कृत शिकण्यास सुरुवात केली होती.
त्यांचे वडील गंगाधर शास्त्री त्यांना संस्कृत व इतर काही सामान्य ज्ञानाचे विषय घरीच शिकवायचे. बाळशास्त्री ह्यांचे पुढील शिक्षण हे मुंबई इथे झाले.
मुंबईमध्ये तर त्यांनी संस्कृत सोबत इंग्रजी देखील शिकून घेतली. गणित व शास्त्र ह्या विषयात त्यांची रुची वाढत गेली. मात्र भाषेवरचे प्रेम काही सुटले नव्हते. तरी इतर विषय शिकण्याची आवड असल्याने त्यांनी वयाच्या विशी आधीच प्राध्यापक पदाचे ज्ञान मिळवले होते.
दर्पण वर्तमानपत्राचा जन्म झाला :
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेमध्ये त्यांची आवड पाहून फ्रांसच्या राजाने त्यांचा गौरव केला होता.
सोबतच त्यांना विविध लिपी येत होत्या. ताम्रपट, शिलालेख त्यांनी अभ्यासले होते. एकंदरीत अनेक विषयांचे ज्ञान व अनेक भाषेवर प्रभुत्व असल्याने जांभेकरांनी वर्तमानपत्र काढायचे ठरवले.
आपल्या देशाला सत्याची जाण नाहीये, अर्थात सर्वसामान्य माणसाला पारतंत्र्य-स्वातंत्र्य, शिक्षण, विकास, प्रगती ह्या कोणत्याच गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे वर्तमानपत्राची उणीव भासू लागली होती. एल्फिन्स्टन महाविद्यालयात असताना बाळशास्त्री ह्यांनी गोविंद कुंटे ह्या आपल्या सहकाऱ्यास सोबत घेऊन हे वर्तमानपत्र काढले.
६ जानेवारी १८३२ ला ह्या वर्तमानपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. ह्याच दिवशी मराठीतले पाहिले वर्तमानपत्र निघाले. म्हणूनच ६ जानेवारीला ‘मराठी पत्रकार दिवस’ साजरा केला जातो.
एकीकडे मराठी व एकीकडे इंग्रजी अशा दोन भाषेतून बातम्या छापून यायच्या. सामान्य लोकांसाठी मराठी तर राजकर्त्यांना कळावे म्हणून इंग्रजी असा भाषेचा वापर ह्यात व्हायचा.
भारतीयांची प्रगती व्हावी, त्यांना शिक्षण मिळावे, स्वातंत्र्याचा अर्थ समजावा व जुन्या रूढींना तिलांजली वाहता यावी हाच ‘दर्पण’चा हेतू होता.
मराठीमध्ये ह्यापूर्वी वर्तमानपत्र नसल्याने दर्पणला गुंतवणूकदार कमी प्रमाणात मिळाले, नंतर गुंतवणूकदारांचा आकडा वाढला आणि दर्पण तब्बल साडे आठ वर्षे चालला. १८४० मधील जुलैला दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. काही तांत्रिक कारणांमुळे दर्पणचे कार्य थांबवले गेले.
ज्ञानाच्या जोरावर दिग्दर्शन मासिक काढले :
बाळशास्त्री जांभेकर ह्यांच्या ज्ञानाचा आवाका प्रचंड मोठा होता. त्यांना १८३४ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात पाहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी ‘दिग्दर्शन’ नामक मासिक सुद्धा चालू केले होते.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास या विषयांवरील लेख व नकाशे आकृत्यांसह त्यांनी ‘दिग्दर्शन’मध्ये प्रकाशित केले. अशा माध्यमातून त्यांनी समाजाला ज्ञान देण्याचे कार्य केले.
समाजसुधारणेचे कार्य :
बाळशास्त्री केवळ पत्रकार किंवा संपादक नव्हते. त्यांनी समाजसुधारणा देखील केल्या. आपल्या वर्तमानपत्रात त्यांनी विधवा पुनर्विवाहाची मांडणी केली. लोकांनी विज्ञानाकडे वळावे, बुद्धीप्रामाण्यवादी बनावे असे त्यांना वाटायचे.
एक मुलगा ख्रिस्ती लोकांच्या घरी राहिला म्हणून धर्ममार्तंडांनी त्यास वाळीत टाकले. तेव्हा बाळशास्त्री ह्यांनी त्या मुलाला पुन्हा धर्मात घेतले.
समाज हा वाचनामुळे प्रगत होईल हे त्यांना ठाऊक होते म्हणूनच त्यांनी “बॉंबे नेटिव्ह जनरल लायब्ररी” स्थापन केली. जेव्हा त्यांना मुंबईचे शिक्षण अधिकारी करण्यात आले तेव्हा त्यांनी मराठीमधून पाठ्यपुस्तके छापली.
ह्या आधी असे होत नव्हते. मराठी भाषेतली ही पहिलीच पाठ्यपुस्तके होती. बाळशास्त्री ह्यांनी अनेक विषयांची पुस्तके छापून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली होती.
१८ मे १८४६ रोजी मात्र त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकूणच समाजसुधारणेचे व संपादकीय विषयीचे त्यांचे कार्य आपल्याला आज देखील मोलाचे मार्गदर्शन करतात. आज त्यांच्या १७६ व्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!