इतिहासताज्या बातम्या

हे आहेत ‘दुसरे’ बिरूद लाभलेले ऐतिहासिक राज्यकर्ते…

इतिहासात एखादे नाव माणसाच्या कर्तृत्वामुळे इतके गाजते की नंतर तेच नाव दुसऱ्या व्यक्तीला दिले तरी लोकांना लक्षात राहते ती पहिलीच व्यक्ती. अकबर दुसरा, शिवाजी दुसरे, माधवराव दुसरे असे आपण सहजपणे ऐतिहासिक पुस्तकात वाचतो.

पण ह्या दुसऱ्यांना लक्षात ठेवण्याच्या भानगडीत आपण फारसे पडत नाही. मात्र काही दुसऱ्यांमुळे इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळते. तर काही दुसरे त्याच नावाच्या पहिल्या व्यक्तीचे कार्य मातीमोल करतात. आज आपण अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या ‘दुसरे’ म्हणून बिरूद मिळालेल्या लोकांचा इतिहास पाहणार आहोत.

१) शिवाजी महाराज दुसरे :

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सर्वांचेच आदराचे आणि श्रद्धेचे नाव आहे. महाराजांनी आपल्या कर्तृत्वावर हे नाव मोठे केले. शिवाजी महाराजांचे नाव अनेकांना ठेवण्यात आले मात्र शिवराय एकदाच होऊन गेले.

आपल्या राजाचे गुण आपल्या मुलात यावे ह्या हेतूने महाराणी ताराबाई ह्यांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले होते. हेच ते इतिहासातले शिवाजी महाराज दुसरे. कोल्हापूर व सातारा अशा गाद्या निर्माण झाल्यानंतर शिवाजी दुसरे ह्यांनी कोल्हापूरचे राज्य केले.

मात्र त्यांच्या सावत्र आई राजसबाई ह्यांनी शिवाजी दुसरे व ताराबाई ह्यांना अटक केली. त्या अटकेतच शिवाजी दुसरे निधन पावले. शिवाजी महाराज दुसरे अल्पायुषी ठरले.

२) संभाजी महाराज दुसरे :

छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी देखील शिवरायांसारखे कार्य केले होते. संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे आज प्रत्येक माणूस संभाजी महाराजांना ओळखतो. संभाजी महाराजांचे धाकटे बंधू अर्थात छत्रपती राजाराम महाराज ह्यांनी ताराबाईंसारखाच राजसबाई ह्यांच्या सोबत देखील विवाह केला होता.

राजसबाई ह्यांनी पुढे ताराबाई व त्यांच्या मुलाला कैदेत टाकले व आपल्या मुलाला कोल्हापूरच्या गादीवर बसवले. त्याच मुलाचे नाव संभाजी महाराज दुसरे. ह्या संभाजी महाराजांनी कोल्हापूरचे राज्य केले. साताऱ्याच्या शाहू महाराजांसोबत ह्याच संभाजी महाराजांनी वारणेचा तह केला होता.

३) राजाराम महाराज दुसरे :

कोल्हापूर व सातारा अशा दोन गाद्या पडल्यानंतर ताराबाईंचे पुत्र शिवाजी दुसरे ह्यांनी कोल्हापूरचे राज्य केले. शाहू महाराजांना सातारा मिळाले पण पुढे राजसबाईंनी कट केला व स्वतःच्या मुलाला गादीवर बसवले.

तेव्हा साताऱ्यातील शाहू महाराजांनी ताराबाईंना सोडवून आणले. ताराबाई ह्यांनी नंतर साताऱ्यात वास्तव्य केले. शाहू महाराजांना मुलबाळ नसल्यामुळे ताराबाईंनी एका लहान मुलाला पुढे आणले व सांगितले की माझ्या शिवाजी नामक मुलाला हा मुलगा झाला होता.

ह्याचे नाव राजाराम आहे. हेच ते इतिहासातले राजाराम महाराज दुसरे. अर्थात दुसऱ्या शिवाजींचे पुत्र. नंतर राजाराम महाराज साताऱ्याच्या गादीवर बसले पण काही वर्षांनी महाराणी ताराबाई ह्यांनी स्पष्ट केले की हा दुसरा राजाराम आपला नातू नाही. अनेक अडचणींना सामोरे जात ह्या दुसऱ्या राजाराम महाराजांनी राज्य केले होते.

४) दुसरे माधवराव पेशवे :

नानासाहेब पेशवे ह्यांना गोपिकाबाईंपासून माधवराव नामक पुत्ररत्न प्राप्त झाले. जे अल्पायुषी ठरले. पुढे ह्याच माधवराव पेशव्यांच्या लहान भावाला अर्थात नारायणराव पेशवा ह्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव देखील माधवराव ठेवण्यात आले.

ह्यांनाच इतिहासातले दुसरे माधवराव म्हणतात. ह्यांना सवाई माधवराव देखील म्हणतात. सवाई माधवराव चाळीस दिवसांचे होते तेव्हा त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली होती. ते लहान असल्यामुळे नाना फडणवीस सारा कारभार पहायचे.

५) बाजीराव दुसरा :

थोरले बाजीराव पेशवे म्हणजे पराक्रम. त्यांनी आपल्या कर्तृत्वावर पेशवाईची वस्त्रे मिळवली होती. सतत युद्ध व मोहिमांवर असणाऱ्या बाजीरावांमुळे मराठा साम्राज्याला फायदा झाला होता. ह्याच बाजीरावांच्या कर्तुत्वाला लक्षात ठेवून आनंदीबाई व राघोबा ह्यांच्या मुलाचे नाव बाजीराव ठेवले होते.

हाच इतिहासातला दुसरा बाजीराव. थोरल्या बाजीरावांचे कार्य व दुसऱ्या बाजीरावांची तुलना करता येत नाही. कारण हा दुसरा बाजीराव जातीयता निर्माण करणारा व कर्मकांडी होता. प्रशासनापेक्षा मौज करण्यात ह्याचा जास्त रस असल्याने पेशवाई व पर्यायाने मराठा साम्राज्य बुडाले.

असे हे इतिहासातले काही चांगले तर काही वाईट असणारे दुसरे होते. तुम्हाला असे कोणी दुसरे माहित असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button