महाराणा प्रताप यांनी कसे लढले हळदी घाटाचे युद्ध?
हळदी घाट म्हणजे समस्त इतिहासकरांसाठी अभ्यासाचा विषय. महाराणा प्रताप व अकबर ह्यांच्यात झालेले हे भीषण युद्ध आजही अनुत्तरित आहे. कोण जिंकले कोण हरले हे ठामपणे सांगता येत नाही.
मात्र अकबराचे मेवाड जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. १८ जून १५७६ ला झालेल्या ह्या युद्धात मुघल तसेच राजपुतांचे नुकसान झाले मात्र एक प्रश्न प्रत्येकाला पडतो की ह्या हळदी घाटाच्या या युद्धानंतर काय झाले?
महाराणा प्रतापांनी हे वादळ कसे रोखले? अकबराने नंतर काय केले? हे सारे आजच्या लेखात पाहणार आहोत. निमित्त आहे महाराणा प्रताप यांच्या आज तिथिनुसार म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला असलेल्या जन्मदिनाचं. चला तर मग जाणून घेऊया या हळदी घाटाच्या युद्धाविषयी.
हळदी घाट म्हणजे हळदी प्रमाणे पिवळी माती असणारी भूमी. तिथे ही लढाई झाल्यानंतर सर्व घाट रक्ताने लालेलाल झाला होता. सर्वत्र आग आणि धूर दिसत होता.
किती तरी सैनिक मारले गेले होते. घोडे हत्ती जखमी झाले होते. सर्वत्र एक दुर्गंध पसरला होता. महाराणा प्रताप रणभूमी मधून निघून गेले असले तरी त्यांचा एक नवीन आदेश निघाला होता.
तो म्हणजे जे जे सैनिक जीवंत आहेत त्यांनी माघार घेत कुंभालघर इथे जमावे. अकबराकडून आलेल्या मानसिंगचे देखील मोठे नुकसान झाले होते. ह्याच कारणामुळे ह्या युद्धाचा परिणाम पुढे आला नाही.
पण अकबराने मानसिंगचा बहुमान न करता त्याला दरबारात येण्यापासून रोखले. ह्याच रागात नंतर मानसिंग आपली मोठी फौज घेऊन कुंभालघर इथे आला. तो तिथे येण्याआगोदरच महाराणा प्रतापांना बातमी मिळाली होती. ते तिथून थेट गोगुंडा इथे गेले.
मानसिंगला कुंभालघरमध्ये काहीच हाती लागले नाही. मानसिंगने नंतर गोगुंडाची वाट धरली. त्याची फौज आता थकली होती. महाराणा प्रतपांकडे होते ते केवळ सात हजार सैनिक. जिथे जिथे राणा प्रताप गेले तिथे तिथे हा मानसिंग गेला.
पण महाराणा प्रतापांना हे कळून चुकले होते की ह्या मानसिंगची रसद तोडली तर अन्न पाण्यावाचून त्याचे सैन्य सैरभैर होईल. त्यांनी तसेच केले जिथून जिथून ह्या मानसिंगला रसद मिळते ती रसद मोडून काढली. हे सारे अकबराला कळताच त्याने जातीने ह्या लढाईत उतरण्याचा निर्णय घेतला.
हळदी घाटात सुरू झालेली ही लढाई संपलेली नव्हती. आता स्वतः अकबर रणांगणी उतरला होता. त्याने मानसिंगसारखी चूक केली नाही.
त्याला केवळ हवे होते महाराणा प्रताप. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लावणे गरजेचे होते. अकबराने सर्वप्रथम आजूबाजूचे प्रांत जिंकून घेतले.
नंतर आपल्या काही सैन्याच्या तुकड्या केल्या व महाराणा प्रतापांचा शोध सुरू झाला. महाराणा प्रताप डोंगराळ भागात गुप्तपणे राहत होते पण तिथे देखील त्यांनी भिल्ल समाजातील लोकांना हाती घेऊन फौज निर्माण करायला सुरुवात केली होती.
ह्या फौजेने अकबराच्या गुप्तहेरांना आणि सैन्याच्या तुकड्यांना यमसदनी धाडले. आता अकबराने आपला पवित्रा बदलला होता.
आपल्या सैन्याच्या तुकड्यांचे नेतृत्व करणाऱ्या कुतुबुद्दिन व भगवान दास ह्यांना अकबराने माघारी बोलावले आणि सर्वत्र नाकेबंदी केली. इतकी नाकेबंदी करून देखील महाराणा प्रताप काही अकबराच्या हाती लागले नाही.
नंतर मात्र महाराणा प्रतापांना हलाकीत दिवस काढावे लागले. त्यांनी अकबराला तहाचे पत्र पाठवले असे काही लोकांचे म्हणणे आहे पण त्याला कुठेही पुरावा नाही. मिळेल ते खाऊन राणा प्रतापांनी दिवस काढले. पण पुढे येणारा काळ विजयाचे संकेत देत होता.
हळदी घाटाचे युद्ध जरी अनुत्तरित राहिले तरी महाराणा प्रतापांनी ह्या मोगलांना उत्तर द्यायचेच होते. त्यांच्या एका विश्वासू माणसाने ‘भामाशाह’ने मोठी लूट महाराणा प्रतापांपुढे आणली होती. जवळपास २५ लाख रुपये आणि दोन हजार अश्रफी असा तो खजिना होता.
तो पगार म्हणून महाराणा प्रताप ह्यांनी रयतेला दिला आणि सात हजारचे सैन्य चाळीस हजाराच्या घरात गेले. पुढे देवीर ह्या ठिकाणी हळदी घाटाच्या लढाईचे उत्तर देण्याचे निश्चित झाले.
महाराणा प्रताप, त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा, हाती असलेली चाळीस हजारची फौज आणि त्यांच्या जोडलीला भिल्ल समाजातील धनुर्धर लोक सारे मिळून देवीर वर तुटून पडले.
तिथे महाराणा प्रताप ह्यांच्या मुलाने सुलतान खान ह्या अकबराच्या मुख्य सरदाराला मारले व हे युद्ध राजपूत जिंकले. ह्यानंतर कित्येक वेळेस अकबराने आपले सैन्य मेवाडवर पाठवले पण हाती अपयशच आले. नंतर मात्र अकबराने स्वतःच्या बाजूने ह्या लढाईतून माघार घेतली होती.
अशा पद्धतीने हळदी घाटाच्या लढाईनंतर, अनुत्तरित राहणाऱ्या लढाईला महाराणा प्रताप ह्यांनी उत्तर देत आपले सैन्य पुन्हा नव्याने उभे केले आणि इतिहासात सोनेरी अक्षरांनी या युद्धाची नोंद झाली. अशा शूर पराक्रमी राजास मनाचा दंडवत!