‘मेव्हण्याच्या लग्नासाठी सुट्टी पाहिजे, नाहीतर बायको…’, रजेसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज…
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील एका ट्रॅफिक पोलिसाने सुट्टीसाठी केलेला अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. भोपाळचे ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबल दिलीप कुमार अहिरवार यांना मेव्हण्याच्या लग्नासाठी पाच दिवसांची सुट्टी पाहिजे होती. यासाठी त्यांनी रजेचा अर्ज केला होता. पण सुट्टीसाठी केलेला तो अर्ज संबंधित पोलिसाला महागात पडलाय.
रजेसाठी वरिष्ठांकडे केलेल्या अर्जामध्ये अहिरवार यांनी, ११ डिसेंबर रोजी मेव्हण्याचं लग्न आहे, त्यासाठी पाच दिवसांची रजा मंजुर करावी असं नमूद केलं होतं. पण त्यासोबतच अर्जामध्ये
त्यांनी एक स्पेशल नोट लिहिली होती. “जर भावाच्या लग्नाला आला नाहीत तर वाईट परिणाम होतील असं पत्नीने स्पष्टपणे बजवालं आहे” , अशी स्पेशल नोट त्यांनी लिहिली होती.
हा सुट्टीचा अर्ज त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही शेअऱ केला होता. त्यावरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अहिरराव यांच्यावर अनुशासनहीनतेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
“ही अनुशासनहीनता आहे. सुट्टीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की अर्जामध्ये काहीही लिहावं”, अशी प्रतिक्रिया भोपाळ रेंजचे डीआयजी इर्शाद वली यांनी ‘आज तक’शी बोलताना दिली. दरम्यान, सुट्टीसाठी केलेला हा अनोखा अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.