ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

‘या’ ५ गोष्टी कधीही समोरच्याला बोलून दुखावू नका…

कधी चुकून तर कधी मुद्दाम ठरवून इतरांना काहीतरी वाईट आपण बोलून जातो. तूझा पगार किती कमी आहे, तुझा प्रेमभंग का झाला, तुझं लग्न कसं काय मोडलं, तुझ्या ओठांचा आकार असा विचित्र का आहे अशा कितीतरी गोष्टींवर गरज नसताना बोलण्याची अनेकांना सवय असते.

अशा गोष्टी बोलणं आपण प्रकर्षाने टाळलं पाहिजे. आणखी नेमक्या कोणत्या गोष्टींवर कधीही बोलू नये हे या लेखातून आपल्याला जाणून घेता येणार आहे.

१. जन्मतः लाभलेल्या गोष्टींबद्दल चेष्टा करू नये.

प्रत्येकाला जन्मतःच अनेक गोष्टी लाभलेल्या असतात. आपलं दिसणं, आपल्या शरीराची रचना याबरोबरच काही लोकांना जन्मतःच व्यंगदेखील सोबत आलेले असतात. त्या व्यंगांमुळे किंवा ठराविक पद्धतीने दिसण्याविषयी अपेक्षा पूर्ण होत नसल्याने अनेकांमध्ये न्यूनगंड आलेला असतो.

जेव्हा आपल्याला ही परिस्थिती कळते तेव्हा आपण अशा लोकांची अजिबात चेष्टा करु नये. कोणाच्याही व्यंगाचा विनोद करु नये.

आपल्या विनोदामुळे, चेष्टा करण्याच्या स्वभावामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक, भावनिकतेवर घाला घातला जाऊ शकतो. ती व्यक्ती दुखावली जाऊ शकते याची जाण आपण ठेवली पाहिजे.

२. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलणं टाळावं.

प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. एखाद्याकडे गडगंज संपत्ती असते तर दुसरा कोणी दैनंदिन गरजा भागवण्यासाठीही संघर्ष करत असतो. एखादा चांगली कमाई करत असूनही जबाबदारीमुक्त असू शकतो तर दुसरा कोणी थोड्या कमाईतही मोठी जबाबदारी पेलत असतो.

या सगळ्यानुसार ज्याची – त्याची भौतिक सुखांची जीवनशैलीही ठरत असते. याचा संवेदनशीलपणे विचार आपण केला पाहिजे. कधीही कोणाला त्याची आर्थिक मिळकत विचारु नये. कमी लेखू नये.

जो – तो आपल्या परिस्थितीनुसार जगत असतो हे समजून घेत प्रत्येकाचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. तसंच स्वतःचा आर्थिक मोठेपणा दाखवणंही टाळावं.

३. राजकारणातील संवेदनशील मुद्दे काळजीपूर्वक बोलावे.

राजकारणावर बोलणं हा तर सध्या अतिशय संवेदनशील विषय बनला आहे. अगदी घराघरांमध्ये राजकारणाच्या मुद्द्यांनी वाद पेटवले आहेत. राजकारणातील एखादा ठराविक पक्ष आणि ठराविक व्यक्तीप्रती इतकं मोठं समर्पण वाढलं आहे की त्यासाठी आपल्या जवळच्या माणसांशी भांडणं करायलाही अनेकजण तयार असतात.

राज्यातल्या राजकारणाने तर अनेक मित्रांचं रुपांतर शत्रुंमध्ये केलं आहे. हे सगळं टाळण्याची गरज आहे. छान गप्पा रंगलेल्या असताना, आपल्या जवळच्या लोकांशी बोलत असताना राजकारणातल्या संवेदनशील मुद्द्यांवर, ज्यातून वाद होतील अशा मुद्द्यांवर बोलणं प्रकर्षाने टाळावं. कोणाच्या भावना दुखावतील असं काहीच बोलू नये.

४. इतरांच्या परंपरा, चालीरीती यावर नकारात्मक चर्चा टाळावी.

कधी ध्यानीमनी नसताना तर कधी जाणूनबुजून इतरांच्या घरातील पद्धती, चालीरिती, संस्कृतीवर आपण बोलत असतो. एखाद्या पदार्थात आपल्याकडे गुळ घालत असतील आणि दुसऱ्यांकडे साखर घालत असतील तर साखर घालणं कसं चुकीचं आहे आणि साखर चव कशी बिघडवते म्हणत समोरच्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न कधीही करु नये.

प्रत्येकाचं वेगळेपण आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. काही जुन्या चालीरिती असतील तर आपण त्याकडे तटस्थपणे बघावं. या चालीरिती सोडून द्याव्या की नाही हा त्या घराचा, व्यक्तीचा वैयक्तिक मुद्दा आहे याची जाण ठेवत वाद निर्माण होतील असा संवाद तिथे टाळावा.

५. समोरच्याच्या आयुष्यातली दुखरी बाजू उघड करू नये

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुखरी बाजू असतेच. कोणी वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुनही यश मिळवू शकलेला नसतो, तर कोणाला आपल्या प्रेयसीवर जीव ओवाळूनही तिची सोबत आयुष्यभरासाठी मिळालेली नसते.

एखाद्याच्या हातून चांगली नोकरीची संधी गेलेली असते. व्यक्ती तितके दुःख आणि तितक्याच त्यांच्या दुखऱ्या बाजू. काही जणांना उगाच समोरच्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवण्याची सवय असते. त्यातूनही असुरी आनंद घेण्याचा प्रयत्न केला जातो.

पण एक चांगलं, संवेदनशील व्यक्तीमत्व कधीही अशी चूक करणार नाही. आपणही ही बेसिक नैतिकता जपली पाहिजे.

एखादा विषय काढल्याने समोरचा त्रस्त होतो हे आपल्याला माहित असेल तर त्या विषयांवर बोलणं आपल्याला टाळता आलंच पाहिजे.

या सगळ्या मुद्द्यांचा शांतपणे बसून विचार केला तर आपल्यालाही त्यातलं गांभीर्य लक्षात येईल. कधीकधी समोरच्यावर राग दाखवण्यासाठी त्याच्या आयुष्यातल्या वाईट प्रसंगांवर आपण बोलत बसतो.

यातून आपलंच व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तीच्या नजरेत दूषित होतं. त्यामुळे कधीही लेखात सांगितलेल्या गोष्टींवर बोलू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button