ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

गंभीर विषयावर चर्चा करताना लक्षात ठेवा ह्या ‘सहा’ गोष्टी…

एखाद्याला आनंदाची बातमी सांगायची असेल तर आपल्यात आत्मविश्वास लगेच वाढतो, कधी एकदा जाऊन त्या व्यक्तीला ही बातमी सांगेन, असं आपल्याला झालेलं असतं.

पण हेच एखादी दुःखद बातमी, गंभीर विषय असेल तर? तो समोरच्यांपर्यंत पोहोचवताना, त्याच्यावर चर्चा करताना आपला कस लागतो.

कोणत्या शब्दात ही माहिती सांगू हेच सुचत नाही. म्हणूनच या लेखातून आपण या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकत गंभीर विषयावर चर्चा कशी करायची याबद्दल जाणून घेणार आहोत.

१) विचारांमध्ये स्पष्टता ठेवा.

एखाद्या नाजूक आणि गंभीर विषयावर आपल्याला चर्चा करायची असेल तर तो विषय मन आणि विचारांमध्ये स्पष्ट असला पाहिजे. नेमकं काय झालं आहे, विषयामध्ये गांभीर्य असण्याची कारणे काय,

आपण कशा पद्धतीने सांगितलं तर समोरच्याला व्यवस्थित समजेल आणि धक्काही बसणार नाही हे सगळे विचार आपण केले पाहिजेत.

जर विचारांमध्येच स्पष्टता नसेल तर बोलण्यातही ती येणार नाही आणि समोरच्यापर्यंत गांभीर्य पोहोचणार नाही. त्यामुळे गंभीर विषय मांडण्यापूर्वी आधी स्वतः ते व्यवस्थित जाणून घ्या.

२) समविचारी लोक शोधा

जागतिक स्तरावरच्या एखाद्या गंभीर विषयावर आपल्याला बोलायचं असेल तर त्यासाठी समविचारी लोक आपल्या आसपास असणं गरजेचं आहे. सतत मजा करण्याची सवय असलेल्या उथळ व्यक्तीशी कितीही गंभीर विषयावर चर्चा करुन आपण काहीही साध्य करु शकत नाही.

खुले विचार असलेला, वादग्रस्त मुद्द्यांवर बोलण्याऱ्या, ऐकून घेणाऱ्या माणसांशी गंभीर विषयावर चर्चा करुन आपण आपली बौद्धिक भूक भागवू शकतो. तशा माणसांचा संपर्क मात्र आपल्याशी असायला हवा.

३) स्रोतांची पडताळणी करा.

कोणताही गंभीर विषय मांडताना तो खरा आहे का, आपल्या माहितीमध्ये काही चुका तर नाहीत ना याची पडताळणी आपण केली पाहिजे. नाहीतर माहितीत तथ्य नसेल आणि आपण तरीदेखील ती सांगत असू तर आपण मोठ्या अडचणीत सापडू शकतो.

प्रामुख्याने, सार्वजनिक ठिकाणी तर गंभीर विषयांबद्दल बोलताना विचार करुन, स्त्रोतांची पडताळणी करुनच बोललं गेलं पाहिजे.

यातून गंभीर स्वरुपाच्या खोट्या माहितीचा प्रसार होण्यावरही आपण रोख लावू शकतो. त्यासाठी संशोधन करणं, जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.

४) बोलण्याचं धाडस करा

असंही अनेकदा होतं की आपल्याला एखाद्या गंभीर विषयावर बोलावं लागणार आहे पण बोलण्याचं धाडसच कमी पडतंय. अशावेळी पळवाटा शोधू नयेत. जे बोलण्याशिवाय गत्यंतर नाही तिथे धाडस एकवटून बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जर स्टेजवर उभं राहून एखाद्या संवेदनशील विषयावर बोलण्याची वेळ आली तर वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर त्यासाठी करा. श्रोत्यांना गंभीर विषय उदाहरणांनी पटवून दिला तर तेही त्या विषयाचा भाग होऊ शकतील. घाबरटपणे आपण गंभीर विषय बोलत असू तर कोणीही आपल्याकडे लक्ष देणार नाही.

५) बोलण्यापूर्वी काही वेळ स्वतःसोबत घालवा.

जो काही विषय आपल्याला बोलायचा असेल आणि तो गंभीर असेल तर साहजिकच आपल्या मनावर प्रचंड ताण निर्माण होऊ शकतो. कदाचित शब्दही फुटणार नाहीत. हे होऊ नये म्हणून बोलण्यापूर्वी काही वेळ शांत बसावं. स्वतःसोबत वेळ घालवावा.

दीर्घ श्वसन – संथ श्वसन घेत श्वसनाचा अभ्यास करा. यातून मनाचा ताण हलका होऊ शकेल आणि कितीही गंभीर, अवघड विषय सहजपणे मांडता येईल. जे बोलायचं आहे ते अधिक स्पष्ट होण्यासाठी देखील ही क्रिया मदतीची ठरु शकेल.

६) शब्दांमधून सहानुभूती दाखवा.

हलकाफुलका विषय असेल तर तो गंमतीजमतीने आपण समोरच्याला सांगू शकतो. पण गंभीर काही असेल तर तिथे गंमतजंमत चालत नाही. अशावेळी योग्य शब्दांचा वापर करणं आणि शब्दांमध्ये सहानुभूती असणं महत्त्वाचं असतं.

ज्या समुहासमोर, व्यक्तीसमोर आपण विषय मांडणार आहोत त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये, शांतपणे गंभीर विषय पोहोचेल याची काळजी आपण घेतली पाहिजे.

गंभीर विषय देखील आपण तोऱ्यात, त्यातलं गांभीर्य हरवून सांगत असू तर ते आपलं अपयश ठरु शकेल. आपला उथळपणा त्यात जाणवू शकेल. त्यामुळे सहानुभूती हवीच.

हे सहा मुद्दे गंभीर विषय व्यक्ती, समुहासमोर पोहचवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कुठे व्याख्यानात गंभीर विषयावर बोलायचं असो किंवा एखाद्या व्यक्तीला सांगायचं असो सगळ्या बाबतीत हे मुद्दे आपल्याला मदतीचे ठरु शकतील.

त्यामुळे त्याचा वापर आपण नक्की केला पाहिजे. तुम्हाला हे सर्व मुद्दे पटले ना? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button