इतिहासताज्या बातम्या

असे होते शिवाजी महाराजांचे आदर्शवत न्यायदान; एकदा नक्की वाचा…

शिवाजी महाराज एक सर्वगुणसंपन्न राजे होते. आपले अहोभाग्य असे की, ते महाराष्ट्रात जन्माला आले. किंबहुना आपण धन्य झालो की त्यांच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. 

शिवरायांचे राज्य आजही हवेहवेसे वाटते ह्याचे कारण म्हणजे स्वराज्यात न्याय मिळत होता. केवळ युद्धलढाई पुरते महाराज मर्यादित नव्हते त्यांचे न्यायदान देखील महत्वाचे होते. नेमके कसे होते शिवरायांचे न्यायदान पाहुयात आजच्या लेखात.

शिवाजी महाराजांपूर्वी बादशाही हुकूमतीत न्याय मिळत नव्हता. अर्थात पैशाने न्याय विकत घेता येत होता. लाच घेत न्याय देणारे सुद्धा आपले तत्व खुंटीला टांगून ठेवत होते. वतनदार व काही देशमुख लोक हवा तसा न्याय करायचे. पण ह्यामुळे रयतेस त्रास व्हायचा.

शिवरायांनी वतनदारीच संपवल्यामुळे न्यायशास्त्राचे स्वरूप बदलले होते. महाराजांनी आता वतनदार नव्हे तर सरकारी अधिकारी नेमले होते.

गावखेड्यात गोत सभा भरायच्या आणि परगण्यात पंचायत भरायची. ह्यावर कोणाला निकाल मान्य नसेल किंवा सरकारी अधिकारी न्याय देत नसतील तर रयतेला थेट शिवरायांकडे न्याय मागता येत होता.

कधी कधी तर शिवरायांचे सुद्धा निकाल आऊसाहेबांनी बाद करून पुन्हा निवाडा केल्याचे दिसते. अर्थात आज उच्च, सर्वोच्च न्यायालय दिसतात ते महाराजांनी त्या काळात निर्माण केले होते.

महाराजांनी राजाभिषेकावेळी न्यायाधीश व पंडितराव अशी दोन पदे निर्माण केली. न्यायाधीश उच्चस्तरीय निवाडे करणार आणि पंडितराव धर्मासंबंधी निवाडे करणार.

“रयत कुणाचे जप्तीत नाही” म्हणत महाराजांनी सर्वांना ठणकावून सांगितले की रयत कुणाच्या अखत्यारीत वा अधिकारात येत नाही. हे रयतेचे राज्य आहे.

महाराज सुद्धा सिंहासनावर आरूढ झाले तेव्हा तिथे सुवर्ण तुला होती. ह्या राज्यात न्याय मिळतो हाच त्या सुवर्णतुलेचा अर्थ होता. असे न्यायाचे राज्य शिवरायांनी केले होते. आता आपण शिवाजी महाराजांनी केलेले काही निवाडे पाहुयात.

स्त्री संबंधी न्यायदान:

शिवाजी महाराजांनी जे जे निवाडे केले त्यात स्त्री संरक्षण संबंधी केलेले न्यायदान अत्यंत प्रचलित आहे. रांझेगावच्या पाटलाने एका बाईसोबत बदअमल केले तेव्हा शिवरायांनी त्याचे हातपाय छाटून त्याचा चौरंगा करण्यास सांगितला. नारो त्रिमळ नावाच्या एका ब्राह्मणाने एका स्त्रीवर जबरदस्ती केली म्हणून महाराजांनी जावळी मारली आणि त्यास तिथे दंड दिला.

दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर बेलवडीच्या लढाईत मल्लव्वा देसाईंच्या स्त्री सैन्याला राजांच्या एका सरदाराने कैद केले म्हणून राजांनी त्याचे डोळे फोडले.

आणि सुभेदाराची सून देखील समोर कैदी असताना महाराजांनी तिला आई म्हणत चोळी बांगडी देत सन्मानाने पाठवले. असे अनेक न्याय करत राजांनी स्त्रियांची सुरक्षितता स्वराज्यात अबाधित ठेवली होती.

धर्मासंबंधीचे न्यायदान:

शिवाजी महाराजांनी धर्म आणि राजकारण कधीच एकत्र मिसळले नाही. एकदा काही पुजाऱ्यांचे ऐकून सिंहगडाच्या किल्लेदाराने काही गरीब लोकांना कोठडीत डांबून ठेवले होते.

तेव्हा महाराजांनी किल्लेदाराला जाब विचारला “तू नेमका नोकर कोणाचा? पुजाऱ्यांचा की माझा?” आणि त्या पुजाऱ्यास पत्र धाडून महाराज म्हणाले “आमचे बिरदे तुम्ही घ्या, नि तुमची बिरदे आम्हास द्या.” अर्थात आम्ही तुमची कामे करतो आणि तुम्ही आमचे काम करा.

अशी समज देत राजांनी धर्म आणि प्रशासन आपापल्या ठिकाणी ठेवले. एकदा मोरया गोस्वामींच्या शिष्यांना शेतकऱ्यांनी पडत्या भावात धान्य देण्यास नकार दिला तेव्हा महाराजांनी वैयक्तिक खर्चातून गोस्वामींचा उत्सव चालू ठेवला आणि एकीकडे शेतकरी सुद्धा जगवला. महाराजांनी न्यायदान केले तेव्हा ते पूर्ण केले, अर्धा न्याय केल्याचे ऐकिवात व वाचनात नाही.

हिंदू सरदारांना पुन्हा हिंदू केल्यानंतर देखील त्यांच्याशी सोयरिकी केल्या. अर्थात न्यायदान पूर्ण केले. जिथे पूर्वी हिंदूंची मंदिरं होती तिथल्या मस्जिदी पाडून राजांनी संपूर्ण न्याय केला होता.

इतर धर्मांचा आदर करत कोणाच्याच मूळ अधिकारावर राजांनी कधीच गदा आणली नाही. जिथे पूर्वीपासून मस्जिद होती तिला धक्का लागू दिला नाही हेच शिवरायांचे निःपक्षपाती न्यायदान होते.

प्रशासनासंबंधीचे न्यायदान:

शिवाजी महाराजांनी प्रशासन व राज्यव्यवहार संबंधीचे न्याय निवाडे केल्याचे आपण पाहतो. पोर्तुगीजांनी स्वस्त भावात मिठाचा व्यापार करत भूमीपुत्रांवर अन्याय केला म्हणून महाराजांनी जबरदस्त जकात लावून त्यांना माघारी पाठवले.

खंडोजी खोपडे सारखा माणूस अफझलखानाला जाऊन मिळाला तेव्हा राजांनी त्याचे हात पाय तोडले. पद्मदुर्ग बांधत असताना एका व्यक्तीने पैसा वेळेवर पोहोचवला नाही तेव्हा त्याला “ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो,” असे म्हणत ताकीद दिली.

एकंदरीत कोणाचीच जात किंवा धर्म न बघता न्यायाने राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज आजही मनामनात ह्याच न्यायदानामुळे घर करून राहिले आहेत. अशा न्यायालंकारमंडित शिवरायांना मनाचा मुजरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button