‘असे’ होते ग्वाल्हेरचे पराक्रमी शिंदे घराणे…
शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले त्याचे पुढे साम्राज्य झाले. बाजीराव पेशव्यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली. संपूर्ण हिंदुस्तानात मराठ्यांचा डंका वाजला. पण आता ह्या जबाबदाऱ्या संभाळण्या करिता मजबूत खांदे हवे होते. तेव्हाच निर्माण झाली विविध घराणी.
होळकर, मेहेंदळे आणि ह्यांच्याच सोबत शिंदे. हे शिंदे ग्वाल्हेरचे. पण त्यांचे मूळ कोणते, ह्यांना कसे ग्वाल्हेर मिळाले. ह्या घराण्यात कोणते महान लोक होऊन गेले त्यांनी काय पराक्रम केला आणि नेमका घराण्याचा इतिहास काय हे पाहुयात आजच्या लेखामध्ये.
साताऱ्यातील कण्हेरखेडकडे शिंदे घराण्याची पाटीलकी होती. हेच शिंदे औरंगजेबाचे मनसबदार असल्यामुळे छत्रपती शाहू मोगलांकडे असताना ह्यांच्यासोबत शिंदेंची सोयरिकी जुळली. दत्ताजी ह्यांचे पुत्र जनकोजी हे बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या पदरी नोकरीस होते.
ह्या जनकोजींबद्दल तितकी माहिती आज उपलब्ध नाहीये पण ह्यांना एक मुलगा होता. राणोजी शिंदे असे त्याचे नाव. ह्याच राणोजींपासून शिंदे घराणे मोठे झालेले दिसते.
थोरल्या बाजीरावांनी ह्या राणोजींना आपल्या घोडदळात घेतले होते. पुढे ते शिलेदार झाले, कर्नाटक व इतर मोहिमेमध्ये राणोजी सामील झाले होते. चिमाजी अप्पा ह्यांनी माळवाचा भाग जिंकल्यानंतर तो शिंदे, होळकर आणि पवर ह्यांच्यात वाटून दिला.
सुमारे दीड कोटीच्या वसुलीपैकी राणोजींना ६५ लाखांपेक्षा जास्त मुलूख मिळाला. हा त्यांनी कर्तृत्वावर जिंकला होता. माळवा भागात राणोजींनी चांगलाच जम बसवला. पुढे वसई किल्ल्याच्या मोहिमे दरम्यान राणोजींनी किल्ल्याला सुरुंग लावला होता.
राणोजी ह्यांनी खऱ्या अर्थी शिंदे घराणे वसवले असे म्हणता येईल. त्यांना जयाप्पा, दत्ताजी, जोतिबा, तुकोजी व महादजी अशी मुलं होती. ही सारी भावंडे सख्खी नव्हती. त्यात तुकोजी राणोजींच्याच आधी निधन पावले. जोतिबा ह्यांना दगा करून ओऱ्छाच्या राजाने मारले.
राणोजींनंतर जयाप्पा ह्यांच्याकडे शिंदे घराण्याची जबाबदारी आली. पण ह्यांना देखील विश्वासघात करून राजस्थानमध्ये मोहीमे दरम्यान मारण्यात आले. आता शिंदे घराण्याची सारी सूत्र दत्ताजी ह्यांच्याकडे आली होती.
दत्ताजी अत्यंत शूर होते. मराठ्यांच्या तलवारीचे पाणी त्यांनी रोहिल्यांना पाजलेच होते. पण अब्दालीने दिल्ली लुटल्यामुळे दत्ताजींना पेशव्यांनी बंदोबस्त करण्यास पाठवले होते. लाहोरचा बंदोबस्त, नजीबखनाचे पारिपत्य इत्यादी जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या.
लाहोरचा बंदोबस्त करून त्यांनी साबाजी शिंदे ह्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. पण नजीबखानाला कैद करून देखील मल्हाररावांच्या ओळखीने तो सुटला होता. नंतर मात्र बुराडीच्या घाटात दत्ताजी व अब्दालीची लढाई झाली.
नजीबने डाव साधला होता. १० जानेवारी १७६० ला दत्ताजींना वीर मरण आले. त्यांना मारताना विचारले होते, “क्यू पाटील और लढोगे” त्यावर दत्ताजी म्हणाले होते, “क्यूँ नहीं. बचेंगे तो और भी लड़ेंगे.” दत्ताजींच्या नंतर त्यांचा पुतण्या अर्थात जयाप्पा ह्यांचा पुत्र कारभार पाहू लागला.
हेच ते जनकोजी जे पानिपतच्या लढाईत मारले गेले. आपल्या काकाला नजीबाने व अब्दालीने मारले ही सल त्यांच्या उरी होतीच. पुढे सदाशिवराव भाऊ ह्यांच्या नेतृत्वात लाखो मराठे पानिपतावर लढले. मोठी लढाई झाली. त्यात जनकोजींनी आपला पराक्रम गाजवला. त्यांना मारल्यानंतर किती तरी वेळ ते जिवंत राहिले पण नंतर त्याच भूमीवर त्यांनी देह ठेवला.
पुढे शिंदे घराण्याची सर्व सूत्रं महादजी ह्यांच्याकडे आली. महादजी ह्यांनी शिंदे घराण्यावर कळस चढवला असे म्हणता येईल. महादजी ह्यांनी अनेक लढाया केल्या पण युरोपीय पद्धतीने लढाई करणाऱ्यांना सोबत घेऊन त्यांना दिल्ली वर भगवा फडकवायचा होता.
त्यांचे ते स्वप्न पूर्ण झालेच. आज देखील महादजी शिंदे ह्या कार्यासाठी ओळखले जातात. महादजी पुण्याला निधन पावले. त्यांना मुलबाळ नव्हते त्यामुळे त्यांच्या भावाचा नातू दौलतराव आता राजा झाला. दौलतराव इतके कर्तबगार नव्हते. मुळात महादजींच्या विधवा बायकांचे आणि ह्या दौलतरावांचे जमलेच नाही.
तरी काही लढाया करून दौलतराव निधन पावले. त्यांना देखील आपत्य नसल्याने त्यांच्या पत्नीने मुलं दत्तक घेतले. हे ते जनकोजी दुसरे. ह्यांनी देखील विशेष असे कार्य केले नाही. पुढे मात्र इंग्रजांनी शिंद्यांचा १८ लाखांचा प्रदेश जिंकला.
आणि इतर घराणे जशी लयास गेली तसेच हे शिंदे घराणे लय पावले. केवळ नामधारी राजे इथे उरले. आज ह्यांची पिढी ग्वाल्हेरलाच राहते. शिंदेंच्या पूर्वकालीन शासकांनी मात्र असा काही पराक्रम गाजवला ज्याचे आज देखील पोवाडे गायले जातात. कशी वाटली ही माहिती. कमेंट करून नक्की सांगा.