ताज्या बातम्यामाहितीपूर्ण
या ठगाने चक्क ताजमहाल आणि राष्ट्रपती भवन विकले…
घर विकलं जातं, फ्लॅट विकला जातो, शेतजमीन विकली जाते, हे असे खरेदी – विक्रीचे व्यवहार आपण कायम ऐकत असतो. पण चक्क ताजमहाल विकला गेल्याचे तुम्ही कधी ऐकलं आहे का? ताजमहाल विकणाऱ्या त्या महाभागाची कहाणी वाचुया या लेखात!
या ठगाचं नाव आहे ‘नटवरलाल’. पण हे ही त्याचं खरं नाव नसून टोपणनाव आहे. त्याचं खरं नाव मिथिलेश श्रीवास्तव. मूळचा बिहारमधील सिवान जिल्ह्यातील बांगरा गावातला हा पठ्ठ्या तसा ऐरागैरा नव्हताच, तर तो कायद्याचा पदवीधर होता.
पण त्याला वकिली आवडत नव्हती. त्याला वेगळं काही करायचं होतं, म्हणून त्याने फसवणूक आणि चोरीचा मार्ग निवडला. नटवरलालने पहिली चोरी केली ती १००० रुपयांची. शेजाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून त्यांच्या बँक खात्यातून हे पैसे नटवरलालने काढून घेतले होते.
त्यानंतर लोकांना फसवण्यातच त्याला थ्रील वाटू लागलं आणि या असूरी आनंदातूनच जन्माला आला ‘मिस्टर नटवरलाल!’ मग काय, या कौशल्याचा त्यानं चांगलाच उपयोग करायला सुरुवात केली.
नटवरलालला फारसे इंग्रजी येत नव्हते. पण जे येत होतं, ते त्याला पुरेसं होतं. अधिक इंग्रजी जर का येत असतं तर कदाचित त्याच्या कारनाम्यांच्या कहाण्या भारतातच नव्हे तर परदेशातही सांगितल्या गेल्या असत्या.
तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी नटवरलालच्या शेजारच्या गावाला भेट दिली तेव्हा नटवरलालला डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भेटण्याची संधी मिळाली. त्याने त्यांच्यासमोर राष्ट्रपतींच्या हूबेहूब स्वाक्षऱ्या करून सर्वांनाच चकित केले.
डॉ. राजेंद्र प्रसाद या करामतीने प्रभावित झाले. त्याने डॉ. राजेंद्र प्रसादांना सांगितले की, “तुम्ही एकदा आज्ञा द्याल तर मी भारताला कर्जमुक्त तर करेनच पण इतर देशांना भारताचा कर्जदार बनवू शकेन.”
नटवरलालला नोकरी करण्यात रस नव्हता. त्याला हुबेहुब सह्या करण्याची जणू अमोघ सिद्धी प्राप्त झाली होती. राष्ट्रपतींची स्वाक्षरी वापरून नटवरलालने चक्क ताजमहाल तीनदा, लाल किल्ला दोनदा आणि राष्ट्रपती भवन एकदा विकले.
आजच्या काळात आपण अनेकदा ऐकतो की, असा मंत्री विकला गेला, असा अधिकारी विकला गेला. पण, नटवरलालने त्या काळात अधिकारी, मंत्र्यांसह, ५४५ सभासद असलेलं संसद भवन देखील लीलया विकले.