महाराष्ट्राची तुळजाभवानी आहे नेपाळची देवता…
संपूर्ण भारताचे शिव आणि पार्वती हे कुलस्वामी व कुलस्वामिनी आहेत. विविध रुपात त्यांना देशात सर्वत्र पूजलं जातं. महाराष्ट्रातही देवीची बरीच रूपे आहेत.
पण बहुतांश कुटुंबांची कुलस्वामीनी आहे ती श्री जगदंबा तुळजाभवानी.तुळजाभवानी नेपाळमध्ये देखील आढळते.
ऐकून आश्चर्य वाटले ना? तुळजाभवानी आणि नेपाळचा काय संबंध आहे जाणून घेऊया! नेपाळ मध्ये ही देवी ‘देगु तलेजूभवानी’ या नावाने प्रसिद्ध आहे.
नेपाळमध्ये कर्नाट वंशाचा राजा हरिसिंहाच्या काळात म्हणजेच १३२०-२५ च्या दरम्यान भक्तपुर या गावी तलेजूभवानी देवीची स्थापना करण्यात आली. हा हरिसिंह मूळचा बिहारमधील चंपारण्य भागाचा ‘राजा’ होता. परकीय आक्रमक घियासुद्दीन तुघलकाने या चंपारण्य भागावर केलेल्या हल्ल्यात हरिसिंहाचा पराभव झाला आणि त्याला नेपाळमध्ये पत्नी आणि मुलांसह सुरक्षित आश्रयस्थानी राहण्यासाठी जावे लागले.
हरिसिंहाने या भक्तपूरच्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन केलं आणि त्याने चंपारण्यातून आणलेल्या तुळजाभवानी देवीचं मंदिर बांधून इथं तिच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पुढे हरिसिंहाने आपले राज्य वाढवत पाटण, काठमांडूपर्यंत नेले आणि या देवीमुळेच हे राज्य वाढले म्हणून देवी खूप प्रसिद्धीस पावली.
पुढे हरीसिंहाच्या वंशजांनी आजची नेपाळची राजधानी ‘काठमांडू’ व पाटण या ठिकाणी देवीची मंदिरे बांधली. ‘नेवारी’ या नेपाळी वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणजे ही मंदिरे आहेत. बौद्ध पॅगोडाप्रमाणे याची रचना केलेली असते. याला स्थानिक लोक ‘दरबार’ म्हणतात.
आपल्याकडे उत्तर भारतीय लोक ही देवीच्या मंदिराला याच नावाने ओळखतात. या नंतर नेपाळवर शाह, मल्ल, राजपूत या राजघराण्यांची सत्ता होती.
ही घराणी जरी वेगवेगळी असली तरीही त्यांची कुलदेवता ही देगु तलेजू भवानीच होती. आजही सामान्य व्यक्ती या भवानी मंदिरात जाऊ शकत नाही कारण ही राजघराण्याची कुलदेवता आहे. ही मंदिरे राजघराण्याच्याच अधिपत्याखाली येतात.
देवीचं पुजारी घराणं सुद्धा एकच आहे, जे कित्येक वर्षे वंशपरंपरेने देवीची सेवा करत आहे. भक्तपुर मध्ये या पुजाऱ्यांना ‘मानकर्मचार्य’ असं म्हणलं जातं.
मुख्य पुजारी हा ब्राह्मण आहे तर बाकी लोक हे ‘सोलोकास्ट’ म्हणून ओळखले जातात. तुळजापुरात याच लोकांना सोळा सेवेकरी असं म्हणलं जातं.
तलेजू भवानीची मूर्ती ही दशभुजा म्हणजेच दहा हात असणारी आहे. त्रिशूल घेतलेली भवानी महिषासुराचा वध करताना दिसते. बाकी नऊ हातांमध्ये विविध शस्त्रे आहेत. सोन्यापासून बनवलेल्या या देवीच्या मूर्तीचे वजन सुमारे ११० किलोपर्यंत आहे. नेपाळमधील मंदिरातही तुळजापूरप्रमाणे नवरात्रीत घट बसवले जातात.
घटाच्या बाजूला उगवून आलेल्या तृणांना ‘जामरा’ म्हणलं जातं. वर्षाच्या सुरुवातीला येणारं चैत्री नवरात्र आणि अश्विन महिन्यामधील शारदीय नवरात्र असे दोन उत्सव या मंदिरात साजरे होतात. तुळजापुरात जसा फुलोरा विधी हा सातव्या माळेच्या दिवशी साजरा होतो, तसाच विधी भक्तपुरला ही मोठ्या प्रमाणावर साजरा करतात.
घट बसवण्याचं काम हे पुरुष करतात. स्त्रियांना इथं काही करू दिलं जात नाही. विजयादशमी हा सण आपल्यासारखाच नेपाळ मध्येही महिषासुरावर देवीनं मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ साजरा होतो.
यावेळी देवीसमोर चौपन्न रेडे आणि चौपन्न बोकडांचा बळी दिला जातो. बाकी नवस फेडण्यासाठीही दिले जाणारे बळी वेगळेच. या दिवसांत मंदिराचा आवार लालेलाल होऊन जातो.
देवीच्या मंदिराबाहेर अखंड पाषाणात कोरलेली एक अक्राळविक्राळ मूर्ती दिसते. त्याला भैरव म्हणतात. तो शिवाचा गण म्हणून ओळखला जातो व देवीचा सुरक्षा रक्षक मानला जातो. त्यालाही जनावराचा आणि मद्याचा नैवेद्य दाखवला जातो.
तुम्ही नाव तुळजाभवानी घ्या किंवा तलेजुभवानी. ती शक्तीस्वरूप एकच आहे. विश्वाची शक्ती आहे. भक्तांच्या इच्छेखातर ती वेगवेगळी नावं धारण करते.