इतिहासताज्या बातम्या

महानुभाव पंथ स्त्रियांविषयी काय सांगतो? चक्रधर स्वामी

महानुभाव अर्थात ज्यांचा अनुभव थोर आहे किंवा महान आहे असे. महानता अध्यात्माची, भक्तीची, वैराग्याची जिथे आहे तो हा महानुभाव पंथ. श्री कृष्णाचे उपासक व वेदांना प्रमाण न मानता केवळ भक्तिभाव जपणारा हा संप्रदाय आहे.

हल्लीच्या काळात ह्या पंथामध्ये अनेक नियम-अटी दिसतात मात्र एकेकाळी ह्याच पंथाने कर्मकांडांना कडाडून विरोध केला होता. जरी नियम असले तरी हा पंथ कर्मकांड मानत नाही. नियम केवळ भक्ती व उपासनेसाठीच आहेत.

पण महानुभाव पंथाच्या बाबतीत केलेल्या चुकीच्या प्रचारामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, महानुभाव पंथामध्ये विचारांची महानता आहे का? हा संप्रदाय स्त्रियांसाठी पण आहे का?

की पूर्वीप्रमाणेच ह्याने देखील स्त्रियांना शूद्र ठरवले आहे. नेमके महानुभाव पंथ स्त्रियांविषयी काय सांगतो, ह्याचे उत्तर जाणून घेऊ आजच्या लेखात.

महानुभाव पंथ निर्माण करणारे चक्रधरस्वामीस्वतः विचारांनी थोर होते. त्यांना हे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक काळ मौन बाळगावे लागले.

शांत बसून त्यांनी इतर सर्व संप्रदायाचा व उपासना पद्धतींचा विचार केला. शूद्रांची व स्त्रियांची होणारी अध्यात्मिक हानी त्यांना बघवत नसे.

तेव्हाच त्यांनी हा पंथ स्थापन केला. न स्त्री स्वातंत्र्य महती असे म्हणत शास्त्रांनी स्त्रियांचे स्वातंत्र्य काढून घेतले होते. स्त्रीजन्म व शूद्र कुळात जन्म म्हणजे केवळ पूर्वजन्मीचे पाप असे धर्म मानायचा.

ह्यालाच विरोध करत चक्रधर स्वामींनी महान अनुभूतीसाठी निर्माण केलेला हा पंथ होता. पंथ म्हणजेच मार्ग, एक विचारधारा.

वर्णव्यवस्थे प्रमाणे ब्राह्मणांना ज्ञानाचा अधिकार होता. क्षत्रियांना म्हणावा तितका अधिकार नव्हता. पण शूद्र व स्त्रियांवर मात्र खूप अन्याय व्हायचाच. चक्रधर स्वामींनी पंथ निर्माण केला तेव्हाच ‘नागाईसा’ नावाच्या स्त्रीला त्यांनी दीक्षा दिली. ह्या स्त्रीला संन्यास घ्यायचा होता.

त्या काळात स्त्रियांनी देव धर्म केवळ घरात करावा अशी मान्यता होती. तेव्हा नागाईसाला संन्यास देणे म्हणजे मोठे क्रांतिकारी पाऊल उचलण्यासारखे होते.

जे चक्रधरांनी केले. त्याचप्रमाणे त्यांनी विधवा स्त्रियांना देखील संप्रदायात घेतले. कोणतेही कर्मकांड न मानता देवाची भक्ती करण्यास शिकवले.

स्त्री व पुरुष समान आहे हेच चक्रधारांचे विचार होते. ते म्हणायचे “पुरुषांचा तो जीव व स्त्रियांचा काय जीवलिया काय?” अर्थात पुरुषांप्रमाणे स्त्रीचा देखील जीव आहे, तिला देखील अध्यात्मिक उन्नतीचा अधिकार आहे.

महानुभाव पंथ केवळ स्त्रियांना अध्यात्माचे ज्ञान देण्यापुरता मर्यादित राहीला नव्हता तर मासिक पाळी सारखे विटाळाचे थोथंड ह्या पंथाने मोडून काढले होते. एकदा महदंबा नामक स्त्री चक्रधारांपासून लांबवर बसली होती.

तिला चक्रधरांनी जवळ येऊन बसण्यास सांगितले. उपदेश ऐकू येत नव्हता तरी महदंबा जवळ आली नाही. कारण विचारता तिने मासिक पाळीचा धर्म सांगितला.

तेव्हा चक्रधर स्वामी म्हणाले, बाई जैसा नाका शेंबूड ये, तोंडा थुंका ये, काना मळ ये, डोळीया चिपडिया येती, गुह्यद्वारा मळू ये, तैसा हा एकी धातू स्त्रवे.. तयाचा विटाळ धरु नये“.

हे सांगत चक्रधरांनी केवळ स्त्रियांना स्वातंत्र्य नाही दिले तर त्यांच्या भावना व परिस्थिती देखील समजून घेतली. महदंबाला कळले की अध्यात्मात ह्या गोष्टींचा विटाळ होऊच शकत नाही ती म्हणाली आजपासून न धरी जी म्हणजेच हे कर्मकांड व रूढी मी आजपासून पाळणार नाही.

महानुभाव पंथामुळे स्त्रियांना अध्यात्मातले ज्ञान मिळाले होते. त्याचे फलस्वरुप ह्या पंथातील स्त्रियांनी स्वतः लिखाण केले. अहिंसेचे व्रत पाळून कोणतेच कडकडीत वैराग्य नसताना ह्या स्त्रियांना देव समजला होता.
महानुभाव पंथाने स्त्रियांना पुरुषांप्रमाणे अधिकार दिल्यामुळे त्या काळातील स्त्रियांची प्रगतीच झाली. आशा आहे की, ही माहिती वाचल्यानंतर तुमचे महानुभाव पंथाविषयीचे गैरसमज दूर झाले असतील. लेख आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button