विभाजनाच्या वेळी पाकिस्तानला पैसे देण्यासाठी गांधीजींनी उपोषण का केले? कारण जाणून व्हाल अवाक्…
भारतात आज देखील एका घटनेची आठवण काळजाचा थरकाप उडवते आणि ती म्हणजे भारत पाकिस्तानची फाळणी. ह्या फाळणीचे तडाखे सर्वांनाच बसले नसले तरी त्यातील क्रौर्य आणि लोकांची झालेली अवस्था ही मन हेलावून टाकते.
ह्या फाळणीतील काही मुद्यांवर आज देखील वाद होत असतात. काही देशभक्तांसाठी ही फाळणी योग्य होती तर काहींसाठी मात्र ही आपण केलेली घोडचूक होती.
ही फाळणी नक्की इंग्रजांनी केली की भारतीयांनी ह्याचं स्पष्ट उत्तर अजून तरी आपल्याकडे नाहीये. यातही भारताने पाकिस्तानला ५५ करोड रुपये द्यावेत ह्यासाठी गांधीजींनी उपोषण केले होते.
ही बाब काहींना बरोबर वाटते तर काहींना चुकीची वाटते. ह्या गोष्टीमुळे भारताला नुकसान भोगावे लागले की त्यातील आपली तत्त्वं चुकली होती हे मात्र ज्याने त्याने ठरवावे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. त्याच विषयावर जरा प्रकाश टाकूयात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्यांच्या “द पार्टिशन ऑफ इंडिया अँड पाकिस्तान” ह्या ग्रंथात विभाजनाच्या मुद्यावर बाबासाहेबांनी स्वतःचे विचार प्रकट केलेले दिसतात. एकीकडे सावरकरांना हा फाळणीचा निर्णय मान्य नव्हता.
असे अनेक क्रांतिकारक होते ज्यांना ही फाळणी मान्य नव्हती. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने ती फाळणी झाली. फाळणीनंतर घडलेल्या घटना मात्र भीषण होत्या. त्या घटनांची आठवण झाली की ही फाळणी व्हायला नको होती असे वाटते.
१९४७ ला फाळणी झाली पण ह्या नंतर सीमा भागात दंगली झाल्या. दगडाचे उत्तर दगडाने, हत्येचा विरोध हत्येने, आगीच्या बदल्यात आग असे सर्वत्र चित्र होते. इतक्या भीषण दिवसात एक दिवस तर असा उगवला की पाकिस्तानमधून अमृतसरला आलेल्या ट्रेनमध्ये भयाण शांतता होती.
खूप वेळ झाला तरी ट्रेन मधून कोणीच खाली उतरले नाही म्हणून लोकांनी ट्रेनचे दरवाजे उघडले; तेव्हा ट्रेनमधले चित्र हृदय पिळवटून टाकणारे होते. आतील प्रत्येक व्यक्तीची कत्तल झाली होती. कोणाचे डोळे फुटले होते, तर कोणाचे गळे चिरले होते.
कोणाच्या डोक्याला जखम झाली होती तर काहींचे कपडे फाटले होते. रक्ताळलेल्या त्या ट्रेनमध्ये खूप वास येत होता. तिथेच बाजूला पांढऱ्या अक्षरात लिहिले होते. “नेहरू और पटेल को हमारे तरफ से आझादी का ये तोहफा…” ह्या गोष्टींमुळे दंगली आणखी पेटल्या.
पाकिस्तानने आपला रंग दाखवला होता. अनेक ठिकाणी लढाया झाल्या होत्या. संस्थानिक लोक सुद्धा इकडे तिकडे जात होते. ह्या भयाण काळात देखील गांधीजींची इच्छा होती की पाकिस्तानला उरलेले ५५ कोटी रुपये भारताने देऊन टाकावे.
आता हे कोणते पैसे होते ते पाहुयात. भारत पाकिस्तान फाळणीच्या अटींमध्ये अनेक वाटण्या ठरल्या होत्या. जनावरांच्या, धान्याच्या, पुस्तकांच्या, संस्थानिकांच्या, पैशांच्या ह्या वाटण्या होत्या. त्या वेळेस रिझर्व्ह बँकेत ४०० कोटी रुपये होते असे काही लोक सांगतात.
मात्र काहींच्या मते १५५ कोटी इतकीच रक्कम बँकेत होती. पाकिस्तानला ह्यातले ७५ कोटी मिळतील असे भारताने वचन दिले होते. त्यातले २० कोटी हे फाळणी दरम्यान देण्यात आले. हेच ते उरलेले ५५ कोटी होते. आता हे समजून घेतले पाहिजे की दोन्ही देशांच्या बँकेचे काम १९४८ पर्यंत रिझर्व्ह बँक बघणार होती.
त्यासाठी पाकिस्तानचे गुलाम महंमद, जाहिद हुसैन आणि कुरेशी असे तीन आणि भारताचे के. जी. आंबेगावकर, संजीव रो आणि एम. वी. रंगाचारी असे तीन लोक नियुक्त करण्यात आले होते.
काश्मीरमध्ये होणाऱ्या सारख्या युद्धांमुळे दिल्लीमध्ये लोकांचे म्हणणे होते की हे ५५ कोटी भारताने पाकिस्तानला देऊ नये. आपल्या कडील भयाण परिस्थितीत पैसे देणे चुकीचे आहे.
शिवाय ह्या पैश्यांचा वापर पाकिस्तान आपल्या विरुद्ध युद्धासाठीच करेल हे उघड होते. ह्याचा विचार करून ७ जानेवारी १९४८ ला निर्णय देण्यात आला की भारत पाकिस्तानला पैसे देणार नाही.
ह्या नंतर गांधीजींनी उपोषण केल्याचे दिसते. गांधीजींना एक इंग्रज अधिकारी म्हणाला होता की, ‘हे पैसे भारताने दिले नाही तर आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बदनामी होईल.
शिवाय भारताने दिलेले वचन पाळावे असेच सगळे म्हणतील.’ सरदार वल्लभाई पटेल आणि नेहरूंचा ह्या गोष्टीला विरोध होता खरा पण अनेक दिवस चाललेले हे उपोषण अखेर सफल ठरले. भारताने पाकिस्तानला ५५ कोटी देऊन टाकले.
आता ही भारताची किंवा गांधीजींची चूक होती की वचन पाळण्याचे तत्व होते हे सांगणे कठीण आहे. ह्यासाठी आज देखील लोक गांधीजींच्या त्या निर्णयाचा निषेध करतात.
काही जणांच्या मते पैसे देऊन देखील गांधीजींनी उपोषण सुरू ठेवले होते, ह्याचाच अर्थ त्यांचे उपोषण त्या ५५ कोटींसाठी नव्हते तर दिल्लीतील दंगली थांबवण्यासाठी होते.
आता तेव्हा काय झाले हा अभ्यासाचा विषय आहे. मात्र भारताने पाकिस्तानला पैसे द्यायचेच होते तर नंतर द्यायला पाहिजे होते, चुकीच्या वेळी पाकिस्तानला पैसे दिल्याने हा निर्णय चुकला असे आजही लोकांना वाटते.
स्वातंत्र्य मिळविण्याच्या संगरात आपल्या नेत्यांना त्या त्या वेळी जे जे योग्य वाटले ते ते त्यांनी केले. एवढं मात्र नक्की की आपल्याला आपले स्वातंत्र्य अनेक गोष्टी गमावून मिळाले आहे.
म्हणूनच आपण या स्वातंत्र्याचा आदर राखला पाहिजे. आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.