सावरकर आणि सुभाषचंद्र बोसांची ती गुप्त भेट का झाली?
भारतीय इतिहासात क्रांतिकारकांच्या आणि समाजसुधारकांच्या झालेल्या भेटी अत्यंत आश्चर्यकारक ठरल्या आहेत. वेगळी विचारधारा, वेगळा मार्ग असूनही ही मंडळी एकमेकांचा आदर करायची. पण ह्या सर्व भेटींमागचा उद्देश केवळ भारताच्या हिताचा होता.
अशीच भेट २२ जून १९४० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस ह्यांच्यात झाली. हे दोन्ही क्रांतिकारक कसे होते, त्यांच्यातील समान व विरोधी विचार कोणते होते आणि त्यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, तिचा भारताला फायदा झाला की नाही, हे सारे पाहुया आजच्या लेखात.
तसे पाहता सावरकर आणि सुभाषचंद्र बोस ह्यांच्या मध्ये दोन गोष्टी समान असल्याचे कळते. हे दोघेही सशस्त्र क्रांतिकारक होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतके महान असूनही त्यांना तत्कालीन आघाडीच्या नेत्यांनी तांदळातील खडा काढून टाकावा तसे बाजूला केले.
अर्थात त्या वेळेस दोन प्रकारच्या विचारसरणी क्रांतिकारकांमध्ये बघायला मिळत होत्या. एक जहाल क्रांतिकारक आणि दुसरे मवाळ क्रांतिकारक. जहाल म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक.
ह्या देशाला स्वातंत्र्य मिळेल ते केवळ शस्त्र हाती घेऊनच, अशी त्यांची विचारधारा होती. आता असे असले तरी जहाल विचारसरणीमध्येही अनेक गट पडले होते. सावरकर आणि बोस त्याचेच उदाहरण आहेत.
सावरकर काँग्रेसचे विरोधक होते तर सुरुवातीला बोस हे काँग्रेसमध्येच होते. सावरकर हिंदुत्ववादी होते तर सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे होते. या दोघांची कार्य करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी त्यांचे ध्येय स्वातंत्र्य मिळवणे हेच होते. आणि म्हणूनच ह्यांच्यात झालेल्या भेटीगाठी महत्वपूर्ण ठरतात.
काँग्रेसचे वर्चस्व वाढू लागले होते आणि त्याच काळात दुसरे विश्वयुद्ध होणार होते. इकडे सावरकरांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. ह्या विश्वयुध्दात भारतीय तरुणांनी इंग्रजांची साथ द्यावी आणि सैन्यभरतीत सामील व्हावे असे सावरकांनी सांगितले.
ह्याला काँग्रेस देशद्रोह मानू लागली. पण असे केले नसते तर आपल्या तरुणांना इंग्रजांविरोधात लढता आले नसते. मोठ्या तंत्रज्ञानाला आणि युद्धप्ररणालीला आपण मुकलो असतो.
एकीकडे हे होत असताना तिथे सुभाषबाबूंनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस अंतर्गतच ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना केली होती. ह्या संघटनेचे पहिले काम होते कलकत्त्यात घडलेल्या ‘ब्लॅकहोल ट्रॅजेडी’मध्ये सामील असणाऱ्या हॉलवेलच्या पुतळ्याला हटविण्याचे.
बोस ह्यांनी जिन्हांची भेट घेऊन त्यांना सारे काही सांगितले. हिंदू-मुस्लिम ऐक्य साधून हे काम करूयात व इंग्रजांना भारतीयांची एकी दाखवुया, असेच बोस ह्यांना वाटत होते. पण जिन्हांनी सुभाषचंद्रांना सावरकरांची भेट घेण्यास सांगितले.
तेव्हा सावरकर जेलमधून सुटून आले होते. नागपुरात सुभाषचंद्र ह्यांच्या ‘फॉरवर्ड ब्लॉक’चे अधिवेश होते. त्याच दरम्यान झालेली ही भेट होती. २२ जुन १९४० रोजी मुंबई मधील सावरकर सदन येथे या दोन महान क्रांतिकारकांची भेट झाली.
सुभाषचंद्र ह्यांनी हॉलवेलचा पुतळा हटवण्याची मोहीम सावरकरांना सांगितली. पण त्यावर सावरकरांनी बोस ह्यांना सूचना केली की, ह्या छोट्या कामासाठी जेलमध्ये जावे लागेल त्यापेक्षा भारतातून निसटून जपान, जर्मनी मध्ये जा.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे तत्व सावरकर जाणून होते. तिकडे जपानमध्ये रासबिहारी बोस, भारतातील तरुण मुलांचे संघटन करत होते. ही तीच मुलं होती ज्यांना इतर देशांनी विश्वयुध्दात भाग घेतल्यामुळे तुरुंगात टाकले होते.
अर्थात एकीकडे सावरकरांनी ह्या मुलांना तंत्रज्ञानासाठी इंग्रजांच्या बाजूने युद्धात भाग घ्यायला लावला व दुसरीकडे अटक झालीच तर इंग्रजांविरुद्ध लढण्यास सांगितले. ही एक प्रकारची खेळीच होती. आता ह्या मुलांना योग्य नेतृत्वाची गरज होती.
जर्मनी-जपान मध्ये जाऊन ह्या मुलांना मार्गदर्शन करावे, हेच सावरकरांनी बोस ह्यांना पटवून दिले. त्याकाळात ह्या भेटीतली चर्चा गोपनीय ठेवण्यात आली होती पण पुढे १९५२ मध्ये ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेच्या कार्यपूर्ती दरम्यान सावरकरांनी हा प्रसंग सांगितला होता. म्हणून आपल्याला ह्या भेटीविषयी समजले.
सावरकरांनी सुभाषचंद्र बोस ह्यांचे वर्णन करताना सांगितले की, “सुभाष बाबू ह्यांचे स्वातंत्र्य लढ्यात अजरामर असे योगदान होते” तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांविषयी रेडिओवर बोलताना कौतुकाने म्हणाले होते की,
“काँग्रेस ज्यांना भाडेकरू शिपाई म्हणत होते, त्या तरुणांना सावरकरांनी संघटित करून विश्वयुध्दात भाग घेण्यास सांगितला, ज्याचा देशाला फायदा झाला.”
मार्ग वेगळे असले तरी विचार आणि ध्येय एकच असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची ही भेट इतिहासात विशेष ठरते. भारतासाठी ह्या मंडळींनी एकत्र येत प्रसंगी आपले मतभेद बाजूला ठेवले आणि देशाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या दोन महान क्रांतिकारकांना मनपूर्वक आदरांजली..