ताज्या बातम्याट्रेंडिंग

लवकरचं क्यु आर कोड असणारे सिलेंडर होणार सुरू, ‘असा’ होणार सामान्य जनतेला फायदा…

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एलपीजी वीक २०२२ मध्ये एलपीजी सिलेंडरची सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक योजना मांडली आहे. एलपीजी सिलेंडरबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असून त्यामध्ये गॅस चोरी, सिलेंडर गळती, सिलेंडरची खराब स्थिती अशा अनेक तक्रारींचे निराकरण होत नाही. (Cylinders with QR code will be launched soon, ‘this’ will benefit the common people…)

अशा परिस्थितीत प्रत्येक सिलेंडरसाठी एक क्यूआर कोड तयार केला जात आहे, ज्यामध्ये सिलेंडरशी संबंधित सर्व माहिती मिळू शकते.अशा सर्व सुविधा तुमच्या एलपीजी गॅस सिलिंडरपासून सुरू होणार आहेत. पण नेमकं हा क्यूआर कोड काय आहे, कोडचे काय फायदे होतील आणि यामागे हरदीप सिंग पुरी यांचा नेमका प्लॅन काय ते आपण जाणून घेऊयात.

देशात लवकरच क्यु आर कोड असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार आहेत सरकारी ऑईल व नैसर्गिक वायू कंपनी इंडियन ऑयल ने एलपीजी सिलिंडर्ससाठी यूनिट कोड-बेस्ड ट्रॅक आणि ट्रेस प्रणाली सुरू केली आहे.आता क्यु आर कोड म्हणजे नेमकं काय तर क्यु आर कोड हा मशीन-वाचनीय माहिती संग्रहित करण्याचा एक मार्ग आहे.

चौरसकृती जागेत काळे ठिपके आणि पांढऱ्या स्पेसचे नमुने वापरून क्यु आर कोड डेटा संग्रहित करतात. आपण कॅमेरा किंवा स्कॅनर च्या मदतीने हे नमुने स्कॅन करू शकतो. स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्यातील माहिती समजते. तर घरगुती गॅस सिलेंडरवर क्यूआर कोड असणारे स्पेशल लेबल लावले जाईल अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक प्रकारचा बारकोड आहे. जो डिजिटल डिवाइस द्वारे रीड केला जाईल.

क्यु आर कोड लावण्यामागे सरकारचा उद्देश्य गॅस चोरी रोखणे आणि सुरक्षा प्रदान करणे आहे. इंडियन ऑइलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा गॅस सिलेंडरवर क्यु आर कोड बसवले जाईल तेव्हा त्यांचे ट्रॅकिंग करणे अगदी सोपे होईल. सध्या ज्या सिलेंडरमध्ये कमी गॅसची तक्रार आहे, तो कोणत्या डीलरकडून आल्याचे सिद्ध करणे कठीण व्हायचे.

ते कोणत्या डीलरकडून आले आहे हे माहीत असले तरी ते सिलेंडर कोणत्या डिलिव्हरीमनने दिले हे सांगता येत नव्हते. मात्र आता सिलेंडरवर क्यूआर कोड टाकल्यास क्षणार्धात सर्व काही कळेल. मग अश्यात गॅस चोर पकडणे अतिशय सोपे होईल. आता या क्यु आर कोडच्या ग्राहकांना काय फायदा होणार?

तर ग्राहक क्यूआर कोडच्या माध्यमातून सिलेंडर चोरी झाल्यानंतर ते ट्रॅक तर करू शकतीलच पण त्याच बरोबर. सिलेंडर च्या गुणवत्तेचे ऑडिट करू शकतील. या कोडच्या माध्यमातून ग्राहकांना सिलेंडरशी संबंधित सर्व माहिती काही मिनिटात मिळेल आणि त्यांचे बरेच काम सोपे होतील, यासोबतच वेळही वाचेल.

यावरून कोणत्या सिलेंडरमध्ये किती वेळा रिफिलिंग केले आहे हे कळेल. तसेच सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर परत येण्यासाठी किती दिवस लागतात, हे देखील समजणे सोपे होईल. जर कोणी घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिकरित्या वापरताना पकडले गेले, तर ते कोणत्या डीलरकडून वितरित केले गेले हे शोधणे सोपे होईल. असेही सांगण्यात येत आहे कि देशभरात जवळपास ७० कोटी घरगुती गॅस सिलेंडर आहेत.

एलपीजी सिलेंडरमध्ये क्यूआर कोड प्रणाली तीन महिन्यांत लागू केली जाईल. नवीन सिलेंडरमध्ये आधीच क्यु आर कोड असेल, परंतु जुन्या सिलेंडरमध्ये वेगळा क्यु आर कोड बसवला जाईल, ज्यासोबत मोबाईल नंबर देखील लिंक केला जाईल. पुढील तीन महिन्यांत क्यु आर कोड बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्याची सुरुवात आधीच झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button