ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

कुत्रे गाड्यांच्या मागे लागण्याची ‘ही’ आहेत कारणे…

चल चल गाडी काढ लवकर इथून, तिथे कुत्र्यांचा अख्खा ग्रुप बसला आहे! कुत्रे गाडीच्या मागे लागत असल्याने अनेकदा आपली अशी घाबरगुंडी उडते. गाडीच्या मागे लागलेले कुत्रे भुंकून भुंकून अंगावर येतील आणि त्यांच्या कचाट्यात सापडलो तर ते चावतील की काय इतके ते आक्रमक दिसतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की कुत्रे नक्की कोणत्या कारणामुळे आपल्या गाडीच्या मागे धावतात? नाही ना ! चला जाणून घेऊया आजच्या लेखात.

कुत्र्यांची सीमा ठरलेली असते:
ए, ये अपुन का इलाका है! यहा आपनाही राज चलेगा.. हा डायलॉग चित्रपटात गुंड मवल्यांकडून ऐकला असेल. अशीच कुत्र्यांची ही जागा ठरलेली असते.

ते त्याच्या इलाक्यात वावरत असताना तिथल्या झाडावर, गड्यांवर मूत्रविसर्जन करतात आणि इतर आसपासच्या कुत्र्यांच्या मूत्राचाही वास ओळखतात. पण दुसऱ्या जागेवरची गाडी आली की कुत्र्यांना दुसऱ्या कुत्र्यांच्या मुत्राचा वास येतो आणि त्याच वासाच्या दिशेने ते भुंकतात, गाडीचा पाठलाग करु लागतात.

कुत्र्यांना वाईट अनुभव असतात:
आपल्या डोळ्या देखत एखाद्या कुत्र्याला किंवा त्याच्याच नात्यातल्या कुत्र्याला गाडीने उडवलेलं, चिरडलेलं पाहीलं असेल तर कुत्र्यांच्या डोक्यात ती घटना फिट्ट बसते. गाड्यांविषयी त्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि नेमकं त्या घटनेच्या वेळी कोणती गाडी होती हे ओळखता न आल्याने जेव्हा जेव्हा एखादी गाडी त्याच्या समोरून जाते तेव्हा तेव्हा ते त्या गाडीच्या मागे धावतात.

हा मोठा प्राणी कोणता:
कोणता ही मोठ्या आकाराचा प्राणी पाहीला तर कुत्रे त्याच्यावर भुंकू लागतात. तसंच जेव्हा गाडी सुरू होते तेव्हा तिची लाईट हे एका प्राण्याचे डोळे आहेत असं कुत्र्यांना वाटतं आणि गाडी चालू झाल्यामुळे तिचा जो आवाज येतो तो एक प्राणी घुरघुरत असल्याप्रमाणे कुत्र्यांना वाटतं. एकूणचं ती गाडी एक सजीव प्राणी आहे असं कुत्र्यांना वाटतं आणि ते गाडीच्या मागे धावतात.

रक्षण करणं त्यांची जबाबदारी असते:
कुत्रे जिथे राहतात तिथल्या लोकांना ते चांगलेच ओळखतात. आपल्या इथे कोणी अनोळखी व्यक्ती आली की ती व्यक्ती वाईट उद्देशाने आली आहे असं त्यांना वाटतं आणि ते भुंकतात. गाडी चालवतानाही आपला वास आणि आपला चेहरा त्यांना अनोळखी वाटतो.

त्यात आपण हेल्मेट घातलं असेल तर त्यांना आपण चोर वाटतो. त्यामुळे ते आपल्या जागेतील लोकाचं संरक्षण करण्यासाठी गाडीच्या मागे धावू लागतात.

बघून घेण्याच्या धमकीचा असतो आवेश:

कुत्रे कितीही आक्रमक, निडर दिसत असले तरी ते घाबरटही असतात. आपण कुत्र्यांच्या समोरून अगदी वेगाने गाडी घेऊन गेलो तर ते दचकतात त्यांना भीती वाटते आणि भुंकत आपल्या गाडीच्या मागे लागून ते ‘मला घाबरवतोस काय? थांब तुला बघतोच मी!’ याच आवेशात असतात.
 कुत्रे गाडीच्या मागे लागले तर तुम्ही काय कराल?

गाडीच्या मागे कुत्रे लागले असतील तर एखादी शर्यत लावल्या प्रमाणे त्यांना चिडवण्याचा, डिवचण्याचा, मागे पळण्यासाठी अधिक उद्युक्त करण्याचा अजिबात प्रयत्न करु नका याने ते अधिक आक्रमक होतात, मागून अंगावर झडपही घालू शकतात.
 
कुत्रे मागे धावत असतील तर गाडीचा स्पीड कमी करा किंवा एका ठिकाणी गाडी थांबवल्याने ते शांत होतात आपल्याला कोणतीही इजा ते करत नाहीत.
कुत्रे आपल्या मागे लागतील हे माहित असल्यामुळे गाडीच्या मागे बसणारे अनेक लोक कुत्र्यांना मारण्यासाठी छोटे दगड किंवा एखादी काठी ठेवतात आणि ते मागे लागले की त्यांना मारतात. असं अजिबात करु नये. यांने त्यांना इजा होऊ शकते किंवा ते अधिकच आक्रमक होऊ शकतात. कदाचित आपला वास किंवा चेहरा लक्षात ठेवून नंतर कधी दिसल्यावर हल्लाही करू शकतात.
 
अनेकदा आपण काहीच न करणं हे देखील चांगलं असतं. कुत्रे गाडीच्या मागे लागले तर ज्या वेगाने आपण गाडी चालवत आहोत त्याच वेगात चालवा; कुत्र्याकडे लक्ष देऊ नका आपण पुढे निघून गेलो आहोत म्हणजे आपण काही केलेले नाही असं त्यांच्या लक्षात येतं आणि ते आपोआपच आपला पाठलाग सोडून देतात, शांत होतात. याशिवाय आपण त्यांच्या एरियातून बाहेर गेलो की ते काही करत नाहीत. दुसऱ्यांच्या एरियात हस्तक्षेप करायला ती माणसं थोडीच असतात?
 
मग कळलं का मित्रांनो, कुत्रे आपल्या गाडीच्या मागे का लागतात ते! म्हणून त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करण्याआधी त्यांची बाजूही लक्षात घ्या आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला हे सांगायला विसरू नका. गाडी असणाऱ्या आपल्या मित्रपरिवारालाही माहितीसाठी हा लेख नक्की पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button