ट्रेंडिंगताज्या बातम्या

Raj Thackeray आणि Eknath Shinde एकत्र आले तर काय होईल?

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा की उद्धव ठाकरेंचा? या वादाची सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाला ४० आमदार आणि १२ खासदारांनी आपला पाठिंबा दिला. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरेचदा एकमेकांची भेट घेतली. त्यामुळे आता नव्या युतीची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार का? ते एकत्र आल्यास शिवसेनेच्या मराठी मतांचं काय होईल? यांसारखे प्रश्न निर्माण होत आहेत. याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत.

शिंदेंचा शिवसेनेवरचा आणि ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरचा दावा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. दरम्यान सध्याच्या भेटीगाठी पाहता शिंदे आणि मनसे यांच्यात काही सकारात्मक घडत आहे हे नक्कीच. एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणं, त्यानंतर राज ठाकरे यांनी गणेशोत्सवानिमित्य मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाणं हे नवी युती तयार होण्याचंच स्पष्ट लक्षण आहे. शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात भाजपा दुवा असल्याचे बोलले जाते, कारण २०१९ साली जेव्हा शिवसेनेनं भाजपसोबत युती केली तेव्हा सत्तावाटपावरून वाद निर्माण झाला आणि युती तुटली, आणि हाच तो काळ होता जेव्हा भाजपा आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली.

एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाला आंतरिक वाद जरी जबाबदार असला तरी त्यातली भाजपाची भूमिका कालांतरानं समोर आली आहे. शिंदेनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर हे चित्र स्पष्ट झालं आहे. आता एकनाथ शिंदे गट आणि मनसे पक्षात युती होणार, ते जागा ठरवून एकत्र लढतील परंतु भाजपा त्यांच्यासोबत युती करणार नाही असे बोलले जात आहे. असे झाल्यास मराठी मतांमध्ये वाटे पडतील हे नक्की.

मुंबईत मराठी आणि अमराठी अशी मतांची विभागणी आहे. गेल्या तीन दशकांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बहुतांश मत शिवसेनेकडे जात आहेत. ‘मनसे’ पक्षाच्या स्थापनेनंतर शिवसेनेतील बराच भाग राज ठाकरेंकडे गेला मात्र शिवसेनेनं आपल्या सत्तेची पकड कायम ठेवली. मात्र आता शिंदे गटामध्ये सेनेतला मोठा वर्ग गेला आहे. त्यामुळे मराठी मतांमध्ये हिस्से तयार झाल्यानं निवडणुकांमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळणार आहे. आजवर शिवसेना मराठीबहुल भागांमध्ये सहज निवडून येत होती, मात्र आता शिवसेनेसमोर कठीण आव्हान आहे.

सध्या मनसे पक्षाचे निवडणुकांमधील यश कमी असले तरी देखील मुंबईतील काही भागांमध्ये, विशेषतः मराठीबहुल भागांमध्ये मनसेची ताकद मोठी आहे आणि शिवसेना व भाजपाच्या तुलनेत या मर्यादित भागांमध्ये असणारी ताकद शिंदे गटासोबत युती केल्यास वाढेल हे नक्की. राज ठाकरे काही वर्षांपासून केवळ मराठीचाच मुद्दा घेत नसून, उत्तर भारतीयांविषयी देखील उदारमतवादी भूमिका घेतांना व त्याबद्दल मेळावे घेतांना दिसले आहे. पण आता शिंदे गटासोबत युती झाल्यास या रणनीतीवर काय परिणाम होईल हे निवडणुकांच्या काळातच कळेल.

भाजपाला देखील या युतीचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे, कारण त्यांचं टार्गेट देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेनाचं आहे. त्यामुळे जर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर शिवसेनेच्या पारंपारिक मतांमध्ये हिस्से तयार होतील आणि सेनेच्या संख्येवर परिणाम होईल.

त्यामुळे आता शिंदे गट आणि मनसे एकत्र येतील का आणि एकत्र आल्यास त्याचा भाजपाला किती फायदा होईल हे आगामी निवडणुकांचा काळच सांगेल. असे झाल्यास शिवसेना, आता ज्या मराठी मतदारांमध्ये हिस्से निर्माण होतील  त्यातून वाचण्यासाठी काय करेल हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

पाहा विडिओ –

Anurag Raturi

[email protected] , I am a jounarlist at batmi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button