Queen Elizabeth यांच्या निधनानंतर Kohinoor हिऱ्याचे काय होणार?
सर्वाधिक काळ सिंहासनावर राहणारी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यांनी ब्रिटनवर तब्बल ७० वर्षे राज्य केले. शाही परंपरेनुसार महाराणीच्या मृत्यूपश्चात तिचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स याला राजा घोषित करण्यात आले आहे.
मात्र महाराणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुकुटात जडलेल्या कोहिनुर हिऱ्याबद्दल लोकांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. कोहिनुर हिरा भारतात परत आणावा अशी देखील बऱ्याच नेटकऱ्यांची मागणी आहे. राणीच्या मृत्यूनंतर कोहिनुरचे काय होईल? तो कोणाकडे सोपवला जाईल? व कोहिनुर भारतात परत आणता येऊ शकतो का? याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत.
सुमारे ८०० वर्षांपूर्वी कोहिनुर हिरा भारतातील गोलकोंडा खाणीत सापडला. तेव्हापासून हा हिरा अनेक राजघराण्यांच्या ताब्यात होता. अखेरीस रणजीत सिंग यांच्या उत्तराधिकाऱ्याने ब्रिटीश कालखंडात इंग्रजांकडून राज्य गमावल्यानंतर कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरियाकडे सुपूर्द केला. सुरुवातीला राणी व्हिक्टोरियाने या हिऱ्याला ब्रॉच म्हणून परिधान केले. 1937 मध्ये किंग जॉर्ज पाचवे यांच्या राज्याभिषेकावेळी राणी एलिझाबेथसाठी बनवलेल्या मुकुटात कोहिनूर बसवण्यात आला आणि अशाप्रकारे हा हिरा ब्रिटिश क्राऊन ज्वेल्सचा एक भाग बनला.
१०५. ६ कॅरेटची शुद्धता असलेला कोहिनुर जगातील सर्वात मोठा हिरा मानला जातो. महाराणी एलिझाबेथ यांच्या १. २८ किलो वजनाच्या मुकुटाचे कोहिनुर मुख्य आकर्षण आहे. राणीच्या या मुकुटात नीलमणी, एडवर्ड द ब्लॅक प्रिन्सचे रूबी, एलिझाबेथ प्रथमचे मोती, कुलीनन द्वितीयचे हिरे यांसारखी अनेक मौल्यवान रत्ने जडली आहेत.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी फेब्रुवारी महिन्यात घोषणा केली होती की, कॅमिला राणी कन्सोर्ट म्हणून ओळखली जाईल, दरम्यान ७५ वर्षीय कॅमिला यांना कोणतेही घटनात्मक अधिकार देण्यात आलेले नाहीत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर हा कोहिनुर हिऱ्याचा मुकुट ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला पार्कर बाउल्स यांना दिला जाईल.
राजे चार्ल्स जेव्हा सिंहासनावर विराजमान होतील, तेव्हा हा मुकुट चार्ल्सच्या पत्नी कॅमिला पार्कर बाउल्स या कोहिनुर जडीत मुकुट परिधान करणार असल्याची शक्यता आहे, मात्र हा मुकुट कॅमिला यांना दिला जाईल की नाही, हे राजघराण्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयावरूनच स्पष्ट होईल.
राजघराण्यात हा मुकुट आजवर केवळ महिलांनीच परिधान केला आहे, कारण पुरुषांनी मुकुट परिधान करणे तिथे अपशकुन मानलं जात. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा हा मुकुट अत्यंत मौल्यवान आहे. या मुकुटाची किंमत तब्बल ३६०० कोटी असल्याचे बोलले जाते. ‘टॉवर ऑफ लंडन’ मध्ये तो प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. कोहिनूर हिरा शीख महाराजा रणजीत सिंग यांचे वारस दुलीप सिंग यांनी औपचारिकपणे राणी व्हिक्टोरियाला सुपूर्द केला होता.
दुलीप सिंग यांच्याकडे हिरा देण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय शिल्लक नव्हता असे सांगण्यात येते. कोहिनुर हिरा हा चोरून किंवा कोणत्याही जबरदस्तीने घेतला नव्हता आणि त्यामुळेच भारताने वारंवार त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करू नये, असे भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. यासोबतच ब्रिटिश सरकारने देखील कोहिनुर परत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
पहा विडिओ