ताज्या बातम्याट्रेंडिंग

कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराच्या ‘या’ गोष्टी तुम्हालाही माहित नसतील…

कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख अंबाबाई किंवा महालक्ष्मी असा करण्यात येतो. अनेक पिढीतील लोक कोल्हापूर येथील देवीच्या दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करतात. (You may not even know ‘these’ things about Mahalakshmi-Ambabai Temple in Kolhapur)

या मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडतांना बघितलेला आहे. पण या मंदिराबद्दल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसणार? चला तर मग याच मंदिराबद्दल च्या काही माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते. प्राप्त माहितीनुसार मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ. स. ६०० ते ७०० मध्ये बांधले गेल्याची शक्यता दर्शवितात.

मंदिराचे पहिले बांधकाम हे राष्ट्रकूट किंवा त्याआधीच्या शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे असे सांगण्यात येते. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातत्व वेळोवेळी सिद्ध होते. आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

कोल्हापूर या शहराची किंवा सुरुवातीच्या काळातील वस्तीची सुरुवात पंचगंगा या नदीच्या काठावर झाली असे ब्रह्मपुरी टेकडीवर मिळालेल्या अवशेषांवरून सांगण्यात येतं. जर आज या मंदिराचा इतिहास बघायला गेल तर पौराणिक आणि ज्ञात ऐतिहासिक पुरावे या दोन्हीचा विचार करावा लागतो.

पुराणामध्ये सुद्धा याचे उल्लेख आहेत आणि काही कागदोपत्री पुराव्यांवरही इतिहास लिहिला गेला आहे. मंदिराचं गर्भागार कर्णदेव नावाच्या चालुक्यांच्या सुभेदाराने ६२४ मध्ये बांधलं आणि त्यानंतर शिलाहारांच्या मारसिंह नावाच्या राजाने या मंदिराचा विस्तार केला. व त्याच्याच वंशातल्या गंडरादित्यानं मंदिरावर कळस चढवला, असं मानले जाते.

आजच्या महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराच्या संकुलाची रचना विचारात घेतली असता सुरुवातील महाद्वार, चारही दिशांनी… द्वार, आत गेल्यावर मेंढा व बैल यांचे शिल्प, नगारखाना, दीपमाळा, मध्यवर्ती महालक्ष्मी-महाकाली, महासरस्वती यांची मंदिरं आणि चारही बाजूंनी अनेक देवतांची मंदिरं दिसून येतात.

महालक्ष्मी समग्र दर्शन या पुस्तकामध्ये लिहल्या गेले आहे की, हे मंदिर कोणी बांधले यासंबंधी काही पुरावे उपलब्ध नाहीत. केव्हा बांधले याबद्दल अनेक प्रवाद आहेत. प्र. कृ. प्रभुदेसाई यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटले होते की, महालक्ष्मी मंदिराचे १०५५ च्या आधी आणि नंतर असे दोन टप्पे आढळून येतात.

चोळ राजांनी हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे त्याचा बहुतांश भाग हा लाकडाचा असावा. प्रभुदेसाई यांनी या मंदिराची वैशिष्ट्ये सांगताना म्हटले कि, हे मंदिर एकमेवाद्वितिय असं म्हटलं पाहिजे. यात दोन मजले असून दोन गर्भगृहे आहेत. सध्या दिसणारी शिखरं अगदी अलिकडची म्हणजे १८ व्या किंवा १९ व्या शतका मधली असावीत.

मंदिराच्या रचनेबद्दल त्यांनी म्हटलं की, मंदिराच्या छताचा आतला भाग पाहिला असता लाकडामध्ये जे स्थापत्य बनवले जाते, अगदी त्याचीच नक्कल दगडामध्ये घडवल्याचे दिसून येतं. महालक्ष्मीच्या मूर्तीबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं की, ही मूर्ती काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्टपासून तयार केलेली आहे.

ती उभी मूर्ती आहे. तिच्या हातामध्ये म्हाळुंग म्हणजे बीजपूरक, गदा, ढाल, पानपत्र आहेत. अशाप्रकारची रचना असलेल्या मूर्ती कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसात आढळून येतात. देवी म्हणून तिच्या भक्तांची व्याप्ती दूरवर पसरलेली आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतापासून भाविक दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत असतात. नवरात्रामध्ये भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button