इतिहासजरा हटकेताज्या बातम्यामाहितीपूर्ण

आनंदी जीवनाचं तंत्र सोप्प्या भाषेत शिकवणारं पुस्तक…

द करेज टू बी डिसलाइक्ड हे एक जपानी पुस्तक आहे. जपानमध्ये आणि इतर देशांमध्येही हे पुस्तक प्रचंड प्रमाणात विकलं गेलं. हे केवळ पुस्तक नसून १९व्या शतकातील मानसशास्त्रज्ञ ‘आल्फ्रेड ॲडलर’ यांनी केलेल्या कामाच्या विश्लेषणावर आधारित जपानी तत्त्वज्ञान आहे.

आनंद हा प्रत्येक व्यक्तीच्या हातात असून इतर कशावरही अवलंबून नाही हा संदेश आपल्याला या पुस्तकातून मिळतो. ‘इचिरो किशिमी’ आणि ‘फुमिटेक कोगा’ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

वेगवेगळी प्रकरणं, मुद्द्यांमधून पुस्तक उलगडत जातं हे आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. पण हे पुस्तक मात्र प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपल्या समोर येतं. एक तरुण व्यक्ती प्रश्न विचारते आणि मानसशास्त्रज्ञ ॲडलर आपल्या तत्वज्ञानातून मार्गदर्शन करतात.

यामध्ये आयुष्यातले क्लिष्ट प्रश्न, समस्या, प्रसंग अशा प्रत्येक प्रकारचे प्रश्न ती व्यक्ती त्यांना विचारते. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक बाजूवर आपल्याला या पुस्तकातून माहिती मिळते. म्हणूनच हे पुस्तक आपल्या स्वतःशी जोडलं जातं. यातले प्रश्न आणि उत्तरं आपल्याशीच संबंधित वाटतात.

आपल्याला वाटतं की, आपल्या भावना आपल्या नियंत्रणात नाहीत, राग आल्यावर आपला कंट्रोल जातो. कधी आपण एखाद्यावर जोरात ओरडून राग व्यक्त करतो तर कधी एखादी वस्तूदेखील फोडतो आणि आपल्या या कृतीचं खापर आपण भावनांवर फोडतो.

मला राग आला म्हणून मी तसं वागलो असं म्हणून मोकळं होतो. ही पळवाट अतिशय चुकीची आहे, याची जाणीव आपल्याला या पुस्तकातून होते. आपल्या प्रत्येकात स्वतःला नियंत्रित ठेवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. आपण आपल्या भावनांना निवडू शकतो, नियंत्रणात करु शकतो, ही शिकवण उदाहरणांमधून आपल्याला मिळते.

त्यानंतर आपल्या आयुष्यातल्या समस्यांच्या मुळावरही हे पुस्तक भाष्य करतं. आयुष्यातल्या अनेक समस्यांचं मूळ आपल्या परस्पर संबंधांमध्ये असल्याचं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. प्रत्येक माणूस नात्यांतून बनला आहे.

आपलं इतरांशी नातं कसं आहे, आपलं स्वतःशी नातं कसं आहे, याभोवती आयुष्य फिरत असतं. आपण स्वतःला कमी समजत असू तर अनेक समस्या आपण स्वतःहूनच निर्माण करतो. याबरोबरच सतत लोकं काय म्हणतील, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकू का, यातूनही अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे आपण स्वतःला प्रेमाने वागवण्याची गरज असते.

जर आपणच स्वतःला प्रेमाने, सन्मानाने वागवलं नाही तर इतरांकडूनही आपल्याला तशी वागणूक मिळत नाही आणि हे पुस्तक आपल्याला हेच सगळं समजावण्याचं प्रयत्न करतं. यासाठी लोकांचा विचार सोडून देणं, कोणी आपल्याबद्दल काय बोलतं, कोण काय विचार करतं याकडे दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे.

जेव्हा आपल्याला हे जमेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मुक्त, ताकदवान होऊन जगू शकतो. कोणताही संबंध आपल्या मनाची शांतता, स्वास्थ्य बिघडवणार नाही, याची काळजी आपण घेऊ तेव्हाच आयुष्याचा आनंद आपण घेऊ शकतो. हा दृष्टीकोन आपल्यात आणून स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी हे एक पुस्तक वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आजच्या गुंतागुंतीच्या डिजिटल जगात सोशल मीडिया लाइक्सच्या मागे अनेकजण पळत आहेत. प्रत्येकाला इतरांकडून ‘लाइक’ मिळण्याची अपेक्षा आहे. ते लाइक मिळाले नाही तरी अनेकजण अस्वस्थ होतात.

ही अस्वस्थता मिटवण्यासाठी इतरांकडून नापसंत केलं गेलं तरी ते स्वीकारण्याचं धैर्य आपल्यात असलं पाहिजे. कोणत्याही लाईक्सची गरज न पडता आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारण्याची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे. ही जबाबदारी आनंदी आयुष्याच्या गोल्डन रुल्सपैकी एक आहे, असं लेखक सांगतात.

आपल्या वैयक्तिक विकासासाठी आत्मविश्वास, आदर्श, आपली मूल्य यांना चिकटून राहणं कसं गरजेचं आहे यावरदेखील लेखक आपल्याला उत्तर देतात. स्वतःचा आनंद वाढवण्यासाठी कधीही खोटेपणा करु नका,

इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचे आदर्श पणाला लावू नका, मूल्य विसरु नका, कारण कितीही प्रयत्न केले तरी कोणाला ना कोणाला आपण नापसंतच असणार आहे. त्यापेक्षा प्रामाणिकपणे वागून जे आपल्यासोबत राहतील त्यांना खरा मान द्यावा.

कधीही कोणाला व्यवस्थित ओळखल्याशिवाय विश्वास ठेवू नका. लोकांमध्ये अडकून पडण्यापेक्षा तुमच्या मनाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल, ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून प्रयत्न करत रहा, असा मोलाचा सल्ला या पुस्तकातून आपल्याला मिळतो.

पुस्तक वाचताना अनेकदा आपणही विचारमग्न होतो, स्वतःच्या वर्तणुकीविषयी, आयुष्याविषयी प्रश्न मनात निर्माण होतात. त्यामुळे खूप शिकवण या पुस्तकातून आपल्याला मिळते.

प्रश्नोत्तरांमुळे वाचन सहजसोपं होतं. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचावं. वेगवेगळ्या भाषांमध्ये याचे अनुवाद उपलब्ध असून, ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने आपण हे पुस्तक विकत घेऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button